भटकती आत्मा, पवारांचा चेहरा अन् अजित पवारांची चिंता वाढली

महाराष्ट्र विधानसभेत प्रचाराचा धुराळा उडू लागलाय. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्याची जणू स्पर्धाच लागलीय. या गदारोळात राज्यातील जनतेचे प्रश्न, प्रमुख मुद्दे मात्र बाजूला पडलेत. मात्र महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब अशी की प्रचारात टीकेची पातळी अत्यंत खालच्या पातळीपर्यंत घसरत चालली आहे. यापूर्वी लोकसभेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला होता. आता विधानसभेच्या प्रचारात भाजपचे सहयोगी आमदार सदाभाऊ खोत यांनीही शरद पवारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महायुतीविरोधात टीकेची झाेड उठली आहे. या टीकेचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय पडसाद उमटतील याबाबत मिशन पॉलिटिक्समधून आपण जाणून घेऊ या…

सदाभाऊंचे आक्षेपार्ह वक्तव्य…

विधानसभेच्या प्रचारात शरद पवार यांनी ‘मला महाराष्ट्राचे चित्र बदलायचे आहे, तुम्ही साथ द्या,’ अशी साद राज्यातील जनतेला घातली होती. त्याचा महायुतीतील नेते समाचार घेत आहेत. मात्र रयत क्रांती संघटनेचे नेते व भाजपच्या तिकिटावर विधान परिषदेत आमदार झालेल्या सदाभाऊ खोत यांनी मात्र शरद पवार यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. सांगली जिल्ह्यातील एका सभेत खोत म्हणाले, ‘पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या… पण पवारांना मानावं लागेल. एवढं घडलं तरी सुद्धा ते भाषणात म्हणतात मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा पाहिजे? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?’ असे आक्षेपार्ह वक्तव्य खोत यांनी केले. आपल्या सगळ्यांना माहित आहे की, शरद पवार हे कर्करोगाशी यशस्वीपणे लढा देऊन या अाजारातून सहीसलामत बाहेर पडले आहेत. मात्र डॉक्टरांनी त्यांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया केल्याने त्यांचा चेहरा थोडाचा विद्रुप झाला आहे. मात्र खोत यांनी त्यांच्या या व्यंगावरच बोट ठेवल्याने सर्वच पक्षातून खोत यांच्यासह महायुतीवर टीकेची झाेड उठवण्यात आली आहे.

मविआकडून सदाभाऊंचा समाचार…

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘खोत, शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्यामुळे त्यांचा जबडा काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी त्यांचं ऑपरेशन झालं त्याच्या काही दिवसानंतर लगेच शरद पवार रक्त येत असताना देखील सभांमध्ये सहभागी झाले होते. आपण काय बोलतो याची काही समज नाही का आपल्याला. महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही, शरद पवारांचा शंभर टक्के वाटा आहे. अा माणसाच्या चेहऱ्यावरुन बोलणं यावरुन तुमची अक्कल शून्यता लक्षात येते. खोत तुमच्या वडिलांची तुम्ही अशी टिंगल केली असती का? ’ असा सवालही आव्हाड यांनी विचारला. खासदार संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर खोत यांना थेट कुत्र्याची उपमा दिलीय. खोत बाेलत असताना फडणवीस व्यासपीठावर बसून हसत होते. त्यांनी हसण्यापेक्षा खोतांच्या कानफटीत लावून द्यायला हवी होती, असेही राऊत म्हणाले. ही टीका अंगलट येऊ लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनीही त्याचा निषेध केला. अजित पवार यांनी तर थेट खोत यांना फोन लावून झापून काढले. ‘एखाद्या नेत्यावर अशी टीका करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुमचे हेे वक्तव्य म्हणजे विनाशकाली विपरित बुद्धी आहे. महाराष्ट्र ते सहन करणार नाही’ अशा शब्दात सुनावले. या प्रकारानंतर खोत यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. कुणाच्या व्यंगावर आपल्याला बोलायचे नव्हते, असे सांगत त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे नक्राशूही गाळले.

आक्षेपार्ह वक्तव्याचा महायुतीला फटका बसणार?

या टीकेवर स्वत: शरद पवार काहीही बोलले नाहीत. पण खोत यांनी केलेल्या चुकीचा फटका महायुतीला बसू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अजित पवार यांना त्याची जाणीव असल्याने त्यांनी तत्काळ खोत यांना माफी मागायला भाग पाडले. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला होता. तर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही बारामतीत जाऊन ‘शरद पवारांचा पराभव करायला हवा’ असे वक्तव्य केले होते. प्रत्यक्षात या निवडणुकीत सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे उभ्या असताना शरद पवारांच्या पराभवाबाबत, तेही बारामतीत जाऊन चंद्रकांतदादांनी वक्तव्य केल्याने बारामतीकर भाजपवर संतापले होते. हा प्रकार अंगलट येणार असल्याचे लक्षात येताच अजित पवारांनी नंतर लोकसभेच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादांना बारामतीत येण्यास बंदीच घातली होती.

शरद पवारांना होणार फायदा?

आताही सदाभाऊ खोत यांनी पवारांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे त्याची किंमत पश्चिम महाराष्ट्रात केवळ भाजपलाच नव्हे तर महायुतीला मोजावी लागू शकते. या भागात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. अगदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही सिनियर पवारांना ‘देव’ मानणारे अनेक लोक आहेत. त्यांच्याबद्दलच खोतांनी विधान केल्यामुळे अजित पवारांचे समर्थकही भाजपला धडा शिकवण्याच्या गोष्टी करु लागलेत. यातून महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो. तर शरद पवार यांच्याविषयी जनतेत अजून सहानुभूती वाढू शकते, अशी भाजपला व अजित पवारांना चिंता आहे. म्हणूनच.. आता भाजपने कितीही सारवासारव केली तरी खोतांच्या घसरलेल्या जिभेची महायुतीला किंमत मोजावी लागणार यात शंकाच नाही.