नवी दिल्ली : यावर्षीच्या संसद रत्न (Sansad Ratn) पुरस्कारासाठी देशभरातील ५ खासदारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अभिमानास्पद बाब म्हणजे या ५ पैकी २ खासदार महाराष्ट्राचे आहेत. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे (कल्याण) (Shrikant shinde) व राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (शिरुर) (Amol kolhe) यांचा त्यात समावेश आहे. श्रीकांत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपूत्र आहेत. इतर तीन खासदारांमध्ये सुकांत मुजूमदार व सुधीर गुप्ता (दोघेही भाजप) व कुलदीप राय शर्मा (काँग्रेस) यांचा समावेश आहे. १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत पुरस्काराचे वितरण होणार आहे. लोकसभेत व मतदारसंघात केलेल्या कामगिरीच्या आधारे चेन्नईतील प्राईम पॉइंट फाउंडेशन ही संस्था दरवर्षी हे पुरस्कार जाहीर करते.
सुप्रिया सुळेंनी गमावले स्थान
ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या व राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांना आतापर्यंत सलग ७ वेळा संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सलग इतक्या वेळा हा सन्मान मिळवणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रीयन खासदार आहेत. यावर्षी मात्र या गौरवशाली पुरस्काराच्या यादीतील स्थान त्यांनी गमावले आहे.
लोकसभेत निलंबनाची कारवाई
लोकसभेत नुकतीच दोन युवकांनी घुसखोरी केली होती. सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या त्रुटीमुळे हा प्रकार झाला असून त्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरत गदारोळ केला होता. त्यामुळे शंभराहून अधिक खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते. त्यात सुप्रिया सुळे (Supriya sule) यांचेही नाव होते.