उद्धव ठाकरेंची पुढची लढाई आधी सुप्रीम कोर्टात मग मतदारांच्या न्यायालयात

मुंबई : सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्ष, केंद्रीय निवडणूक आयोगाकडील शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह वाचवण्याची व विधानसभा अध्यक्षांकडील शिंदेसेना अपात्र ठरवण्याची लढाई उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हरले आहेत. महाशक्तीच्या भक्कम पाठिंब्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना प्रत्येक वेळी चितपट केले. आता ठाकरेंची (Udhav Thackeray) पुढची लढाई पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात (supreme court) असेल. शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर २ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला पात्र ठरवलेल्या निर्णयालाही ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारच आहे. या दोन खटल्यात भक्कम पुराव्यांसह युक्तिवाद करुन बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्याची संधी ठाकरेंच्या हाती आहे. त्यासाठी त्यांना जोरकस प्रयत्न करावे लागतील. या खटल्यांमध्ये मात्र अपयशी आले तर मात्र आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या न्यायालयात जाऊन न्याय मागणे हा अंतिम पर्याय ठाकरेंसमोर (Udhav Thackeray) असेल.

केवळ शाब्दिक कोट्यांचे बुडबुडे नकोत

शिवसेना पक्षफुटीपासून जनतेत उद्धव ठाकरेप्रती (Udhav Thackeray) सहानुभूती आहे. याची जाणीव भाजप, शिंदेंसह (Eknath Shinde) महाशक्तीलाही आहे. म्हणूनच तर एकट्या शिंदेंच्या ‘कुबड्यां’वर आपले लोकसभेला ४५ जागांचे स्वप्न साकार होत नसल्याची जाणीव झाल्याने भाजपने अजित पवार (AjitPawar) गटालाही शरद पवारांपासून फोडले व आपल्या सत्तेत सामील करुन घेतले. आता उद्धव ठाकरेंप्रमाणेच शरद पवारांविषयीही (sharad pawar) जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन भाजप- शिंदेगटाच्या प्रबळ डावपेचाविरोधात लढण्याची रणनिती उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना करावी लागेल. केवळ  आपल्या भाषणातून शाब्दिक कोट्यांचे बुडबुडे उडवून चालणार नाही तर आपण आश्वासक चेहरा असल्याचा विश्वास जनतेला द्यावा लागेल.

महायुतीविरोधात प्रबळ उमेदवार द्यावा लागेल

सर्वच बंडखोरांना फार भवितव्य आहे, या भ्रमात स्वत: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व अजित पवारही (AjitPawar) नाहीत. त्यामुळे महायुतीच्या सर्व उमेदवारांविरोधात प्रबळ व केवळ जिंकून येण्याची क्षमता असलेल्या निकषावरच महाविकास आघाडीला उमेदवार उभा करावा लागेल. माझा- तुझा मतदारसंघ असे भांडण करत बसण्यापेक्षा त्यांना मेरिटवर उमेदवारीचा निर्णय घ्यावा लागेल. प्रसंगी प्रतिष्ठेसाठी अट्टहास करणाऱ्या खासदार संजय राऊतसारख्या नेत्याला बाजूला सारुन सर्व मित्रपक्षांशी समन्वयाने वागणाऱ्या नेत्याला समोर करावे लागेल. असे काही कठोर निर्णय घेतले आणि पूर्वी झालेल्या चुका दुरुस्त केल्या तरच उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या राजकारणाला महाराष्ट्रात भवितव्य आहे. मोदी- शहांना (narendra modi- amit shah) पायउतार करण्याच्या भाषणातून नुसत्या वल्गना करुन चालणार नाही तर त्यासाठी मित्रपक्ष काँग्रेस (congress) व राष्ट्रवादी (Ncp) यांच्यासोबत एकत्रित रणनिती ठरवावी लागेल. ती पूर्णत्वास कशी जाईल याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल.

लोकसभेला महायुतीचे ४५ जागांचे स्वप्न निम्म्यावरच रोखण्यात जरी महाविकास आघाडीला यश आले तरी विधानसभेला त्यांच्या तंबूत उत्साहाचे वातावरण असेल. अन्यथा उरलेसुरले ‘शिलेदार’ही लोकसभेचा निकाल पाहून सत्ताधाऱ्यांच्या छावणीत न बोलावता जाऊन बसतील, यात शंका नाही.