बारामतीत आमच्या घरी जेवायला यायचं हं… शरद पवार यांचे एकनाथ शिंदे- फडणवीसांना लेखी निमंत्रण

Sharad-pawar-invites-eknath-shinde-devendra-fadnavis-baramati बारामतीतील कार्यक्रमात सरकारला शरद पवारांचा विसर; पण पवारांनी गांधीगिरी करत मुख्यमंत्र्यांनाच लाजवले

बारामती : राज्य सरकारच्या कौशल्यविकास मंत्रालयामार्फत बारामतीत २ व ३ मार्च रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शरद पवार (Sharad Pawar’s Vidya Pratisthan in Baramati)  यांच्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या मैदानावरच हा कार्यक्रम होत आहे. तरीही स्थानिक खासदार म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule), ज्येष्ठ खासदार व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असूनही शरद पवार यांचे नाव मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत घेण्यात आलेले नाही. मात्र त्याबद्दल फारशी नाराजी जाहीर न करता शरद पवारांनी ‘गांधीगिरी’  पद्धतीने (Sharad Pawar’s Gandhigiri)  सरकारच्या या कृतीला प्रत्त्युत्तर दिले आहे.

Sharad-pawar-invites-eknath-shinde-devendra-fadnavis-baramati

शरद पवार यांनी आपल्या लेटरहेडवर मुख्यमंत्र्यांच्या नावे एक पत्र लिहिले आहे. (Sharad Pawar’s Invitation Letter to Cm Eknath Shinde)  त्यात पवार म्हणतात… ‘आपण २ मार्च रोजी शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामतीत येत असल्याचे समजते. सदर कार्यक्रमात सांसद सदस्य म्हणून उपस्थित राहण्यास मला व सुप्रिया सुळे यांना आवडेल. सदर कार्यक्रम विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर होत आहे. या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने विद्या प्रतिष्ठानमध्ये मी आपले यथोचित स्वागत करु इच्छितो. त्यासाठी संस्थेच्या अतिथी निवासात मी आपणास चहापानासाठी निमंत्रित करतो.’

मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांसोबत गोविंदबागेत या…

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच बारामतीत येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे. माझ्या ‘गोविंदबाग’ येथील निवासस्थानी आपण सस्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा, याबाबत मी आपणास दूरध्वनीवरुन यापूर्वीच निमंत्रण दिलेले आहे. कृपया या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणासोबत येणाऱ्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसोबत आपण या निमंत्रणाचाही स्वीकार करावा, ही अपेक्षा आहे.’ या पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

 शरद पवारांच्या पत्राचे ४ राजकीय अर्थ 

sharad-pawars-dinner-diplomacy-in-baramati

  • बारामतीत कार्यक्रम आयोजित करुन शक्तीप्रदर्शनाचा अजित पवारांचा प्रयत्न आहे. त्यामुळे स्थानिक खासदार असूनही शरद पवार, सुप्रिया सुळे यांची नावे निमंत्रण पत्रिकेत घेण्यात आली नाहीत. शासकीय कार्यक्रमात पवारांना निमंत्रण टाळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. याची सरकारला जाणीव करुन देण्यासाठी शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच गांधीगिरी पद्धतीने निमंत्रण पाठवून लज्जित करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जरी मला डावलले तरी आमची संस्कृती तशी नाही. आमच्या बारामतीत मुख्यमंत्री येणार असतील तर त्यांचे स्वागत करण्याची आमची परंपरा आहे, हा संदेश जनतेत देण्यासाठी पवार गटाकडून हे पत्र माध्यमांत व्हायरलही करण्यात आले, हे विशेष.
  • अजित पवार यांनी हा रोजगार मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या विस्तीर्ण मैदानावर आयोजित केला आहे. विद्या प्रतिष्ठान ही संस्था शरद पवार यांनीच उभी केली आहे. अजित पवार आता त्यावर हक्क दाखवत असले तरी या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष मीच आहे हे या पत्रातून अप्रत्यक्षपणे शरद पवारांनी सर्वांसमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
  • कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवार, सुप्रिया सुळे यांची नावे नाहीत. मात्र ‘बारामतीतील कार्यक्रम असल्याने स्थानिक संसद सदस्य या नात्याने यावेळी उपस्थित राहणे आम्हाला आवडेल’ असा टोलाही पत्रात सरकारला लगावण्यात आला आहे. म्हणजे महायुती सरकार विरोधकांना डावलण्याचे राजकारण करत असले तरी आम्ही आमचा मान-पान बाजूला ठेऊन केवळ बारामतीकरांसाठी या कार्यक्रमास हजर राहण्यास उत्सुकत आहोत, असा संदेश बारामतीच्या मतदारांपर्यंत पोहोचवून त्याचा भावनिक फायदा उचलण्याची खेळी शरद पवार यांनी या निमित्ताने खेळली असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ सदस्यांना जेवणासाठी घरी निमंत्रित केले आहे. या पत्राच्या प्रतिलिपी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. राजकीय वैर कितीही असले तरी फडणवीस यापूर्वी अनेकदा पवारांसोबत जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले आहेत. त्यामुळे शिंदेंनी स्नेहभोजनाच निमंत्रण स्वीकारले तर फडणवीसही त्यांच्यासोबत जाऊ शकतील. पण आपल्या काकांच्या घरी जाण्याचे धाडस आता अजित पवार करतील का? हा प्रश्न आहे. याच निमित्ताने पवारांनी अजितदादांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. जर दादा काकांकडे गेले तर अजूनही शरद पवार व अजित पवार हे आतून एकच आहेत हा संभ्रम निर्माण करण्यात एेन निवडणुकीच्या तोंडावर यश येईल. व दादा काकांच्या घरी गेले नाही तर ‘पवार साहेबांना मोठ्या मनाने घरी बोलावले तरी राजकीय महत्त्वकांक्षेने पछाडलेल्या दादांनी कृतघ्नता दाखवत त्यांच्याकडे पाठ फिरवली’ अशी चर्चा बारामतीकरांमध्ये घडवून आणली जाण्यास वाव मिळू शकतो. ज्याचा काही प्रमाणात का होईना दादागटाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics