खंडणीखोर वाल्मीक कराड कसा बनला मुंडेंचा राईट हॅन्ड

दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर २० दिवसांनी पुणे सीआयडीसमोर शरण आला. राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला कराड याला राजकीय अभय असल्यामुळे तो इतके दिवस पोलिसांना सापडला नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. गेल्या काही वर्षात वाल्मीक कराडवर १४ गुन्हे दाखल झालेत. परळी तालुक्यात त्याची मोठ्या प्रमाणावर दादागिरी असल्याचेही सांगितले जाते. मात्र आता खंडणी व खून प्रकरणामुळे तो राज्यभर चर्चेत आला आहे. कोण आहे हा वाल्मीक कराड… जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून

अन् वाल्मीक कराडने मुंडे कुटुंबाचा विश्वास जिंकला…

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्यालयात सांगेल ते काम करणारा सेवक किंवा शिपाई म्हणून वाल्मीक कराड हा काम करत होता. मुंडेंचे समर्थक असलेले नेते फुलचंद कराड यांच्या माध्यमातून तो मुंडेंकडे कामाला लागल्याचे सांगितले जाते. परळी तालुक्यातील पांगरीत 1969 मध्ये कराडचा जन्म झाला. त्याच्याआईचे नाव पारूबाई तर वडिलांचे नाव बाबूराव कराड आहे. पहिली ते सातवीपर्यंत पांगरीत त्याने प्राथमिक शिक्षण घेतले. आठवी ते दहावीत्याने गाढे पिंपळगावच्या जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळीत आला. महाविद्यालयात असताना कराडने वैद्यनाथ कॉलेजमध्ये मित्रांची फौज तयार केली. संघटन कौशल्यामुळे त्याला गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालयात हाऊस बॉय म्हणून काम मिळाले. कराडने मुंडे यांचे घरकाम, भाजीपाला, किराणा, दूध आणणे अशी कामे करत त्याने मुंडे कुटुंबाचा विश्वास जिंकला. गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णामुंडे यांच्या घरातील कामे करत असताना कराड हा धनंजय मुंडे यांचा मित्र बनला.

वाल्मीक कराड धनंजय मुंडेंच्या वाटेवर…

वाल्मीक कराडची आई पारूबाईकराड या रोजगार हमी योजनेच्या कामांवर खड्डे खोदण्यासाठी जात होत्या. चित्रपट व गाण्याची आवड असल्याने वाल्मीक कराड 1988 मध्ये परळीतून व्हीसीआर किरायाने आणून परळी तालुक्यातील नाथ्रा, इंजेगाव येथील यात्रेत तिकीट घेऊन सिनेमा दाखवत असे. त्याचा कोल्हापूर येथील मंजिरी यांच्याशी आंतरजातीय विवाह झाला. अनेक वर्षे त्याने गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. पण गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे वेगळे झाले तेव्हा वाल्मीक धनंजय मुंडेंसोबत गेला. मुंडे कुटुंबाचा विश्वास संपादन केल्याने कराडने पहिल्यांदा परळीच्या विद्यानगर वाॅर्डातून परळी पालिकेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत तो नगरसेवक झाला. दिवंगत नेते पंडित अण्णा मुंडे यांच्या शिफारशीमुळे तो पहिल्यांदा उपनगराध्यक्ष झाला. उपनगराध्यक्ष पदानंतर त्याने परळी नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

मुंडेंचा उजवा हात म्हणून वाल्मीकची ओळख…

५ वर्षांपूर्वी परळी पालिकेत पुन्हा निवडून आलेला कराड पालिकेत गटनेता झाला. परळी नगराध्यक्ष हे पद नावालाच ठेवून पालिकेचा सर्व कारभार कराड पाहत होता. 5 वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन समितीचा तो सदस्य झाला. पाच वर्षांत धनंजय मुंडे यांचे जगमित्र कार्यालय कराडच सर्व बाबी हाताळत होता. धनंजय मुंडे यांनी आपले पालकमंत्रीपद त्याला भाड्याने दिले आहे, असे आरोपही या काळात झाले. पण धनंजय मुंडेंचा तो अतिशय विश्वासू आहे. खंडणीचे आरोप झाल्यानंतर व वाल्मीक फरार झाल्यानंतरही मंत्री धनंजय मुंडेंनी हे मान्य केले होते. धनंजय मुंडे यांनी 2002 मध्ये भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा परळी तालुक्यातील पट्टीवडगाव जि.प. गटाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मुंडे विजयी झाले. मुंडे यांचा वाल्मीक कराडने प्रचार केला होता. पुढे 2007 च्या जि.प. निवडणुकीत धनंजय मुंडे हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. तेव्हापासून कराडच मुंडे यांचा कारभार पाहत होता. तो मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळखला जातो. मंत्रिपदाच्या काळातही परळीतील सर्व कामांची जबाबदारी वाल्मीक कराडवरच असायची. यातून त्याने मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी सुरु केली. अवैध कामे करुन मोठ्या प्रमाणावर संपत्तीही जमा केल्याचे आरोप होत आहेत.

वाल्मीक कराडवर १४ गुन्हे दाखल…

वाल्मीक कराडवर 1999 ते 2024 या 25 वर्षांतपरळी शहर पोलिस ठाण्यासह बर्दापूर, अंबाजोगाई शहर व केज पोलिस ठाण्यात एकूण 14 गुन्हे दाखल आहेत. एकट्या परळी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध जमाव जमवणे, मारामारीचे ४, खुनाचा प्रयत्न एक, रस्त्यात अडवल्याचे 3, तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे 3 असे10 गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलिसांत त्याच्याविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. 11 डिसेंबरला केज तालुक्यात अवादा एनर्जी या पवनऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना 2 कोटींची खंडणी मागितल्याने कराडसह इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून कराड फरार होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे वाल्मीकला गुन्ह्यातून सहीसलामत सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न होतील. पण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मुंडेंचा शब्द महत्त्वाचा ठरतो की फडणवीसांचा शब्द याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय दबावामुळे जुजबी कारवाई करुन वाल्मीक जामिनावर सुटतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात जातो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.