आकाच्या आकाची भेट; सुरेश धस, तुम्ही चुकलातच !

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात आवाज उठवणारे, विधिमंडळात प्रश्न मांडणारे, खंडणीखोर वाल्मीक कराड व त्यांचा ‘आका’ म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आवाज उठवणारे भाजपचे अामदार सुरेश धस यांनी दोन महिन्यात जे नाव कमावले ते अवघ्या चार – साडेचार तासांच्या बैठकीने गमावले. एकीकडे धनंजय मुंडेंवर आरोपांचा वर्षाव करायचा व दुसरीकडे बंददाराआड त्यांच्याशी चार- साडेचार तास चर्चा करायची ही धस यांची दुटप्पी नीती आता उघड झाली आहे. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दाेघांमधील वाद मिटवण्यासाठी मांडवली केल्याचे समोर आले आहे. ज्या संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी राज्यभर बोंबा ठोकणाऱ्या धस यांना अचानक मुंडेंबद्दल इतकी सदिच्छा कशी काय निर्माण झाली? हा प्रश्न आता जनता विचारत आहे. मुंडेंची सदिच्छा भेट घेऊन धस यांनी चुकच केली आहे? म्हणतात ना.. बूंद से गई सो हौद से नही आती.. आता धस यांनी कितीही न्यायाच्या गोष्टी केल्या तरी तुम्ही मांडवलीसाठी गूपचूप मुंडेंना भेटलात ही तुमची चूकच होती…. हे धस यांना मान्यच करावे लागेल. या भेटीमागचे राजकीय अर्थ जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून….

धाडसी धसांचे अनेक खुलासे…

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आवाज उठवण्याचे धाडस केले म्हणून आमदार सुरेश धस यांचे नाव सर्वत्र गाजले. या प्रकरणापाठोपाठ परळीतील राख माफिया, वाळू माफिया, खंडणीखोरांची टोळी ही सर्व प्रकरणे धस यांनी बाहेर काढली. इतकेच नव्हे तर या खंडणीखोरांचे, या तस्करांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी कसे संबंध आहेत हे प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे समोर आणण्याचे धाडसही धस यांनी दाखवले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच खंडणीखोर वाल्मीक कराड तुरुंगात जाऊ शकला. देशमुख हत्याप्रकरणात त्याचीही चौकशी करण्याचे धाडस सरकार करु शकले. या सर्व गुंडांच्या टोळीला मंत्री धनंजय मुंडे यांचे अभय असल्याचे धस वारंवार सांगत आले आहेत. ‘आकाचे आका’ असा उल्लेखही ते मुंडे यांना उद्देशूनच करत होते.

मुंडे-धस आता मिटवूनच घ्या…

कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या खात्यात झालेला ५०० कोटींचा पीक विमा घोटाळा, बीडचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली ८०० कोटींच्या विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरु केलेली चौकशी हे सर्व धस यांच्या पाठपुराव्याचेच यश होते. अनेक प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना त्यांना मंत्रिमंडळात अभय देण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तेव्हाच आता ही नेतेमंडळी धस व मुंडे यांना कुठेतरी तडजोड करायला, मांडवली करायला लावतील अशी शंकेची पाल मनात चुकचुकत होती. अन‌् झालेही तसेच. गुन्हा करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या या सरकारमधील सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी करत धनंजय मुंडे व सुरेश धस या दोघांची त्यांच्या घरी बंदद्वार भेट घडवून आणली. ‘आता मिटवून घ्या’ असा संदेशही त्यांना देण्याचा प्रयत्न केला.

सदिच्छा भेट घेण्याएवढा कळवळा का?

विशेष म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एखादे निवेदन देण्यासाठी जातानाही माध्यमांचा ताफा घेऊन जाणाऱ्या आमदार धस यांनी मुंडेंशी झालेल्या भेटीबाबत मात्र मौन का राखले? ही भेट गोपनीय का ठेवली? अशी शंका आता उपस्थित होत आहे. इतकेच नव्हे तर डोळ्याचे ऑपरेशन ‌झाल्याचे निमित्त करुन मुंडे यांच्या घरी जाऊन आमदार धस यांनी त्यांची सदिच्छा भेटही घेतल्याचे अाता उघडकीस आले आहे. ज्या धनंजय मुंडेंवर तुम्ही वारेमाप अारोप करत, वाल्मीक कराड सारख्या गुंडांना पोसणारे ‘आका’ म्हणून ज्यांचा तुम्ही उल्लेख करता त्यांच्याबद्दल अचानक धस यांच्या मनात ममत्व कसे काय निर्माण होते? हा प्रश्न जनता विचारत आहे. ‘कुणी आजारी असेल तर त्यांना भेटायला जाण्यात गैर काय?’ असा प्रश्न वर तोंड करुन आमदार धस जनतेला, माध्यमांना विचारत आहेत. पण धनंजय मुंडे हे काही गंभीर आजारी नाहीत. त्यांच्या दोन्ही डोळ्यांचे साधे मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले आहे. साधारण आजकाल असे आॅपरेशन झाले की तास- दोन तासात रुग्णाला घरी सोडले जाते. म्हणजे हा विषय इतका काही गंभीर राहिलेला नाही. विशेष म्हणजे या ऑपरेशन नंतर मुंडेंच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेण्याची तसदी घेतली नाही. मग अशा किरकोळ आजारपणातही मुंडे यांना भेटण्यास धस यांना कळवळा का आला? हा प्रश्न आहे. ज्या राजकीय नेत्यावर तुम्ही परळी तालुक्यात व बीड जिल्हयात कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याचे आरोप करता, अनेकांचे जीव घेणाऱ्या टोळ्यांना अभय ज्या माणसाने दिल्याचे तुम्ही सांगता ते किरकोळ आजारी पडले तरी त्यांची सदिच्छा भेट घेण्याएवढा कळवळा तुमच्या मनात कसा काय जागृत झाला? हा प्रश्न आहे.

धसांना अडकवण्याचा राजकीय ट्रॅप?

आमदार धस, कालपर्यंत लोक तु्म्हाला मुंडेंच्या दादागिरीविरोधात आवाज उठवणारा धाडसी नेता म्हणून ओळख होते. अर्थात तुम्हीही राजकारणी आहात. तुमच्यावरही यापूर्वी काही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेतच. म्हणजे तुम्हीही धुतल्या तांदळाचे नाहीत हेही जनता जाणून आहे. तरीही एका कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून तुम्ही जो लढा देत आहात म्हणून त्ुमच्या पाठीशी बीड जिल्ह्यातील जनता खंबीरपणे उभी राहिली होती. पण तुम्ही या जनतेचा विश्वासघात केलात. कदाचित, तुम्हाला अडकवण्याचा हा राजकीय ट्रॅपही असू शकेल. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार काही घेत नाहीत. नैतिकता शिल्लकच नसल्याने मुंडेही राजीनामा स्वत:हून देतील अशी काही शक्यता राहिलेली नाही, मग अशा वेळी हे मुंडे प्रकरण किती ताणायचे? असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडला असावा. म्हणूनच बावनकुळे सारखा भाजपचा प्रदेशाध्यक्ष व एक जबाबदार मंत्री या प्रकरणात मांडवली करण्यासाठी पुढे येत असला तरी धस साहेब, या ट्रॅपमध्ये तुमच्यासारखा राजकीय मुरब्बी नेता अडकू शकत नाही. तुम्हाला अंधारात ठेवून बावनकुळे धनंजय मुंडे यांना तुमच्या भेटीसाठी आणू शकत नाहीत. बरं तुम्ही म्हणता त्या रितीने जर मुंडे तुम्हाला माहिती नसताना तिथे आले असतील तर ज्या माणसाचा तुम्हाला इतका राग आहे तो तिथे असताना तुम्ही चार- साडेचार तास तिथे त्यांच्यासेाबत काय करत बसला होता? याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला धस यांनी द्यायला हवे.

देशमुख कुटुंबीयांचा धसांकडून विश्वासघात?

बरं, कदाचित बावनकुळेही खोटं बोलत असतील. पण मग मुंडेंच्या तब्येतीचे कारण पुढे करुन दुसऱ्यांदा तुम्ही त्यांना भेटायला का गेला होता? ज्या माणसाविरोधात तुम्ही आवाज उठवत आहात, ज्या प्रवृत्तीविरोधात लढा देत असल्याचे नाटक तुम्ही करत आहात त्याच माणसांशी इतका स्नेह अचानक धस का दाखवू लागले आहेत? असे अनेक प्रश्न आज राज्यातील जनता उपस्थित करत आहे. एकूणच, गेल्या देान महिन्यात संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी धस यांनी जे प्रयत्न केले, त्यांच्यावर विश्वास ठेऊन जे हजारेा लोक रस्त्यावर उतरले होते त्या सर्वांचा व विशेषत: देशमुख कुटुंबीयांचा धस यांना विश्वासघात केलाय हा आरोपात नक्कीच तथ्य आहे. धस साहेब, तुम्ही जनतेचा विश्वास गमावलात. त्यामुळे आता एक तर या लढ्यातून तुम्ही माघार घ्या किंवा स्वत:च्या आमदारकीचा राजीनामा देऊन या चुकीचे प्रायश्चित घेण्याचे धाडस तरी दाखवा.