३०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या मुलीला शरद पवारांची उमेदवार

एकेकाळचे अजित पवार यांचे कट्टर समर्थक, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या राखीव मतदारसंघाचे आमदार व अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात मोठा आर्थिक घोटाळा केल्यामुळे तुरुंगात गेलेले आराेपी अशी रमेश कदम यांची अोळख आहे. २०२३ मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी नव्याने राजकीय कारकिर्द सुरु करण्याची तयारी केली. त्यासाठी कधी महायुती तर कधी महाविकास आघाडी अशा दोन्ही ठिकाणी संबंध वाढवले. लोकसभेला त्यांनी सोलापूरमध्ये महायुतीला पाठिंबा दिला तर विधानसभेला ते महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून मोहोळमधून शरद पवार गटाने त्यांच्या मुलीला तिकिट दिले अाहे. काय आहे यामागची रणनिती जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून….

२०२३ मध्ये कदम जामिनावर सुटले…

रमेश कदम हे सर्वप्रथम २०१४ मध्ये राष्ट्रवादीकडून मोहोळचे आमदार झाले. या काळात त्यांनी मागेल त्याला टँकर, मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्या ठिकाणी रस्ता अशा लोकप्रिय कामांचा धडाका लावल्याने ते लोकप्रिय झाले होते. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ३१२ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली त्यांना ८ वर्षे तुरुंगवास झाल्याने त्यांची प्रतिमा लोकांच्या मनातून उतरली. पक्षानेही त्यांची हकालपट्टी केली. पण २०२३ मध्ये कदम जामिनावर सुटले आहेत. ते अजित पवारांचे समर्थक मानले जायचे. मात्र आता त्यांनी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

एमआयएमचीही रमेश कदमांना ऑफेर…

विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रमेश कदम यांनी महायुतीला अनूकूल भूमिका घेतली हाेती. मोहोळ येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी सोलापूर लोकसभेत आपला पाठिंबा मोदी व भाजपला असल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे या सभेला शिंदेसेनेचे मंत्री तानाजी सावंत हेही उपस्थित होते. त्यांनी तर रमेश कदम हा माझा जीवश्च कंठश्च मित्र असून आगामी काळात ते दिसून येईल, अशी स्तुतीसुमनेही उधळली होती. त्या काळात एमआयएमनेही कदम यांना लोकसभेची उमेदवारी आमच्या तिकिटावर लढवा, अशी ऑफर दिली होती. पण कदम यांचा विधानसभेवर डोळा होता. त्यामुळे त्यावेळी त्यांनी लोकसभेत उमेदवारी घेतली नाही.

पंढरपुरात कदमांना मानणारा मोठा वर्ग…

काही आठवड्यांपूर्वीच रमेश कदम यांनी शरद पवारांची भेट घेत मोहोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असल्याने उमेदवारी नाकारण्यात आली. मात्र शरद पवार गटाने आता कदम यांची मुलगी सिद्धी कदम यांना मोहोळ (जि. सोलापूर) मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. शरद पवारांच्या सर्वच उमेदवारांपैकी २६ वर्षीय सिद्धी ही सर्वात कमी वयाची उमेदवार आहे. मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे. अटकेत असताना रमेश कदम यांनी २०१९ ची निवडणूक लढवली होती, तेव्हा २१ वर्षाची असलेल्या सिद्धीने त्यांची प्रचार यंत्रणा सांभाळली होती. रमेश कदम हे मातंग समाजातून असून या समाजाची मोठी संख्या आहे. तसेच मोहोळ आणि पंढरपूर परिसरात रमेश कदम यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तुरुंगात असताना ज्या ज्या वेळी ते जामीनातून बाहेर यायचे त्या त्यावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी व्हायची. २०२३ मध्येही तुरुंगातून सुटल्यावर त्यांचे धूमधडाक्यात स्वागत झाले होते. हाच मतदार आता निवडणुकीत् त्यांच्या मुलीसोबत राहिल का? हे २३ नोव्हेंबरलाच कळून येईल.