संभाजीनगरात भाजपकडून सावे की विनोद पाटील?

डॉ. भागवत कराड यांचे नाव मागे पडले

युतीत ‘थोरल्या भावा’च्या भूमिकेत आलेल्या भाजपने संभाजीनगर हा मतदारसंघच आपल्याकडे खेचून घेण्याचे डावपेच काही महिन्यांपासून सुरु केले होते. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आलेले दिसते. महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर करण्यात आलेले नसले तरी संभाजीनगर मतदारसंघ भाजपच लढवणार हे मात्र निश्चित झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच संभाजीनगरात जाहीर सभा घेऊन तशी घोषणा केल्याने त्याबाबत आता कुठलीही शंका राहिलेली नाही.  पण भाजपचा उमेदवार कोण? डॉ. भागवत कराड, अतुल सावे की विनोद पाटील?

डॉ. कराड यांच्या नावाची चर्चा

राज्यसभा खासदार व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नावाची सुरुवातीपासून चर्चा आहे. मोदी सरकारच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात व संभाजीनगरसाठीच्या विविध विकास कामांसाठी आजवर त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. ओबीसी चेहरा, सर्वांना सहज उपलब्ध होईल असे व्यक्तीमत्व व एकेकाळी संभाजीनगरच दोनदा महापौरपद भूषविलेले असल्याने त्यांना शहराची नस चांगली माहिती आहे. त्यामुळे डॉ. कराड यांना उमेदवारी मिळेल असेच दावा आतापर्यंत केले जात होते. अगदी काल- परवा झालेल्या अमित शाह यांच्या सभेतही व्यासपीठावर डॉ. कराड यांना भाषणाची संधी मिळाल्यामुळे त्यांचेच नाव चर्चेत होते. मात्र भाजपचे निर्णय केवळ दिखावूपणावर होत नाहीत. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणात डॉ. कराड यांचा चेहरा विजयश्री मिळवण्यासाठी सक्षम नसल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यामुळे हा पक्ष इतर पर्यायी उमेदवारांच्या नावाचीही चाचपणी करत आहे.

विनोद पाटील ठरु शकतो हुकमी एक्का

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी नुकतीच लोकसभा लढवण्याची घोषणा केली आहे.  मराठा आंदोलकांकडून व समाजाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. पण विनोद पाटील यांना उमेदवारी कोणत्या पक्षाकडून मिळेल याबाबत तर्क- वितर्क सुरु आहेत. नाराज मराठा समाजाची मते आपल्याकडे वळण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असलेला विनोद पाटील सारखा उमेदवार जर आपण दिला तर आपला विजय कोणीही रोखू शकत नाही, असे भाजपच्या धुरिणांना वाटते.

सावे यांच्या नावावर सकारात्मक विचार

संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे आमदार व राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नावाचा पक्ष सकारात्मक विचार करत आहे. सावे यांचे वडील मोरेश्वर सावे हेही खासदार होते. त्यांच्यामुळे सावे घराण्याचा जनसंपर्क जिल्ह्यात चांगला आहे. सावे स्वत: उद्योजक आहेत, त्यामुळे उद्योग वर्तुळातही त्यांना चांगला मान- सन्मान आहे. विशेष म्हणजे सावे हेही ओबीसी समाजातून येणारे असल्यामुळे भाजपची हक्काची व्होटबँक असलेला ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहिल, अशी अपेक्षा पक्षाला वाटते.

https://missionpolitics.com/chhatrapati-sambhajinagar-bjp-lok-sabha-candidate-vinod-patil/

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics