अडीच वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर अखेर उशिरा का होईना छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. शिरसाट हे मागासवर्गीय प्रवर्गाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने त्यांना सामाजिक न्याय हे खातेही बहाल करण्यात आले अाहे. मात्र जबाबदारीचे वाटप होण्यापूर्वीच त्यांनी कामालाही सुरुवात केलीय. छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच, अशी मुख्यमंत्र्यांच्या आधी शिरसाट यांनीच घोषणा करुन टाकलीय. जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्याची ग्वाही देताना त्यांनी आपल्याच पक्षाचे नेते, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी मात्र थेट पंगा घेतलाय.. काय आहे त्यामागचे कारण.. जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून
अन् शिरसाट बनले शिंदेंचे विश्वासू…
संजय शिरसाट हे एक सामान्य ऑटो रिक्षा चालक ते चार वेळेचे शिवसेना आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास. एरवी सेकंड लाईनचे नेते म्हणून त्यांची शिवसेनेत अोळख होती. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिरसाट अचानक प्रकाशझोतात आले व शिंदेसेनेचे प्रवक्ते म्हणून अतिशय उत्तम कामगिरी त्यांनी केली. संजय शिरसाट आतापर्यंत चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ मध्ये ते सलग तिसऱ्या वेळेस शिवसेनेकडून विजयी झाले होते. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रिपद दिले नाही, त्यामुळे शिरसाट नाराज होती. त्यामुळेच एकनाथ शिंदेंसोबतच्या बंडात ते अग्रक्रमाने सहभागी झाले. या काळात ते शिंदेंचे विश्वासू सहकारी बनले. शिंदे मुख्यमंत्री बनल्यावर तरी आपले मंत्रिपदाची स्वप्न पूर्ण होईल, अशी शिरसाट यांना अपेक्षा होती. शिंदेंनीही तसा शब्द दिला होता. पण महायुतीच्या राजकीय अॅडजस्टमेंटमध्ये इच्छा असूनही शिंदे शिरसाट यांना मंत्रिपद देऊ शकले नाहीत. त्या बदल्यात मतदारसंघासाठी भरमसाठ निधी शिंदेंनी त्यांना दिला. ठाकरे सरकारमध्ये पैठणचे संदीपान भुमरे व सिल्लोडचे अब्दुल सत्तार हे मंत्री होते. त्यांनी हे पद सोडून शिंदेंची साथ दिली, म्हणून शिंदे यांना प्राधान्याने भुमरे व सत्तार यांना मंत्रिपद देणे क्रमप्राप्त होते. एकाच जिल्ह्यात दोनपेक्षा जास्त मंत्रिपदे शिंदे देऊ शकत नव्हते, त्यामुळे तेव्हा शिरसाट यांचे नाव मागे पडले.
म्हणतात ना सब्र का फल मीठा होता है…
शिंदेंसमोरील अडचणीची जाणीव ठेवून शिरसाट यांनी कुठलीही खळखळ न करता शिंदेंचा निर्णय मान्य केला. पक्षाच्या प्रवक्तेपदाची कामगिरी ते उत्तमपणे बजावत गेले. म्हणतात ना सब्र का फल मीठा होता है.. आता फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा जेव्हा महायुतीचे सरकार सत्तारुढ झाले तेव्हा मात्र एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांना आवर्जुन मंत्रिपद देऊन आपला शब्द अडीच वर्षानंतर का होईना पूर्ण केला. सामाजिक न्याय मंत्रिपदाची जबाबदारी शिरसाट यांच्यावर सोपवण्यात आली आहे. खाते कोणतं मिळतंय याबाबत शिरसाट यांना फारसे औत्सुक्य नव्हतं, फक्त मंत्रिपदाच्या खूर्चीत एकदा बसण्याची इच्छा पूर्ण व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र आता त्यांचा डोळा आहे तो संभाजीनगच्या पालकमंत्रीपदावर. महायुतीत संभाजीनगरचे पालकमंत्रीपद नेहमीच शिवसेनेकडे राहिले आहे. ठाकरे सरकार असताना मुंबईचे नेते सुभाष देसाई यांच्याकडे ही जबाबदारी असायची. नंतर शिंदे सरकारमध्ये आधी संदीपान भुमरे यांच्याकडे सुमारे २ वर्षे संभाजीनगरचे पालकमंत्रीपद होते. नंतर भुमरे खासदार झाल्यावर शेवटच्या सहा महिन्यांसाठी ही जबाबदार अब्दुल सत्तार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र आता नव्या सरकारमध्ये सत्तार व भुमरे दोघेही मंत्री नाहीत. शिंदेसेनेत शिरसाट हे एकमेव मंत्री आहेत, त्यामुळे आपसुकच पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळणार, असे दावा शिरसाट करत आहेत. शिंदेंनी तसा शब्दही दिल्याचे ते सांगत आहेत. राजकारणात कधी काय हेाईल ते सांगता येत नाही. पण शिरसाट मात्र आपल्या दाव्यावर ठाम आहेत.
