धनंजय मुंडेंचा राजीनामा, आता धसांचे टार्गेट पंकजा मुंडे

एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरुन राजकारणात आलेले व प्रसंगी त्यांच्याही विरोधात राजकीय भूमिका घेणारे आमदार सुरेश धस यांनी आता धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या बहिण भावाविरोधात दंड थोपटले आहेत. महायुतीत असूनही धस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरेापांची राळ उठवून त्यांना मंत्रिपदावरुन पायउतार होण्यास भाग पाडले. आता त्यांनी दुसऱ्या मंत्री व आपल्याच भाजप पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याविरोधातही आघाडी उघडली आहे. इतके दिवस गप्प असलेल्या पंकजा यांनीही आता धसांचे प्रकरण धसास लावण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून धसही पक्षविरोधी कारवायांचा पंकजा यांच्यावर ठपका ठेवून तक्रार करणार आहेत. या राजकीय लढाईचे नेमके कारण काय व त्याचे परिणाम काय होणार आहेत… जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…

अन् सुरेश धस अर्धी लढाई इथेच जिंकले…

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ज्या आक्रमक रितीने लावून धरले आहे, त्याचाच परिणाम म्हणजे तीन महिन्यांनी का होईना धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांचे राईट हॅन्ड समजला जाणारा खंडणीखोर वाल्मीक कराड याने आवादा कंपनीला मंत्री मुंडेंच्या बंगल्यावरुन खंडणी मागितली, याच खंडणीखोरांच्या टोळीला विरोध केल्यामुळे त्यांनी सरपंच देशमुख यांची हत्या केली, त्याचा मास्टरमाईंट वाल्मिक कराडच आहे हे आमदार धस यांनी मस्साजोग गावापासून ते थेट विधानसभेपर्यंत पोटतिडकीने सांगितले. धनंजय मुंडे मात्र वारंवार या आरेापांचे खंडन करत राहिले. मात्र सीआयडीने आरोपपत्र दाखल केले, तेव्हा त्यात खंडणी व खून प्रकरणात वाल्मिक कराड हा नंबर एकचा आरोपी असल्याचे नमूद करण्यात आल्यानंतर मात्र सरकारवर दबाव वाढला. गेले तीन महिने जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद वाचवण्याचा प्रयत्न करत होते त्यांनाही मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव टाकावा लागला. देशमुखांची ज्या क्रूरतेने हत्या करण्यात आली त्याची छायाचित्रे प्रकाशित झाल्यानंतर तर काही क्षणात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. इथे सुरेश धस अर्धी लढाई जिंकले. आता देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवेपर्यंत आपण गप्प बसणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे.

पंकजा मुंडे जाणीवपूर्वक गप्प..?

बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला वाल्मीक कराडसारख्या टोळ्या व त्यांचे आका धनंजय मुंडे हे जबाबदार आहेत असे धस वारंवार सांगतात. त्याच बरोबर धनंजय यांच्या बहिण व भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही आता धस यांनी आरोप करण्यास सुरुवात केली आहे. धस यांचा आक्षेप हा आहे की, ज्या सरपंच देशमुख यांची हत्या झाली तो भाजपचा बूथप्रमुख होता, त्यांचा भाऊ धनंजय हाही भाजपचा कार्यकर्ता होता, मग जर आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांची अशी निर्घृण हत्या होत असताना भाजपच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे गप्प का होत्या? पीडित देशमुख कुटुंबीयांची गावात जाऊन सांत्वनपर भेट घेण्यासही पंकजा यांना वेळ मिळाला का नाही? असे प्रश्न धस विचारत होते. या प्रकरणात आपला भाऊ धनंजय मुंडे यांचे नाव आल्यामुळे पंकजा यांना भाजप कार्यकर्ता देशमुख याच्यापेक्षा भावाची पाठराखण करणे योग्य वाटले, असाच धस यांच्या बोलण्याचा अर्थ निघत होता. पण पंकजा मुंडे मात्र मौन बाळगून होत्या. आधीच वेगवेगळ्या वादात अडकल्याची किंमत त्यांना चुकवावी लागली होती, याची जाणीव असल्याने यावेळी त्या जाणीवपूर्वक गप्प होत्या.

धसांना समज देण्याची पंकजा मुंडेंची मागणी…

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर मात्र पंकजा मुंडे यांनी मौन सोडले. या प्रकरणात धनंजय यांनी आधीच राजीनामा घ्यायला हवा होता, ज्यांनी तो घ्यायला पाहिजे त्यांनीही आधीच राजीनामा घ्यायला हवा होता असे सांगून त्यांनी फडणवीस व अजित पवार यांनाही यात दोषी धरले. त्याच्याही पुढे जाऊन सरपंच खून प्रकरण घडल्यामुळे व त्यात धनंजय यांच्या निकटवर्तीयांचे नाव आल्यामुळे धनंजय यांच्या मंत्रिपदाची शपथच व्हायला नको होती, असे मतही पंकजा यांनी व्यक्त केले होते. दाेन- तीन महिन्यांनी मौन सोडलेल्या पंकजा यांचा समाचार घेण्यास संधी आमदार धस यांनी सोडली नाही. ‘आता हत्ती गेलाय अन‌ शेपूट राहिल्यावर पंकजा मुंडे का बोलत आहेत? ’ असा टोलाही त्यांनी लगावला. पण आता पंकजा मुंडे पुन्हा आपल्या मुळ स्वभावानुसार आक्रमक झालेल्या दिसत आहेत. धस यांना उत्तर देताना त्यांनी ‘मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी माझ्यावर थेट आरोप केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना ‘समज’ द्यावी,’ अशी मागणी त्यांनी केली.

