शिवसेना पक्ष,धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंचे की शिंदेचे ? २ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात निर्णय

मुंबई : दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरेंची (Udhav Thackeray) साथ सोडली. इतकेच नव्हे तर शिंदे यांनी पक्षही ताब्यात घेतला. नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींचे संख्याबळ शिंदेंकडे जास्त असल्याच्या निकषावर त्यांनाच शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह बहाल केले. त्याविरोधात उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर २ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी होणार आहे.

सुरुवातीला दोन्ही गटांनी खरी शिवसेना आमचीच असा दावा केला तेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवले होते. मात्र नंतर सर्वाधिक आमदार व खासदार शिंदे गटाकडे असल्याचे मान्य करत या दोन्ही गोष्टी शिंदे गटाला बहाल केल्या. उद्धव ठाकरेंकडे (Udhav Thackeray) सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे पक्षाचे नाव असून त्यांचे चिन्ह मशाल आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निकाल देणे अपेक्षित आहे.

शिंदेंना मिळाले तर काय होईल…

न्यायालयाने शिंदेंकडे (Eknath shinde) शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह कायम ठेवले तर आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या नावावर मते मागण्यास शिंदे गटाला फायदा होईल. तसेच भाजप- शिवसेना ही नैसर्गिक युती असल्याचे मतदारांना सांगून भाजपलाही त्याचा फायदा होऊ शकेल. मात्र जर न्यायालयाने शिंदेंचा (Eknath shinde)  हक्क नाकारला तर मात्र या गटाला नवे निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकांना सामोरे जावे लागेल.

ठाकरेंना मिळाले तर काय होईल…

न्यायालयाने उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना पुन्हा शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह बहाल केले तर त्यांच्याकडे सध्या असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व मशाल हे चिन्ह गोठवले जाईल. या निर्णयामुळे पक्षफुटीने खिळखिळी झालेल्या उद्धव ठाकरेंच्या गोटात पुन्हा मोठा उत्साह संचारेल. ठाकरे म्हणजेच शिवसेना हे समीकरण सिद्ध होईल. इतकेच नव्हे तर ‘धनुष्यबाणा’च्या ओढीने पुन्हा एकदा फुटलेले किंवा शिंदे गटाकडे गेलेले कार्यकर्ते ठाकरेंकडे आकर्षित होतील. त्यामुळे उद्धव यांच्या गटाचे बळ वाढू शकेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics