दादांच्या आमदाराविरोधात पवारांचा आणखी एक डाव
अपात्रतेच्या निर्णयाला ५ महिन्यानंतर कोर्टात आव्हान
जनतेच्या न्यायालयात शरद पवार जिंकले…
मुळ राष्ट्रवादीत शरद पवारांसोबत राहिलेले १३ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची अजितदादा गटाची मागणीही विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली होती. त्यावेळी शरद पवारांनी अध्यक्षांचा निर्णय लोकशाहीविरोधी असल्याची टीका केली, मात्र या निर्णयाला कोर्टात आव्हान देणे टाळले होते. त्यापेक्षा जनतेच्या कोर्टात जाऊन न्याय मागू, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. चार महिन्यांनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचे नवे नाव व नवीन चिन्ह घेऊन शरद पवार लोकांच्या न्यायालयात गेले. तिथे त्यांना भरभरुन प्रतिसाद मिळाला. लोकसभेला शरद पवारांनी १० उमेदवार उभे केले त्यापैकी ८ निवडून आले. त्याउलट अजितदादा गटाने ४ उमेदवार उभे केले, त्यांचा एकच खासदार निवडून आला इतर ३ पराभूत झाले. स्वत: अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारही बारामतीतून हरल्या. एकूणच लोकांच्या न्यायालयात शरद पवार जिंकले अन् अजित पवार हरले.
शरद पवार देणार दादांना धोबीपछाड…
आता ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यातही अजितदादांना धोबीपछाड देण्याची तयारी शरद पवारांनी केली आहे. लोकसभेतील अपयशानंतर दादा गटाचे काही आमदारही शरद पवारांनी गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. १२ जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीतही दादा गटाचे हे काठावरच्या आमदारांचे मते फोडून शरद पवारांनी अजित पवारांचा दुसरा उमेदवार पाडण्याची प्लॅनिंग केली आहे. महाशक्तीच्या मदतीने अजित दादांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद व घड्याळ चिन्ह मिळवले तरी त्यांना राजकीय मैदानात पुरेपूर मात देण्याचे नियोजन पवार गटाकडून केले जात आहे. निवडणुकीच्या मैदानात ही तयारी सुरू असताना अचानक शरद पवारांनी दादांना कायदेशीर पेचात पकडण्यासाठीही आणखी एक डाव टाकला आहे.
शिवसेना व धनुष्यबाण कोणाचा?
कालपर्यंत जे पवार आमदार अपात्रतेच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याच्या मन:स्थितीत नव्हते, त्यांना लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर अचानक आपली भूमिका बदलली. ८ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. त्यावर आता २३ जुलै रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. एकूणच, जुलै महिना हा राजकीय घडामोडींबरोबरच न्यायालयीन प्रकरणांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. १५ जुलै रोजी ‘शिवसेना व धनुष्यबाण कोणाचा?’ या याचिकेची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेतील त्रुटींचा फायदा घेत बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांच्याएेवजी एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
शरद पवारांचे आव्हाण…
दुसरी महत्त्वाची सुनावणी १६ जुलै राेजी होत आहे. अजित पवारांनी पक्षात बंड करताना राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ हे निवडणूक चिन्ह आपल्या ताब्यात घेतले होते. निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादीतील घटनेच्या त्रुटींचा आधार घेत हा निर्णय वैध ठरवला होता. त्याला शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याची सुनावणी १६ जुलै रोजी होत आहे. एकनाथ शिंदेंसोबत बंड करणाऱ्या ४० आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले होते. त्याविरोधात उद्धव सेनेचे सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी 19 जुलै राेजी होणार आहे. तर अजित दादांचे आमदार पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर २३ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.एकूणच हा महिना राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या घडामोडींचा व राजकीय खटल्यांसाठी निर्णायक ठरणार आहे.