अजिंठा अर्बन बँकेच्या माध्यमातून ९७ कोटींचा घोटाळा करणारे छत्रपती संभाजीनगर येथील काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड अखेर पोलिसांना शरण आले. शेकडो ठेवीदारांचे पैसे लाटल्याप्रकरणी १५ महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यापासून झांबड फरार होता. तो शहरात फिरत हाेता, मात्र पोलिसांना काही सापडत नव्हता. यादरम्यान त्याने सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. त्यामुळे अखेर शरण येण्याशिवाय झांबडला पर्याय नव्हता. या केसमध्ये पोलिसांवर मात्र संशयाने पाहिले जाते. कारण झांबड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याचे सांगितले जात असताना पोलिस मात्र त्याला पकडून शकत नव्हते. काय अाहे झांबड याचा घोटाळा… जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून
ठेवीदारांचा विश्वासघात…

छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष असलेले झांबड काँग्रेसचे माजी आमदार. तत्कालिन औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते निवडून आले होते. मात्र नंतर विधानसभेत ते पराभूत झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. गाड्यांचे शोरुम, बांधकाम व्यावसायिक म्हणून ते परिचित आहेत. अजिंठा को ऑपरेटिव्ह बँकही त्यांनी काढली आहे. झांबड यांच्यावर विश्वास ठेऊन शेकडो लोकांनी या बँकेत ठेवी गुंतवल्या होत्या. मात्र झांबड याने या ठेवीदारांचा विश्वासघात केला. ठेवींवर जास्त व्याजाचे आमिष दाखवून त्याने जास्त अापल्या बँकेत जास्त ठेवी आणल्या. पण बँकेचे संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ३६ खोटे व बनावट एफ.डी. वर आपल्या जवळच्या लोकांना विनातारण कर्ज दिले. खोटी व बनावट नोंदी घेऊन खोटाच हिशोब तयार केला. २०१६ ते २०२३ या सात वर्षाच्या काळात झांबड व त्याच्या संचालकांनी असे ९७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे ऑडिटमध्ये लक्षात आले. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन प्रशासक सुरेश पंडितराव काकडे यांनी १८ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरुन चेअरमन सुभाष मानकचंद झांबड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप एकनाथ कुलकर्णी, सनदी लेखापाल सतीश मोहरे, चेतन गादिया, भूषण शहा, दीपाली कुलकर्णी यांच्यासह १ मार्च २००६ ते ३० ऑगस्ट २०२३ च्या संचालक मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध ९७ कोटी रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली असून अजून २६ जणांवरील कारवाई प्रस्तावित आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून झांबड मात्र फरार होता.
अटकेचे संकट टाळण्यासाठी अनेक प्रयत्न…

अापल्या राजकीय वर्चस्वाचा फायदा घेत त्याने अटक टाळण्यासाठी खूप प्रयत्न केले. ज्या ठेवीदारांचे पैसे बँकेत अडकलेले आहेत, ते बँकेचे उंबरठे झिजवून थकले. मात्र प्रशासकीय कार्यवाही सुुरु असल्याने त्यांचे पैसे मिळण्यास उशिर होत होता. इकडे झांबड मात्र आपल्यावरील अटकेचे संकट टाळण्यासाठी प्रयत्न करत होता. पोलिसांच्या नोंदीनुसार झांबड फरार होता. पण तो छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्याच्या परिसरातच असायचा. अनेकांनी त्याला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलेही होते, पण पोलिस मात्र डोळ्यावर पट्टी बांधून केवळ फरार असल्याचे सांगत हाेते. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही शंका उपस्थित केली जात होती. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने मात्र झांबड यांचे अटक टाळण्याचे सर्व प्रयत्न उधळून लावले. त्यांचा अटकपूर्व जामिन मंजूर केला नाही. त्यामुळे अखेर त्याला पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता. तसे झाले नसते तर त्याची संपत्ती जप्त होण्याची नामुष्की आली असती. अखेर ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झांबड पोलिसांना शरण आला. आता त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
झाबंडचे भाजप प्रवेशाचे प्रयत्न…?

आता तुरुंगातून लवकरात लवकर कसे बाहेर पडायचे व घोटाळ्यात कशी क्लीनचिट मिळवायची यासाठी झांबडचे प्रयत्न सुरु आहेत. आपल्या राजकीय वर्चस्वाचा वापर करुन तो सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, झांबड याने निवडणुकीच्या पूर्वी भाजपात जाण्याचाही प्रयत्न केला होता, पण एेन निवडणुकीच्या तोंडावर हे बालंट आपल्या माथी नको म्हणून भाजपनेही त्यांना झिडकारल्याचे समजते. यापूर्वी बीडमधील तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे हेही ज्ञानराधा पतसंस्थेच्या माध्यमातून असेच लोकांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याच्या प्रकरणात अारोपी असताना त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. तेव्हा भाजपची मोठी बदनामी झाली होती. हा अनुभव गाठीशी असल्यामुळे भाजपने झांबड यांना पक्षात प्रवेश दिला नसल्याचेही सांगितले जाते.
अखेर पोलिसांना शरण…

सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला, सत्ताधारी पक्षांनीही अभय देण्यास नकार दिल्यामुळे अखेर झांबडला पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता. आता झांबड विरुद्ध खटला चालू होईल. या गुन्ह्यात कोणकोण आरेापी आहेत याची चौकशीही त्याच्याकडे केली जाईल. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमधीलच आदर्श महिला सहकारी बँकेचा प्रमुख अंबादास मानकापे यानेही ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बुडवले आहेत. त्यालाही पोलिसांनी अटक केली असून त्याचा मुलगाही अनेक दिवस फरार होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. मराठवाड्यात पतसंस्था, सहकारी बँका उभ्या करुन त्या माध्यमातून लोकांच्या ठेवी लाटण्याचा मोठा गोरखधंदा सुरु झालेला आहे. सुभाष झांबड, अंबादास मानकापे हे त्याचे म्होरके आहेत. त्यांच्यासारखे अनेक व्हाईट कॉलर गुन्हेगारी आपल्या समाजात वावरत अाहेत. केवळ कायद्याचा धाक नसणे व पोलिसांशी आर्थिक सलोखा असल्यामुळे अशा गुन्हेगारांचे फावते व सामान्य गुंतवणूकदारांची आयुष्यभराची पुंजी लूटली जाते. अशी अनेक उदाहरणे आहेत. आता १५ महिन्यांनी का होईना झांबड पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. आता तो किती दिवस तुरुंगात राहतो की आपल्या राजकीय वलयाचा वापर करुन लगेच जामीनावर बाहेर येतो, ते पाहणे महत्त्वाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकांचे पैसे त्याने लुटले अाहेत ते सरकार त्याच्याकडून कसे वसूल करते हेही पाहणे महत्त्वाचे आहे.