सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे कारनामे समोर येत आहेत. खंडणीखोर वाल्मिक कराड व त्याच्या टोळीतील विष्णू घुले, सुदर्शन चाटे यासारख्या गुंडांनी सोशल मीडियावर रिल्स बनवून आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांच्या अतिशय क्रूरतेने हत्या करण्याचेही व्हिडिओ या टोळीने बनवले व त्यामुळे ते अडकले. अाता बीडच्याच शिरुर तालुक्यातील आणखी एका छोट्या आकाचे कारनामे समोर आले आहेत. स्वत:ला गोल्डमॅन म्हणवून घेणारा व पैशाची उधळण करणारा हा आरोपी खाेक्या नावाने ओळखला जातो. तो भाजपचा पदाधिकारी असून आमदार सुरेश धसचा कार्यकर्ता म्हणूनही त्याची ओळख आहे. काय आहेत या खोक्याचे कारनामे… जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…
मारहाण करणारा आरोपी सुरेश धसांचा कार्यकर्ता…

सरपंच संतोष देशमुख यांची ज्या क्रूरतेने हत्या करण्यात आली त्याचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांनी ते आरोपत्रातही जोडल्यामुळे सर्व माध्यमांमधून ते प्रकाशित झाले. अंगात राक्षस संचारलेल्या गुंडांनी अतिशय अमानवीपणे देशमुख यांची हत्या केली, त्यांच्याशी अमानवीय कृत्य केले हे या फोटोमधून दिसून आले. त्यामुळे सर्वत्र चिड निर्माण केली जात आहे. मात्र हे एकच उदाहरण नाही. तर बीड जिल्ह्यात विशेषत: परळी भागातील वाल्मीक कराडच्या टोळीतील अनेक गुंड आपल्याच कारनाम्याची रिल्स करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. कधी हवेत बंदुकीच्या फैरी झाडणे असो की कधी पोलिसालाच दमदाटी करण्याचे व्हिडिअो असो.. ते व्हायरल केल्याने आपली दादागिरी लोकांपर्यंत पोहोचते असा या गुंडांचा भ्रम आहे. असाच एक प्रकार गेल्या काही दिवसांत समोर आला. नेत्यासारखे पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक कुंड एका व्यक्तीला खाली पाडून त्याच्या तळपायावर बॅटने अमानवीय रितीने वार करत असल्याचा व्हिडिआे व्हायरल झाला. हा मारहाण करणारा आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या असल्याचे निष्पन्न झाले. तो भाजपचे आष्टी- पाटोद्याचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगतो. धस यांनीही ते कधीच अमान्य केले नाही. सतीश भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय असून भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. पारधी समाजासाठी अनेक कामेही त्याने केल्याचे सांगितले जाते.
खोक्याकडे इतका पैसा आला कुठून?

खोक्या नावाने तो जास्त परिचित आहे. अंगावर किलोभर सोने घालून फिरणे, गाडीत नोटांच्या गड्ड्या भरुन ठेवणे, त्याची उधळण करणे हे त्याचे आवडते छंद. कधी हेलिकॉप्टरमधून एन्ट्रीचे रिल्स व्हायरल करणे तर कधी हाती सुरेश धस यांचा फोटा घेऊन व कारच्या टपावर बसून तो आपले फोटो व्हायरल करत असतो. फाईव्ह स्टार आयुष्य जगणाऱ्या खोक्याकडे इतका पोत्याने पैसा कुठून अाला? हा प्रश्न आहेच. पण ज्याच्याकडे सत्ताधारी पक्षाचे पद आहे व ज्याच्यावर सत्ताधारी आमदाराचा वरदहस्त आहे त्याचेकडे पैसे कुठून येतात हे आपल्याला वाल्मीक कराड प्रकरणातूनही समजले आहेच. खोक्याचा विषयही तसाच असावा अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत. एका निरागस व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण करतानाचा खोक्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा प्रश्न पडला की तो त्याला का मारतोय? अधिक चौकशीत असे समोर आले की हा व्हिडिओ वर्ष- दीड वर्षापूर्वीचा आहे.
सुरेश धसांकडून स्पष्टीकरणही…

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील महारखेड येथील कैलास वाघ हा व्यक्ती शिरूर तालुक्यातील तिंतरवणी येथील ज्ञानेश्वर खेडकर यांच्याकडे जेसीबी मशीनवर ऑपरेटर म्हणून कामास होता. परंतु मालक पैसे देत नसल्याने कैलास वाघ काम सोडून तो गावी आला होता. परंतु खेडकर याच्या सांगण्यावरुन सतीश भोसले यांच्या गुंडांनी वाघला त्याच्या गावातून उचलून बीड जिल्ह्यातील एका अज्ञात स्थळी आणले होते व कपडे काढून त्याला बॅटने बेदम मारहाण केल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट झाले. या प्रकरणी खोक्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात कारवाई करण्यास आपला हस्तक्षेप राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता एक गुन्हा दाखल झाल्यानंतर खोक्याचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. खोक्याला पैशाबरोबरच शिकारीचाही भारी शौक आहे. शिरुर कासार तालुक्यातील हरीण,काळविट यासारख्या वन्यजीवाची खुलेआम शिकार तो करत असतो. यात मध्ये कुणी आले तर त्याला मारहाणही करतो. अशाच एका प्रकरणात एका ज्येष्ठ नागरिकाच्या तोंडावर कुऱ्हाडीचा दांडा मारुन खोक्याने त्याचे दात पाडल्याचे समोर आले आहे.
वन विभागाचा खोक्याच्या घरी छापा…

पाडळी येथील सामाजीक कार्यकर्ते माऊली शिरसाट यांनी खोक्याचे हरीण, काळवीटाच्या शिकारीचे प्रकरण समोर आणले. या नंतर उशिरा का होईना जागे झालेल्या वन विभागाच्या पथकाने खोक्याच्या घरी छापा टाकला तर त्याच्या घरी घबाडंच सापडलं. धारदार शस्त्र, जाळी, वाघूरसह आणि अनेक आक्षेपार्ह गोष्टी वनविभागाला आढळून आल्या आहेत. आता खोक्याभोवतीचा फास अावळला जात आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बीड जिल्ह्यात असे अनेक छोटे- मोठे आका आहेत. जे कधी वाळू तस्करी करुन, राखेची तस्करी करुन, कॉन्ट्रॅक्टरशीप करुन तर कधी खंडणी वसूली करुन अल्पावधीत कोट्यधीश बनले आहेत. त्यांना ना पैशाची किंमत आहे ना माणसाच्या जीवाची. ते पैशासाठी काहीही करायला मागे पुढे पाहात नाहीत. मग अशाच गुंडांना हेरुन काही राजकीय नेते आपल्या टोळ्या निर्माण करत आहेत व सर्वसामान्य लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करत आहेत. बीड जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा त्यांना अखेच अस्तित्वात आणायची असेल तर सर्वात आधी या जिल्ह्यात चांगले, आक्रमक व प्रामाणिक पोलिस अधिकारी आणून अशा आकांचा व त्यांच्या टोळ्यांचा बंदाेबस्त करावा लागेल. जे राजकीय पक्ष, नेते अशा गुंडांना आशीर्वाद देतात त्यांचाही बंदोबस्त करावा लागेल. तरच उद्या भविष्यात वाल्मीक कराड, खोक्या भोसलेसारखे गुंड निर्माण होणार नाहीत.