भुजबळांच्या बंडामागे काकांचे बळ

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना पक्षाने नाशिक जिल्ह्यातील येवल्यातून पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिली. त्यांचे पूत्र पंकज यांना नुकतेच विधान परिषदेवर आमदारकी दिली. तरीही भुजबळ घराण्यातून सत्तेचा मोह कमी झालेला दिसत नाही. याचे कारण म्हणजे सिनियर भुजबळांचे पुतणे, माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातीलच नांदगावातून विधानसभेच्या उमेदवारीसाठी दावा केला होता. मात्र तिथे सध्या शिंदेसेनेचे सुहास कांदे हे आमदार आहेत. आता मित्रपक्षाच्या विद्यमान आमदारांचे तिकिट कापून अजितदादा तर समीर यांना तिकिट देऊ शकत नाहीत. त्यामुळे समीर यांनी थेट अजित पवारांचा पक्ष सोडून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय. एकाच घरात दोन- दोन आमदारकी असताना मग तिसऱ्या आमदारकीसाठी समीर भुजबळ यांचा एवढा हट्ट का? छगन भुजबळांना त्यांचा हा निर्णय मान्य अाहे का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या..

भुजबळांना हवा होता वरदहस्त?

ओबीसींचे नेते अशी ओळख असलेले कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी होते. पण राष्ट्रवादीत जेव्हा बंड झाले तेव्हा त्यांनी अजित पवार गटात जाणे पसंत केले. त्यामागे सत्तेचा मोह तर होताच पण महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात सुरु असलेल्या चौकशीतून सुटका मिळण्यासाठी त्यांना भाजपचा वरदहस्तही हवा होता. अखेर नाईलाजाने का होईना भुजबळ यांनी महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला. त्याचे फळही त्यांना मिळाले. अडीच वर्षे मंत्रिपद, चौकशीतून दिलासा, जप्त केलेल्या मालमत्तांवरील टाच मागे घेणे आदी सोयीस्कर गोष्टी त्यांनी करवून घेतल्या.

भुजबळांना बंडाची कल्पना होती का?

छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते असल्याने हा मतदार महायुतीकडे आकर्षित करुन घेण्यासाठी भाजपनेही त्यांचा उपयोग करुन घेतला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सरकारवर बेछूट आरेापांच्या फैरी झाडत असताना सरकारमधून फक्त भुजबळ हेच एकमेव मंत्री जरांगे यांचा प्रतिवाद करण्याचे धाडस करत होते. जरांगेंना शह देण्यासाठीही भाजपने भुजबळांचा उपयोग करुन घेतला. आता या सगळ्या कामाचे फळ म्हणून अजित पवार गटाने भुजबळांना पुन्हा येवल्यातून उमेदवारी दिली. नांदगाव मतदारसंघावरही भुजबळांच्या घरातून दावा होता. पण तिथे शिंदेसेनेचे आमदार सुहास कांदे असल्यामुळे महायुतीत ही जागा आपल्याला मिळू शकत नाही असे अजित पवारांनी त्यांना समाजवून सांगितले. या बदल्यात भुजबळांचे पूत्र पंकज यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. सध्या त्यांच्या घरात दोन आमदार आहेत. उद्या महायुतीची सत्ता आली तर सिनियर भुजबळांना मंत्रिपदही मिळेलच. पण तरीही नांदगावच्या जागेसाठी पुतण्या समीर यांनी बंडाचा झेंडा फडकावलाच. त्यासाठी राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदावरही त्यांनी पाणी सोडले..आता त्यांच्या या बंडाची छगन भुजबळांना कल्पना नव्हती किंवा त्यांच्या विरोधानंतरही समीर यांनी हे पाऊल उचलले असे म्हटले तर त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. छगन भुजबळ हीच समीर यांची ताकद अाहे, त्यांच्या मनाविरुद्ध समीर कुठलाही निर्णय घेणार नाहीत. मग समीर यांच्या बंडाला भुजबळांची मूकसंमती आहे.. असाच यातून अर्थ काढता येईल.

नांदगाववर भुजबळांना हट्ट सांगण्यामागे काय कारणे आहेत हे आपण जाणून घेऊ या..

पहिले कारण म्हणजे….. नांदगाव मतदारसंघातून २०१४ मध्ये पंकज भुजबळ हे आमदार होते. पण २०१९ मध्ये भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार असलेल्या सुहास कांदे यांनी पंकज यांचा पराभव केला. तेव्हापासून या दोघांमध्ये वाद वाढलेला आहे. हा मतदारसंघ पुन्हा मिळवून कांदेंचा बदला घेण्याची भुजबळांची सुप्त इच्छा आहे. दुसरे कारण म्हणजे… नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नाशिकमधून उमेदवारीसाठी छगन भुजबळ खूपच आग्रही हाेते. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी त्यांना तसा शब्दही दिला होता. पण शिंदेसेनेने भुजबळांच्या नावाला खूपच विरोध केला. याचे कारण म्हणे इथे २०१९ मध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते, सध्या ते शिंदेसेनेत गेेले आहेत. आपली ही जागा साेडण्यास शिंदेसेना तयार नव्हती. त्यामुळे भुजबळांची संधी हुकली. हा राग त्यांच्या मनात अाहे. म्हणूनच शिंदेसेनेला नांदगावात धडा शिकवण्याचा भुजबळांचा प्रयत्न आहे.

तिसरे कारण म्हणजे.. नांदगावातील जातीय समीकरणे भुजबळांना अनुकूल असल्याचे त्यांना वाटते. या मतदारसंघात माळी, धनगर, वंजारी या मतदारांचा प्रभाव आहे. त्यानंतर मुस्लिम, दलित व बंजारा मतेही निर्णायक ठरु शकतात. सध्या शिंदेसेनेचे सुहास कांदे व उद्धव सेनेचे गणेश धात्रक हे दोन्ही उमेदवार वंजारी समाजाचे आहेत. त्यामुळे या समाजाची मते दोघांमध्ये विभागली जाऊ शकतात. तर माळी, धनगर, मुस्लिम, दलित मतांच्या जोरावर आपण सहज निवडून येऊ शकतो असे भुजबळ यांचे गणित आहे. ही संधी सोडायची नाही या निर्धारानेच समीर यांनी भुजबळांचा झेंडा फडकावल्याचे सांगितले जाते.

समीर भुजबळांचा विजय झाला तर…?

पण.. जर भुजबळांनी इथे कांदेला पराभूत केले किंवा आव्हान दिले तर महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो. शिंदेसेनेचे नेते दुसऱ्या मतदारसंघात अजित पवार गटाच्या उमेदवारासमोर अडचणी आणू शकतात. म्हणून समीर यांचे बंड शमवण्यासाठी अजित पवार गट व भाजपकडून शेवटपर्यंत प्रयत्न सुरु आहेत. पण त्यात त्यांना फारसे यश येण्याची शक्यता आहे. स्वत: भुजबळांनी समीरला थांबवावे यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. पण ‘समीर भुजबळ यांनी मला विचारुन हा निर्णय घेतलेला नाही. तो त्याचे निर्णय घेत असतो. मी त्यात हस्तक्षेप करु शकत नाही,’ असे सांगून छगन भुजबळांनीही हात वर केले आहेत. एकूणच नांदगावचा निकाल काहीही लागला तरी महायुतीत तणावासाठी या मतदारसंघातील निवडणूक मात्र कारणीभूत ठरणार यात शंका नाही.