मुंडे विरुद्ध धस वादामागे कारण नेमके काय?

त्यावर धस यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले. ‘माझे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होते, त्यांचा राजीनामा आम्ही घेतलाय. पंकजा यांनी फक्त पीडित देशमुखांच्या घरी का भेट दिली नाही एवढेच माझे म्हणणे होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यासारखे मी काय केलेय? उलट विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनीच मी भाजपचा उमेदवार असताना अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. जर पंकजा भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत तर त्यांनी कमळाचा प्रचार करायचा सोडून आष्टीत शिट्टीचा प्रचार का केला? असा जाब विचारुन याबाबत मीच पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार असल्याचे प्रतिआव्हान आमदार धस यांनी दिले. एकूणच, धस व मुंडे यांची जुगलबंदी चांगलीच रंगली आहे. देशमुख खून प्रकरणात अडचणीत आलेले धनंजय मुंडे थेट धस यांच्याबद्दल काहीच बोलत नाहीत. एव्हाना ते सध्या कुणाबद्दलच काहीच बोलत नाहीत. पण भावाचे मंत्रिपद गेल्याचा राग मनात धरुन पंकजा मात्र आता धस यांच्याविरोधात बोलू लागल्या आहेत. पण या मुंडे विरुद्ध धस वादामागे मंत्रिपद हे कारण असल्याचे बोलले जाते.

मंत्रि‍पदासाठी धसांची नाराजी…

महायुतीचे सरकार सत्तेवर येत असताना बीड जिल्ह्यातून दोन मंत्रिपदे दिली जाणार होती. त्यापैकी विद्यमान मंत्री असल्याने धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद राष्ट्रवादीच्या कोट्यातून निश्चित होतेच. तर भाजपच्या कोट्यातून आपल्याला मंत्रिपद मिळावे अशी धस यांची अपेक्षा होती. याचे कारण म्हणजे आपण जनतेतून निवडून आलो आहोत अन‌् पक्षात सिनियर आहोत. पंकजा मुंडे या गेल्या विधानसभेला व आताच्या लोकसभेला पराभूत झाल्या आहेत. तसेच तरीही त्यांना मंत्रिपद दिले तर मुंडेंच्या एकाच घरात दोन दोन मंत्रिपदे होतील, त्यामुळे आपला दावा भक्कम असल्याचा धस यांच्या समर्थकांचा दावा होता. पण भाजपने मुंडे बहिण- भावालाच मंत्रिपद देण्यास पसंती दर्शवली. यामुळे धस नाराज होतेच. त्यातच सरपंच देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण समोर आल्याने धस यांनी या प्रकरणात नेतृत्व धनंजय मुंडे यांच्याविरोधात आघाडीच उघडली. पंकजा मुंडे यांच्याविरोधातही अप्रत्यक्ष त्यांची मोहिम सुरुच होती. कारण विधानसभेत पंकजा मुंडे यांनी आपल्याला सहकार्य न केल्याचा धस यांना राग आहे. निकाल लागल्यानंतरच्या पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी ते बोलूनही दाखवले होते. म्हणूनच सरपंच देशमुख हत्याप्रकरण समोर करुन धस यांनी पंकजा व धनंजय या दोन्ही मुंडेंना बीडचे पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी केली होती व तसे करण्यास अजित पवारांना भाग पाडले होते.

पंकजा मुंडेंविरोधात धसांना फडणवीसांचे बळ…?

बीड जिल्ह्यात उफाळून आलेला मराठा विरुद्ध ओबीसी या वादाचही मुंडे- धस वादाला किनार आहेच. मुंडे ओबीसी नेत्या आहेत तर धस मराठा आंदोलकांचे समर्थक आहेत. मात्र या दोघांच्या वादामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी मात्र आगामी काळात आणखी वाढणार आहे. दोघेही एकमेकावर आरोप करत पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. आता पुढील ५ वर्षे पंकजा मुंडे मंत्री राहणार आहेत. त्या बीडच्या पालकमंत्री नसल्या तरी आता धनंजय मंुडे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा या बीडमध्ये एकमेव मंत्री राहिल्या आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतील यात शंकाच नाही. आमदार धस यांच्याकडून मात्र ते रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. एका मंत्र्यापेक्षा आमदाराचे महत्त्व वाढल्याचे सध्या बीड जिल्ह्यात दिसत आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्याविरोधात आमदार धस यांनी उघडलेल्या मोहिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचे वेळोवेळी दिसून आले. त्यामुळेच धस यांच्या मोहिमेला बळ मिळाले. आता धस यांनी जर पंकजा यांच्याविरोधातही मोहिम उघडली तर त्यालाही फडणवीस यांच्याकडून बळ दिले जाऊ शकते, अशी शंका व्यक्त होत आहे. कारण भाजपमधील अंतर्गत राजकारणात फडणवीस व पंकजा मुंडे हा अंतर्गत संघर्ष २०१४ पासून धगधगत आहे. पंकजा यांनी यापूर्वी फडणवीस यांच्यावर अनेकदा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष आरोपही केलेले आहेत. तसेच पंकजा या फडणवीस यांच्या प्रतिस्पर्धी म्हणूनही मानल्या जातात. या सर्व गोष्टींमुळे धस यांच्या मोहिमेला बळकटी देण्याचे फडणवीस गटाकडून प्रयत्न झाले तर आश्चर्य वाटायला नको.