पुन्हा देवेंद्रांची जादू, आघाडीची ११ मते फोडून निवडून आणले ९ आमदार
मुंबई : लोकसभा निवडणुकीत जनतेतून झालेल्या मतदानात भाजपसह महायुतीचा धुव्वा उडाला असला तरी विधान परिषद निवडणुकीत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा ‘चमत्कार’ सिद्ध करुन महायुतीला यश मिळवून दिले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात होते. भाजपचे ५, शिंदे सेनेचे २ तर अजित पवार गटाचे २ असे महायुतीचे एकूण ९ उमेदवार मैदानात होते. तर महाविकास आघाडीने ३ उमेदवार उतरवले होते. यात काँग्रेस, उद्धव सेना व शरद पवार गटाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
तर त्याचा कलंक आपल्या राष्ट्रवादी पक्षावर बसणार नाही…
विधानसभा आमदारांच्या गुप्त मतदानातून १२ जुलै रोजी ही निवडणूक झाली. महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीकडे २०० हून अधिक आमदारांचे संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षात फूट पडलेली असल्याने त्यांच्यात तीन उमेदवार निवडून आणण्याची क्षमता नव्हती. मात्र तरीही लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या आघाडीने तिसरा उमेदवार मैदानात उतरवण्याची रिस्क घेतली. हे करताना शरद पवारांनी मात्र स्वत:च्या पक्षाचा उमेदवार न देता मित्रपक्ष शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याची खबरदारी घेतली. म्हणजे उद्या घोडेबाजाराची वेळ आलीच तर आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार समोर हवा. अन् पराभव झालाच तर त्याचा कलंक आपल्या राष्ट्रवादी पक्षावर बसणार नाही याची काळजी शरद पवारांनी घेतली होती.
पवारांच्या पाठिंब्यावर उभे शेकापचे नेते पराभूत…
महाराष्ट्र विधानसभेत २८८ आमदार आहेत. पण सध्या १४ जागा रिक्त असल्याने एकूण २७४ आमदारांनी मतदान केले व सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. त्यात भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे , सदाभाऊ खोत. शिंदे सेनेच्या भावना गवळी, कृपाल तुमाने. अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि उद्धव सेनेचे मिलिंद नार्वेकर हे ११ जण विजयी झाले. तर शरद पवार यांच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला.
असे होते मतदानाचे गणित…
या निवडणुकीत विजयासाठी २३ मतांचा कोटा ठरवण्यात आला होता. मात्र एखादे बाद झाले तर पराभवाची रिस्क नको म्हणून बहुतांश पक्षांनी आपल्या उमेदवारासाठी २५ ते २६ मतांचा कोटा निश्चित केला होता. त्यामुळे युतीचा नववा किंवा आघाडीचा तिसरा उमेदवार बाद होणार हे निश्चित होते. भाजपकडे १०३, शिंदेसेनेकडे ३८, अजितदादा गटाकडे ४० आमदारांचे संख्याबळ होते. मित्रपक्ष व अपक्षांची संख्या धरुन महायुतीकडे २०३ मते होती. पहिल्या पसंतीची प्रत्येक उमेदवारास २३ मतेच गृहित धरली तर युतीच्या ९ उमेदवारांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २०७ मतांची गरज होती. प्रत्यक्षात त्यांनी २१४ मते मिळवली. म्हणजे महायुतीने ११ जास्त मते खेचून आणली. भाजपचे पंकजा मुंडे, याेगेश टिळेकर, परिणय फुके व अमित गोरखे हे चार उमेदवार प्रत्येकी २६ मते घेऊन विजयी झाले. तर सदाभाऊ खोत यांना पहिल्या पसंतीची २२ मतेच मिळाली. उर्वरित मतांचा कोटा त्यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतातून पूर्ण करुन विजय मिळवला.
प्रमुख तीन पक्षांच्या मतांनाही सुरुंग…
शिंदेसेनेचे दोन्ही उमेदवार भावना गवळी व कृपाल तुमाने अनुक्रमे २५ व २४ मते घेऊन विजयंी झाले. तर अजित पवार गटाचे शिवाजी गर्जे यांना २४ व राजेश विटेकर यांना २३ मते पडली. आता महायुतीने ही ११ मते कुठून फोडली याची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीसोबत छोटे मित्रपक्ष व अपक्षांची एकूण ७ मते होती. ही सर्व मते फुटली असे गृहित धरले तरी आणखी ४ मतांचा प्रश्न येतोच. म्हणजे केवळ अपक्षांचीच नव्हे तर महायुतीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांच्या मतांनाही सुरुंग लावल्याचे स्पष्ट होते. भाजपने ४, शिंदे सेनेने ३ तर अजित पवार गटाने ५ मते आघाडीतून फोडल्याची खात्रिलायक माहिती आहे. यापैकी एक मत बाद झाले होते, ते भाजपच्या गोरखे यांना पडल्याचे समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वच छोट्या मित्रपक्षांना आघाडीला दगा दिला नाही तर काँग्रेसच्या सुमारे ७ आमदारांनी क्रॉस व्होटिंग करुन महायुतीच्या पदरात यशाचे दान टाकल्याचे उघड झाले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. पण त्यांचे काही समर्थक आमदार अजूनही काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसचे मुंबईतील पूर्वाश्रमीचे नेते बाबा सिद्दीकी यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केलाय, पण त्यांचे पूत्र आमदार झियान सिद्दीकी अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. अशा ७ आमदारांनी पक्षाचा व्हीप धुडकावून महायुतीला मदत केली. त्यामुळे युतीचा नववा उमेदवार निवडून आला. दुसरीकडे, अजित पवारांनी शरद पवार गटातील काही आमदारांचीही मते फोडल्याची चर्चा आहे.
असे झाले मतदान…
महाविकास आघाडीत काँग्रेसकडे ३७, उद्धव सेनेकडे १५, शरद पवार गटाकडे १२ आमदार होते. तर छोटे मित्रपक्ष व अपक्षांचे ७ आमदार होते. म्हणजे आघाडीकडे ७१ मतांचे संख्याबळ होते. त्यांना ३ उमेदवार निवडून आणण्यासाठी ६९ मतेच हवी होती. काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना २५ मते पडली. त्याशिवाय काँग्रेसची उरलेली १२ मते आघाडीच्या उमेदवारांना मिळणे अपेक्षित होते. पण तसे झालेले दिसत नाही. उद्धव सेनेचे मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची २२ मते पडली. विजयासाठी आवश्यक २३ मतांचा कोटा ते पहिल्या फेरीत पूर्ण करु शकले नाहीत. पण दुसऱ्या पसंतीच्या फेरीत त्यांनी २३ मतांचा कोटा पूर्ण करुन विजय मिळवला. आघाडीचे तिसरे उमेदवार जयंत पाटील मात्र पराभूत झाले. त्यांना पहिल्या पसंतीची फक्त १२ मतेच मिळाली. अाघाडीकडे छाेटे मित्रपक्ष धरुन ७१ मतांचे संख्याबळ असताना त्यांच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची फक्त ५९ मते पडली. उर्वरित १२ मते युतीकडे वळली. त्यापैकी एक मत बाद झाल्याचे गृहित धरले तरी ११ मते भाजप, शिंदे सेना व अजित पवार गटाच्या पदरात पडली.
तेव्हा काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते…
आपल्या पक्षाची मते फुटणार याची काँग्रेसला जाणीव होती. मतदानाच्या पूर्वसंध्येला जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी जाहीरपणे तशी शक्यताही बोलून दाखवली होती. २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते, मात्र तेव्हाही त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नव्हती. आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला असला तरी काही ठोस कारवाई होण्याची शक्यता दिसत नाही. मात्र या प्रकारामुळे महाविकास आघाडीत अविश्वासाची भावना निर्माण होईल, यात शंका नाही.