शक्तीशाली भाजप ठाकरेंना का घाबरतो?

१९९० च्या दशकात एक कार्टुन फारच प्रसिद्ध झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या घरात एका खुर्चीवर बसलेले आहेत अन‌् त्यांच्या समोरही एकच खुर्ची आहे. त्यावर दोन्ही पाय ठेवून ठाकरे जागावाटपाची चर्चा करायला आलेल्या भाजप नेत्यांना कुच्छितपणे ‘बसा’ असे म्हणतात… यावरुन त्याकाळी बाळासाहेब ठाकरेंसमोर बसण्याचीही भाजपची हिंमत होत नव्हती, हे दिसून येते. मात्र कालांतराने महाराष्ट्रात भाजप ताकदवान होत गेला व शिवसेना दुबळी. बाळासाहेबांच्या अस्तानंतर तर शिवसेना कमकुवत होत गेली, आता तर तिचे दोन तुकडे पकडले आहेत. भाजपने एकनाथ शिंदेंकरवी शिवसेनेत जो स्फोट घडवून आणला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या उद‌्ध्वस्त झाले आहेत. दुसरीकडे बाळासाहेबांच्या हयातीतच वेगळा पक्ष स्थापन करणाऱ्या राज ठाकरेंच्या हातीही फारसे काही लागलेले नाही. अशा परिस्थितीतही भाजपला ठाकरेंची धास्ती का वाटतेय..? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. जाणून घेऊ या यामागचे कारण मिशन पॉलिटिक्समधून..

अन् महाराष्ट्रात भाजची पुन्हा एकहाती सत्ता…

२०१९ मध्ये भाजपला बाजूला सारत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून नवी आघाडी स्थापन करत मुख्यमंत्रिपद मिळवले. राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपसाठी हा अनपेक्षित मोठा धक्का होता. पण अडीच वर्षातच भाजपने संपूर्ण खेळ पलटवून टाकला व शिवसेनेत फूट पाडून पुन्हा आपली सत्ता आणली. भाजपने टाकलेला हा प्रतिडाव इतका जोरदार हाेता की त्यात उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष, चिन्ह व अनेक मातब्बर शिलेदार गमावले. सत्ताही गमावली. नंतर २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी कायम ठेवत भाजपला पुन्हा हादरा दिला. चारशे पारचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपची महाराष्ट्रात जी पिछेहाट झाली त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही नामुष्की ओढावली. हे अपयश भाजपने कसेबसे पचवले व विधानसभेत नवीन रणनीती आखून उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी पुन्हा मोठा झटका देत महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता अाणली.

ठाकरेंचा राग नेमकं कुणावर?

हे सर्व राजकीय नाट्य होत असताना दुसरे ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे हे कधी भाजपच्या बाजूने तर कधी भाजपच्या विरोधात भूमिका बदलताना दिसले. तरीही भाजप व शिंदेसेनेने मात्र त्यांच्याशी जवळीकता काही सोडली नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तरीही भाजपला या निवडणुकीत काही यश मिळाले नाही. महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलत असल्याची जाणीव या निकालाने करुन दिली. त्यामुळे राज ठाकरेंनी विधानसभेला पुन्हा भूमिका बदलत महायुती व महाविकास आघाडीविरोधात स्वबळावर निवडणूक लढवली. इथे मात्र उलटेच झाले. या निवडणुकीत महायुती भरघोस मताधिक्यांनी विजयी झाली, आघाडीचे पानिपत झाले अन‌् मनसेच्या पदरी भोपळा आला. या निवडणुकीती अपयशामुळे उद्धव व राज हे दोन्ही ठाकरे बंधू निराश झाले. लोकसभेतील यशाच्या धुंदीत उद्धव होते, त्यामुळे ते विधानसभेला गाफिल राहिले. तर युतीशी जुळवून घेतले असते व स्वबळाचा नाद सोडला असता तर मनसेची किमान चार- पाच आमदार तरी आज असते, अशा प्रतिक्रिया मनसैनिकातून येत आहेत. राज ठाकरेंना खुद्द त्यांचा मुलगा अमितलाही निवडून आणता आले नाही, ही मोठा नामुष्की त्यांच्या पदरी आली. अर्थात या पराभवाबद्दलचा राज ठाकरेंचा राग भाजपपेक्षा शिंदेसेनेवर आहे. त्यांच्याच उमेदवारामुळे अमितला पराभव पत्कारावा लागला. अन‌ दोघांच्या भांडणात दादर- माहिममध्ये उद्धवसेनेचा आमदार निवडून आला.

राज ठाकरेंचा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित…

हे सगळे पराभवाचे रामायण झाल्यानंतर दोन महिन्यांनी राज ठाकरेंना जाग आली व त्यांनी आपल्या अपयशाचे ईव्हीएमवर खापर फोडले. काँग्रेसचे बालेकिल्लेही कसे ढासळू शकतात? असा प्रश्नही उपस्थित करुन त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याच्या विरोधकांच्या सुरात सुर मिसळला. एकूणच यावेळी राज ठाकरेंची भूमिका पुन्हा भाजपविरोधात गेल्याचे दिसून आले. कालपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव सेनेचे नेते जे बोलत होते, तीच भाषा आता राज ठाकरेही बोलू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून येतो, त्यांचे ४१ आमदार कसे निवडून येऊ शकतात?’ असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला. त्यावरुन अजित पवारांनीही ‘तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही अन‌् आम्हाला सांगताय?’ असा टोला लगावला. यावरुन दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये बरेच वाक‌्युद्ध रंगले. एकूणच, मनसेचा भाजप, शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरील राग विधानसभेनंतर दिसून आला. तरीही एक दिवस अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली, यावरुन महाराष्ट्रातील जनतेसोबतच भाजपचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवार व एकनाथ शिंदे यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. जो माणूस आपल्यावर संशयाने बोट दाखवतोय त्याच्याला शरण जाण्याची गरज काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पण त्यामागेही भाजपला असलेली ठाकरेंची धास्ती हेच कारण असल्याचे सांगितले जाते.

भाजपला आता मनपा निवडणूकांचे वेध…

एका निवडणुकीत यश मिळाले की दुसऱ्या निवडणुकीत गाफील राहणे, ही भूमिका भाजप कधीही घेत नाही. नाही तर त्यांचाही उद्धव ठाकरे होण्यास वेळ लागणार नाही. विधानसभेत भरघोस यश मिळाले असले तरी भाजपला आता मनपा निवडणुकीची चिंता अाहे. मित्रपक्ष शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादीही स्वबळाची भाषा करु लागल्याने या चिंतेत भर पडली आहे. विशेषत: मुंबई मनपा ताब्यात घेण्याचे स्वप्न यंदा भाजपला पूर्ण करायचे आहे. विधानसभेत उद्धव सेनेचे पानिपत झालेले असले तरी मुंबईकरांनी मात्र त्यांची साथ सोडलेली नाही. उद्धव सेनेचे राज्यात २० आमदार निवडून आले, त्यापैकी दहा एकट्या मुंबईतील आहेत. स्वबळावर मुंबई मनपा भाजप जिंकू शकत नाही, याची खात्री फडणवीस यांना आहे. इतकी उद्धव ठाकरेंची भाजपला धास्ती आहे. शिंदेसेना, राष्ट्रवादी या महायुतीतील मित्रपक्षांचे मुंबईत फारसे वजन नाही. मग जर इथे उद्धव ठाकरेंना मात द्यायची असेल तर राज ठाकरेंना सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राज काहीही बोलू द्या, त्याकडे दुर्लक्ष करुन त्यांना मुंबई मनपा निवडणुकीत सोबत घ्यायचे प्रयत्न भाजपकडून होताना दिसतात.

मनपा निवडणूकांत भाजपसमोर दोन्ही ठाकरेंचे आव्हान?

बरं, मनसेचे तरी मुंबईत फारच वजन आहे का? तर याचे उत्तरही नाही असेच येईल. पण म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधार. जर राज ठाकरेंनी स्वबळावर मुंबई मनपा लढवली तर भाजपसमोर उद्धव व राज ही दोन आव्हाने असतील. एकीकडे उद्धव व दुसरीकडे राज ठाकरेंनी जर भाजपविरोधात मुंबईत रान उठवले तर त्यांना जिंकणे अवघड जाईल. विशेषत: राज ठाकरेंच्या आरेापांना उत्तर देणे भाजपला सोपे नसेल, ही धास्ती फडणवीस यांना आहेच. त्यामुळे राज यांना सोबत घेतले तर उद्धवशी दोन हात करणे साेपे जाईल, असे भाजपला वाटते. या बदल्यात मनसेला एखादी आमदारकी देण्याची ऑफरही भाजप देऊ शकते. विशेषत: विधानसभेत अमित ठाकरे पराभूत झाल्याची जी सल राज यांच्या मनात आहे, ती दूर करण्यासाठी अमित यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे औदार्यही भाजप दाखवू शकते, अशी चर्चा अाहे. अर्थात फडणवीस घरी आले म्हणजे राज ठाकरे ही ऑफर स्वीकारतीलच असे नाही.

राज ठाकरेंची भाजपविरुद्ध भूमिका?

आधीच, वारंवार भूमिका बदलणारा नेता म्हणून राज ठाकरेंची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यातच आता ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उभे करुन त्यांनी पुन्हा भाजपविरोधी भूमिका जाहीर केली आहे. अन‌ काही महिन्यातच पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली तर राज ठाकरेंच्या रंगबदलू प्रतिमेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल व मुंबईची जनता त्यांना अजिबात प्रतिसाद देणार नाही, हे नाकारता येणार नाही. म्हणूनच एखाद्या आमदारकीचे गिफ्ट घेऊन आपला पक्ष भाजपकडे गहाण ठेवण्यापेक्षा स्वबळावर लढून पुन्हा एकदा आपले संघटन, पक्षीय ताकद आणखी बळकट करण्याची आलेली संधी राज ठाकरे साेडणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांना वाटते. ‘गरज सरो अन‌ वैद्य मरो’ ही भाजपची मित्रपक्षांसोबत भूमिका आहे, हे लपून राहिलेले नाही. उद्या मनसेच्या मदतीने भाजपने मुंबई मनपा जिंकली तर मग पुढचे ५ वर्षे त्यांना कुणालाही, अगदी मनसेलाही विचारण्याची गरज भासणार नाही. आज महायुतीतील मित्रपक्ष असलेली शिंदेसेना या गोष्टीचा अनुभव घेत आहे. तीच गत उद्या राज ठाकरेंची होऊ शकते. त्यातही अमित ठाकरेंसाठी आमदारकीची ऑफर स्वीकारली तर अनेक वर्षे मनसे व राज ठाकरेंच्या निष्ठेपायी झटणाऱ्या बाळा नांदगावकरसारख्या निष्ठावंतांवर अन्याय केल्याची भावनाही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये वाढू शकते. म्हणूनच भाजपकडून आलेल्या आमदारकीच्या ऑफरचा स्वार्थी विचार बाजूला सारुन मनसे स्वबळावर लढण्यावरच भर देतील, अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. आता राज ठाकरे यावर काय निर्णय घेतात, की भाजपच्या भुलभुलय्याला तेही बळी पडतात हे लवकरच कळेल.