सत्तारांविरोधात गंभीर स्वरुपाचे आरोप…
पालकमंत्रिपद मिळण्यापूर्वीच त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यात प्रशासकीय कामेही सुरू केली आहेत. संभाजीनगरमधील सर्वात कळीचा मुद्दा पाणीप्रश्न आहे. त्याबाबत पहिली बैठक शिरसाट यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसोबत लावली आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीत शेवटच्या सहा महिन्यात जे निर्णय घेण्यात आले व ज्याच्या वर्कऑर्डर, निविदा अजून बाकी आहेत ते सर्व रद्द करुन किंवा त्याचा फेरविचार करण्याच्या सूचनाही शिरसाट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. म्हणजेच पालकमंत्री म्हणून सत्तार यांनी जे निर्णय घेतले आहेत ते फिरवण्याची तयारी शिरसाट यांनी केली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील गुंडगिरी संपवण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली. एकूणच त्यांचा जो अविर्भाव दिसतोय तो विरोधकांपेक्षाही सत्तार यांच्याविरोधात शिरसाट जास्त आक्रमक असल्याचे दिसत आहेत. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडचा पाकिस्तान झालाय, अशी टीका करुन तेथे सत्तारांची गुंडगिरी वाढल्याचा आरोप केला होता. सत्तार यांच्याविरोधात अनेक जमिनी बळकावल्याचे आरोपही आहेत. खुद्द औरंगाबाद हायकोर्टाने तीन- चार प्रकरणात सत्तार यांना मंत्रिपदाचा दुरुपयेाग करुन जमिनी घेतल्याचा ठपका ठेऊन फटकारले आहे. त्यामुळे सत्तार यांच्या गुंडगिरीला पायबंद घालणार असाच इशारा शिरसाट यांच्या वक्तव्यातून दिसून येते.
शिरसाटांना सत्तारांविषयी एवढा तिटकारा का?
शिरसाट यांच्या या सत्तारविरोधी भूमिकेमुळे सिल्लोडचे भाजपवासिय जास्त सुखावले असावेत. कारण महायुती असले तरी सत्तार व भाजपचे कधीच जमले नाही. पण शिरसाट यांना सत्तार यांच्याविषयी एवढा तिटकारा का आहे..? हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर म्हणजे.. जर सत्तार शिंदेसेनेत आले नसते तर शिरसाट यांना अडीच वर्षांपूर्वीच मंत्रिपद मिळाले असते. संदीपान भुमरे हे जुने शिवसैनिक आहेत. त्यांना मंत्रिपद देण्यावरुन शिरसाट यांचा काहीही आक्षेप नव्हता. पण फक्त सत्तेच्या मोहापायी शिवसेनेत आलेल्या सत्तार यांच्यामुळे आपली संधी हुकली, याची खंत शिरसाट यांना आहे. तसेच मंत्री असताना, विशेषत: सहा महिन्यांसाठी पालकमंत्री असताना सत्तार यांनी शिरसाट यांना फारसे महत्त्व दिलेले नाही, त्याचाही राग त्यांच्या मनात आहे. या सर्व गोष्टींचा हिशेब चुकता करण्यासाठी आता पालकमंत्री होताच शिरसाट कामाला लागण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. आधी पालकमंत्री म्हणून सत्तार यांनी घेतलेले डीपीसीचे निर्णय रद्द करण्याचा धडाका शिरसाट लावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, मंत्रिपद मिळाले नसले तरी सत्तार स्वस्थ बसण्याच्या मानसिकतेत नाहीत. १ जानेवारीला त्यांचा वाढदिवस असतो. त्या पार्श्वभूमीवर केवळ सिल्लोडलाच नव्हे तर संभाजीनगरातही जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सत्तार यांनी केली आहे. भविष्यातही ते शिरसाट व भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणण्याची एक एक संधी शोधत राहतील. त्यामुळे आता संभाजीनगर जिल्ह्यात विरोधकांपेक्षा सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांमधील राजकीय युद्धच जास्त रंगतदार ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.