ठाकरेंची कौटुंबिक युती राजकीय शत्रूत्व संपवणार?

लोकसभा झाली, विधानसभा झाली. एका निवडणुकीत महाविकास आघाडीला तर दुसऱ्यात महायुतीला विजय मिळाला. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे सुरू आहे. महाराष्ट्रात प्रत्येक निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे अलिकडे घडू लागली आहेत. यातूनच मनसेला महायुतीत घेण्याचे किंवा उद्धव सेनेकडून आघाडीला तिलांजली देण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या सर्व गदारोळात शिवसेनाप्रेमी जनतेकडून किंवा ठाकरेप्रेमी जनतेकडून वारंवार एक प्रस्ताव दिला जातोय… की उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी एकत्र यावे. पण इगोस्टिक असलेले दोघेही ठाकरे बंधू त्याचा विचारही करत नाहीत. त्यांच्यात विस्तवही जात नाही, असे शत्रूत्व असल्याचे वरकरणी भासवले जात असले तरी कौटुंबिक पातळीवर ते एकच असल्याचे गेल्या दोन- तीन महिन्यातील तीन घटनांवरुन दिसून आले आहे. मग मनातून नसले तरी किमान मराठी जनतेच्या आग्रहाखातर का होईना, आपल्या राजकीय अस्तित्वासाठी का होईना मन मारुन तरी ठाकरे बंधूंनी एकदा एकत्र येण्याचा प्रयोग करायला काय हरकत आहे? अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. मिशन पॉलिटिक्समधून जाणून घेऊ या मागचे राजकारण काय आहे ते…

ठाकरे कुटुंबीयांमध्ये मनमोकळी चर्चा…

महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा राज ठाकरेंची मनसेंचा पराभव होतो किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची दयनीय अवस्था होते तेव्हा तेव्हा दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असा सूर ठाकरे प्रेमी जनता, कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत असतो. गेल्या २- ३ महिन्यात झालेल्या घटनांमधून या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. राजकीयदृष्ट्या एकमेकांना पाण्यात पाहणे ठाकरे बंधू कौटुंिबक संबंध मात्र चांगल्या रितीने सांभाळून असल्याचे दर्शन या तीन घटनांमधून दिसून आले. १५ डिसेंबर २०२४ रोजी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांचे मुंबईत लग्न झाले. ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्याला राज ठाकरे सहकुटुंब हजर होते. तिथे उद्धव व राज यांची व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मनमोकळी चर्चा झाली. यानंतर २२ डिसेंबर २०२४ ला राज ठाकरे यांच्या बहिणी जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाचे लग्न झाले. दादर येथील राजे शिवाजी विद्यालयात झालेल्या या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब उपस्थिती लावली होती. तिथेही दोन्ही कुटुंबीयांनी काही वेळ एकत्र घालवला.

ठाकरे बंधुंनी एकत्र यावे? जनतेच्या मनात काय?

आता २३ फेब्रुवारी २०२५ रोजी एक बडे सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाचे मुंबईत लग्न झाले. तिथेही ठाकरे बंधूंची भेट झाली. उद्धव यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि राज यांच्यासोबत त्यांची पत्नी शर्मिला होत्या. उद्धव, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगली चर्चा झाली. या तीन भेटींमधून तरी या दोन्ही भावंडांमध्ये किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये हाडाचे वैर आहे असे कुठेही जाणवले नाही. यापूर्वीही संकटाच्या काळात दोन्ही भावंडांनी एकमेकाची आस्थेवाईकपणे विचारपूस केल्याच्या घटना घडलेल्या अाहेत. पण दोघांनीही राजकीयदृष्ट्या एकत्र यावे या मागणीला मात्र हे दोघेही प्रतिसाद देत नाहीत. कदाचित कौटुंबिक संबंध वेगळे व राजकीय भूमिका वेगळ्या, अशा रितीने हे दोघेही पाहात असावे. पण जर मराठी जनतेच्या हितासाठी आम्ही राजकारण करतो, अशा गप्पा हे दोघेे बंधू मारत असतील तर मग याच जनतेच्या भल्यासाठी का होईना, मराठी माणसाच्या हितासाठी का होईना या दोघांनी मन मारुन एकत्र येण्याचा प्रयोग करुन पाहिला तर बिघडले कुठे? अशा प्रतिक्रिया ठाकरेप्रेमी जनतेतून व्यक्त होत आहेत. पण त्या ठाकरे बंधूंपर्यंत पोहोचतात का? हा खरा प्रश्न आहे.

शिवसेना भवनासमोर ठाकरे बंधुंचे बॅनर…

विधानसभा निवडणुकीत उद्धव सेना व मनसेला मोठा पराभव सहन करावा लागला. इतकेच काय तर पहिल्यांदाच विधानसभेच्या मैदानात उतरलेले राज ठाकरेंचे पूत्र अमित यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यातही उद्धव ठाकरेंचा ताठरपणा राज यांना नडल्याचे दिसून आले. मुळात उद्धव सेनेचे उमेदवार पाडण्यासाठीच भाजपने राज ठाकरेंच्या मनसेला स्वतंत्रपणे मैदानात उतरवले होते, असे सांगितले जाते. मग जर मनसेच उद्धव सेनेच्या मुळावर उठली असेल तर मग उद्धव यांच्याकडून अमित ठाकरेंना सहकार्याची अपेक्षा तरी कशी काय ठेवता येईल. पण या दोन्ही भावंडांच्या भांडणाचा भाजपसारखा पक्ष फायदा उचलत आहे हे मात्र खरे. याची जाणीव करुन देण्यासाठी व बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे पक्ष जगवण्याच्या हेतून ठाकरेंच्या हितचिंतकांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर दोन्ही भावांना एकत्र येण्याचे आवाहन करणारे बॅनरही लावले होते. पुण्यातही असे बॅनर लावण्यात आले होते. परंतु, दोन्ही भावांकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

दोघांच्या भांडणात कोणाचा लाभ?

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ… अशी आपल्या मराठीत म्हण आहे. अगदी तेच चित्र उद्धव सेना व मनसे यांच्यातील वादात भाजपचा लाभ घेत असल्याचे दिसून येते. मुंबई मनपात उद्धव सेनेला हरवण्यासाठी भाजपला मनसेची गरज वाटतेय. उद्धव ठाकरेंचे सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेनेत फूट पाडून आपले उद्दिष्ट साध्य करुन घेतले. आता महायुतीच्या सरकारमध्ये शिंदेसेना असली तरी त्यांची कोंडी करण्याचा सातत्याने प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. मात्र सत्तेच्या मोहापायी शिंदेसेनेला तोंड दाबुन बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. उद्या मुंबई मनपा जिंकली तर भाजप मनसेच्या बाबतीतही हेच करणार आहे. मुळात आधीच महायुतीत वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांची भरती वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी शिवसेनेचे कधीही जुळले नाही, हीच अजित पवारांची राष्ट्रवादी आता भाजपला शिंदेसेनेपेक्षा जास्त प्रिय झाली आहे.जिथे ज्याचा उपयोग होतो तिथे करायचा व आपला फायदा करुन घ्यायचा असे भाजप हायकमांडचे सूत्र आहे. त्यामुळेच जे उद्धव सेनेचे झाले, शिंदेसेनेचे झाले तेच उद्या मनसेचेही करण्यास भाजप मागेपुढे पाहणार नाही.

ठाकरे बंधुंकडे ही शेवटचीच संधी?

दुसरीकडे, केवळ सत्तेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याची केलेली चूक आता उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलीय. या निर्णयाची मोठी किंमत त्यांना भोगावी लागत आहे. पण आता यातून बाहेर पडण्यासाठी किंवा भाजपला चेकमेट करण्यासाठी जनतेने नाकारलेली काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी त्यांच्या कामाला येणार नाही. तर उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोन भावांनी जर हातमिळवणी केली तर महाराष्ट्राला प्रादेशिक पक्षांचा एक तगडा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. आजपर्यंत उद्धव ठाकरे व राज ठाकरेंनी जी विश्वासार्हता गमावली आहे ती पुन्हा कमावण्याची व बाळासाहेब ठाकरेंवर निस्सीम प्रेम करणारा मतदार पुन्हा आपल्याकडे वळवण्याची ही शेवटची संधी ठाकरे बंधूंकडे असू शकते. मात्र त्यासाठी दोन्ही भावंडांना आपण भाऊ आहोत याची जाणीव करुन घ्यावी लागेल. कौटुंबिक पातळीवर जो स्नेह, जो जिव्हाळ हे कुटुंब दाखवत आहेत तो सार्वजनिक पातळीवर, राजकीय पातळीवरही दाखवावा लागेल. तरच मराठी माणसाच्या हिताच्या नावाखाली त्यांनी स्थापन केलेले पक्ष टिकतील. तरच ठाकरेंच्या पुढच्या पिढ्यांना राजकारणात काही स्थान राहिल. अन्यथा भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष केवळ त्यांचा ‘यूज अॅन्ड थ्रो’ असाच वापर करतील यात शंकाच नाही.

ठाकरे बंधुंनी एकत्र येणे ठरणार फायदेशीर?

आता भाजप इतका मजबूत व महाकाय पक्ष बनला अाहे की त्याला ना उद्धव सेना एकटी टक्कर देऊ शकते ना गलितगात्र झालेली मनसे. यापुढच्या राजकारणात जर टिकून राहायचे असेल तर मनसेला एक तर भाजपच्या हातचे प्यादे बनावे लागेल अन्यथा उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करुन स्वाभिमानाने झेप घ्यावी लागेल. दोन्ही ठाकरे बंधूंचा स्वभाव पाहता ते भाजपच्या ताटाखालचे मांजर होऊन राजकारण करणार नाहीत, मग दोन्ही भावंडांना एकत्र येणे हाच पुढचा पर्याय जास्त फायदेशीर ठरु शकतो असे सामान्य जनतेला वाटते. अापापले इगो बाजूला ठेऊन, महत्त्वाकांक्षेला मुरड घालून जर राज व उद्धव ठाकरे एकत्र आले तरच महाराष्ट्रात मराठी जनतेच्या हिताचे राजकारण होऊ शकते, अशी ठाकरेप्रेमी जनतेची अपेक्षा अाहे. म्हणूनच ही जनता सातत्याने ठाकरे बंधूंनी एक व्हावे, अशी साद घालत आहे. त्यांच्या भावनांचा जर या भावंडांनी विचार केला नाही तर मात्र या दोघांच्या पक्षाचा अस्त कुणीही रोखू शकणार नाही, हे तितकेच खरे.