आम्ही काय बॅन्डवाले आहोत का?, सदाभाऊ खोत यांनी मेळाव्यातच भाजपला सुनावले

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप- शिवसेना व मित्रपक्षांचे संयुक्त मेळावे १४ जानेवारी रोजी राज्यभर घेण्यात आले. मात्र काही ठिकाणच्या मेळाव्यात मित्रपक्षांनी भाजपबाबत आपल्या मनात असलेली खदखद जाहीरपणे व्यक्त केली.

सांगलीतील मेळाव्यात रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी भाजपच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘नुकतीच मुंबईत बैठक झाली, त्यात आम्हाला सर्वांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र त्यावेळी मी विचारले, तुम्ही आम्हाला समजता काय? लग्नकार्य आले की जशी बँडवाल्यांची आठवण येते तसे निवडणुका आल्या की तुम्हाला आमची आठवण येते. मात्र साधी संजय गांधी योजनेचे अध्यक्षपद, सदस्यपद मित्रपक्षाला दिले जात नाही. तुम्ही आम्हाला समजता काय? आम्ही लढणारी माणसं आहोत. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही तुमच्या (भाजप) सोबत आहोत, पण तुम्ही आमचा अपमान करु नका,’ असा शब्दात सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)  यांनी भाजप नेत्यांसमोरच समाचार घेतला.

सदाभाऊ नाराज का?

२०१४ व २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या स्वाभिमान पक्षाने भाजपविरोधी भूमिका घेतल्यानंतरही सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अनेक वर्षे मैत्री असलेल्या राजू शेट्टींची साथ सोडली पण भाजपशी युती तोडली नाही. या बदल्यात मुख्यमंत्री फडणवीस असताना भाजपने सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना विधान परिषदेवर संधी देऊन मंत्रिपदही दिले. मात्र आता शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यासारखे तगडे मित्रपक्ष मिळाल्याने भाजपला या छोट्या मित्रांचा विसर पडला आहे. सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेची मुदत संपल्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा संधी नाकारली. इतर कुठलेही महत्त्वाचे पद दिले नाही. त्यामुळे सदाभाऊंचा भाजपवर विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (‌Devendra Fadanvis) राग आहे.

बच्चू कडू, महादेव जानकरही नाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Moidi) यांनी गेल्या वर्षी दिल्लीत एनडीएची (NDA) बैठक बोलावली होती त्याचे साधे निमंत्रणही सदाभाऊंना (Sadabhau Khot) नव्हते. अशाप्रकारची दुय्यम वागणूक मिळत असल्याची विशेषत: आमदारकीसाठी सातत्याने डावलले जात असल्याची खंत सदाभाऊंनी महायुतीच्या मेळाव्यात बोलून दाखवली. मात्र मोदींसाठी आम्ही भाजपसोबतच असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. याच कारणामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) व रासपचे नेते महादेव जानकरही (Mahadeo Jankar) भाजपवर नाराज आहेत. ते अधूनमधून जाहीरपणे नाराजी व्यक्त करत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics