बीड : बीड जिल्ह्यातील उद्धव सेनेच्या अंतर्गत राजकारणामुळे माजी जिल्हाप्रमुख व विद्यमान सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत.
पत्रकार परिषदेत अनिल जगताप म्हणाले ‘मी १९८६ पासून शिवसेनेत आहे. उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख अशा पदांवर काम केले. बीड जिल्ह्यात पक्ष वाढवला. २००९ मध्ये मला विधानसभेची उमेदवारी मिळणार होती, मात्र अर्ध्या रात्रीतून निर्णय बदलला. हा पहिला अन्याय होता. मात्र पक्षाचा निर्णय मान्य करुन आम्ही काम करत राहिलो. २०१९ मध्ये जिल्हाप्रमुख पदावरुन पायउतार केले. ४ वर्षे कुठलेही पद नव्हते. तरी पक्षाचे काम इमाने इतबारे करत होतो. आता मध्यंतरी पुन्हा एकदा जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी काढण्यात आली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
अंधार सेनेला रामराम
उद्धव सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हस्तक्षेपामुळे बीड जिल्ह्यात पक्षात मोठी नाराजी आहे. त्यावर टीका करताना जगताप म्हणाले, ‘पक्षात आता अंधार सेनेचे वर्चस्व वाढले आहे. त्यांनी पक्षात अंधार करायचे ठरवले आहे. माझे पद काढण्यासाठी ‘गठुड्या’चे व्यवहार झाले. पक्ष संपवण्याची सुपारी घेतलेल्या या टोळीला कुणीही रोखत नसल्याची खंत आहे. ज्यांनी पक्षासाठी आयुष्यभर काम केले त्यांचीच हकालपट्टी केली जात आहे. त्यामुळे अशा अंधार सेनेला आमचा कायमचा रामराम. ९ जानेवारी मी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खऱ्या शिवसेनेत प्रवेश करत आहे, अशी भूमिका जगतपा यांनी मांडली.