५०० कोटींच्या घोटाळ्यात अडकेले ठाकरेंचे निकटवर्तीय आमदार रवींद्र वायकर ईडीची अटक टाळण्यासाठी शिंदेगटात

जोगेश्वरीतील मनपाचा ५०० कोटींचा भूखंड लाटल्याचा आरोपावरुन ईडीकडून सुरु आहे चौकशी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना अजून एक धक्का दिला आहे. ठाकरेंचे निकटवर्तीय, जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waykar) यांनी १० मार्च रोजी शिंदेसेनेत प्रवेश केला.

आमदार वायकर (MLA Ravindra Waykar) तीन टर्मचे आमदार आहेत. मविआच्या काळात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदही भूषवले होते. मुंबई मनपात ते तीन टर्म नगरसेवक होते. स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारीही ठाकरेंनी त्यांच्यावर सोपवली होती.

जोगेश्वरी भागातील मनपाचा १३,६७४ चौरस फूट भूखंड लाटून आमदार वायकर (MLA Ravindra Waykar) यांनी त्यावर फाईव्ह स्टार हॉटेल बांधल्याचा आरोप आहे. 500 crore land scam in Jogeshwari बाजारभावानुसार या जागेची किंमत ५०० कोटींच्या घरात आहे. या प्रकरणाची ईडीत तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने दोन- तीन वेळेस आमदार वायकर यांची चौकशी केली. या प्रकरणात त्यांच्या पत्नीचेही नाव आहे. चौकशीनंतर वायकर व त्यांच्या पत्नीला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असे संकेत मिळाले होते. त्यामुळे वायकर यांनी १० मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश करुन ‘अटकेपासून संरक्षण’ मिळवले, अशी चर्चा होत आहे.

कोकणात बेकायदा बांधकाम
Illegal construction in Konkan

ठाकरे कुटुंबीयाचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या वायकर यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या मदतीने अलिबागजवळ बेकायदेशीरपणे बंगले बांधले. त्यातून मोठी आर्थिक कमाईही केली अशी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी ईडीकडे केली होती. त्याचीही चौकशी सुरु होती. या प्रकरणात वायकर यांना लवकरच अटक होईल, असा दावा सोमय्या करत होते. मात्र आता शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर वायकर यांच्यावर कारवाई होते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचा दावा फेल

ईडीच्या पथकाला चौकशीसाठी आपण सहकार्य करत आहोत. पक्ष सोडण्यासाठी सत्ताधारी हे दबावाचे राजकारण करत आहेत. मात्र काहीही झाले तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे आमदार वायकर माध्यमांसमोर छातीठोकपणे सांगत होते. मात्र अचानक मतदारसंघाच्या विकासाचा कळवळा आल्यासारखे दाखवून त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. ‘जोगेश्वरी परिसराच्या विकासासाठी आपण एकनाथ शिंदेंसोबत आलो आहोत,’ असे वायकर पक्षप्रवेशानंतर म्हणाले.

देहबोलीतून स्पष्ट झाले दबावाचे राजकारण Pressure politics seen through body language

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्या भाषणात आमदार वायकर, त्यांच्या पत्नी व समर्थकांचे शिवसेनेत स्वागत केले. वायकरांविषयी असलेले सर्व संभ्रम आता दूर झाले असल्याचे शिंदे म्हणाले. मात्र मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना व समर्थकांकडून वायकरांचा जयघोष सुरु असताना आमदार वायकर दांपत्याच्या चेहऱ्यावर मात्र कणभरही हास्य नव्हते. कुठल्या तरी दबावाखाली ते वावरत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरुन व देहबोलीतून स्पष्ट दिसत होते. त्यांच्या पत्नी तर बराच वेळ खाली मान खालून बसलेल्या दिसत होत्या.

ईडीच्या धाकाने पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची मोठी यादी Change of party due to fear of ED

ईडीच्या धाकाने अनेक नेते भाजप, शिंदेसेनेत प्रवेश करत असल्याचे गेल्या दोन वर्षात दिसून आले. शिवसेनेचे भावना गवळी (Bhawana Gawali), आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul), अर्जुन खोतकर (Arjun Khotkar), यशवंत जाधव (Yashwant Jadhav), प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar), सुनील तटकरे (sunil Tatkare), प्रफुल पटेल (Praful Patel), हसन मुश्रीफ (Hasan Musharrif), छगन भुजबळ (Chagan Bhujbal) या नेत्यांमागे ईडीसह विविध तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा सुरु होता. त्यामुळे त्यांनी सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी करण्याचा पर्याय निवडल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे पक्षप्रवेशानंतर या नेत्यांमागची चौकशी थंडबस्त्यात पडल्याचेही दिसून आले. त्यात आता वायकर यांची भर पडल्याचे सांगितले जाते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics