संभाजीनगरची जागा भाजप लढविणार ; आज अमित शहा राज्यात, महायुतीचे जागावाटप मार्गी लागणार

जळगावात युवकांचा मेळावा, अकोल्याच्या बैठकीत घेणार विदर्भातील ६ जागांचा आढावा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्रात नाशिक, सोलापूर व यवतमाळ येथे जाहीर सभा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. त्यांच्या पाठोपाठ भाजपमधील दुसरे दिग्गज नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ५ मार्च रोजी राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ते अकोल्यात निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. तर दुपारी जळगावात युवकांच्या मेळाव्यातला मार्गदर्शन करतील. सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर त्यांची जाहीर सभा होईल. महायुतीत शिवसेनेकडे असलेली संभाजीनगर लोकसभेची जागा आपल्याकडे खेचून घेण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. अमित शहाच्या सभेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत.
४ मार्च रोजी रात्री ११ वाजता अमित शहा यांचे संभाजीनगरात आगमन झाले. सोबत त्यांच्या पत्नीही होत्या. येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. रात्री शहा दांपत्याच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी जमले होते. यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही शहांसोबत होते. संभाजीनगरच्या मुक्कामात शहा संभाजीनगर, जालना व अहमदनगर या तीन मतदारसंघाचा आढावा घेतील.

विदर्भ, खान्देशचा आढावा घेणार

Amit Shah to review Vidarbha, Khandesh

५ मार्च रोजी सकाळी अमित शहा प्रमुख नेत्यांसोबत अकोल्यात जाणार आहेत. तिथे विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या ६ मतदारसंघांचा शहा आढावा घेतील. या जागांवरील संभाव्य उमेदवारांबाबतही भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतील. नंतर दुपारी जळगावात आयोजित युवकांच्या मेळाव्यास शहा मार्गदर्शन करतील. या भेटीत ते जळगाव व रावेर या दोन लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ते संभाजीनगरात परत येतील. ६.३० वाजता त्यांची संभाजीनगरात सभा होणार आहे. या सभेनंतर रात्री शहा मुंबईला जातील. तिथे त्यांचा मुक्काम आहे.

 

महायुतीचे रखडलेले जागावाटप मार्गी लागणार

Mahayuti seat-sharing will be on track

५ मार्च रोजी रात्री मुंबईत अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकत्रित चर्चा करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील महायुतीचे जागावाटप रखडले आहे. शिंदे सेना व अजित पवार गटाच्या काही जागांवर भाजपने दावा केल्यामुळे हा तिढा वाढला आहे. अमित शहा यातून मार्ग काढतील व याच बैठकीत महायुतीचे जागावाटप अंतिम होऊ शकते. ६ मार्च रोजी भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होतील, त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते. एकदा भाजपच्या काही उमेदवारांची नावे जाहीर झाली की लगेचच अजित पवार गट व शिंदे सेनाही आपले उमेदवार जाहीर करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics