शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी योगदान काय? राणेंचे वादग्रस्त वक्तव्य
मुंबई
वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढावून घेणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता नवा वाद ओढावून घेतला आहे. ‘अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकणारे चारही शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी योगदान काय?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावरुन राणेंवर टीकेची झोड उठली आहे. भाजपसाठीही राणेंचे हे वक्तव्य अडचणीचे ठरल्याने एकाही ज्येष्ठ नेत्याने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
जे योगदान प्रभू श्रीराम यांनी हिंदू धर्मासाठी दिले
ते शंकराचार्यांनी दिले आहे का?
शंकराचार्यांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राणे म्हणाले, ‘शंकराचार्यांनी खरे तर टीका करण्यापेक्षा अयोध्यात होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्यायला हव्यात. मात्र हे शंकराचार्य भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. खरे तर अयोध्येचे काम हे राजकीय दृष्टीकोनातून होत नाहीए. कारण श्रीराम आमचा देव आहे, दैवत आहे, त्यांच्यासाठी हे सर्व केले जात आहे. आता मंदिर तयार होत आहे. अनेक वर्षानंतर श्रीरामाची मूर्ती जागेवर येत आहे. त्याच्यापुढं नतमस्तक होता येत आहे याचे आम्हाला समाधान आहे. त्यामुळे शंकराचार्यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. खरे तर त्यांनी जीवनात हिंदू धर्मासाठी काय योगदान दिलं? हे त्यांनी सांगावं. जे योगदान प्रभू श्रीराम यांनी हिंदू धर्मासाठी दिले आहे ते शंकराचार्यांनी दिले आहे का? ते सांगावे?’ असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.
राणे कलंक, कारवाई करा : काँग्रेस
हिंदू धर्मातील सर्वोच्च असलेल्या शंकराचार्यांनीही अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे, असे शंकराचार्यांचे मत आहे. परंतु राणेंसारखे भाजपचे नेते आता शंकराचार्यांवर टीका करु लागले आहेत. ‘शंकराचार्यांचे योगदान काय?’ असा प्रश्न विचारून राणे यांनी शंकराचार्य व हिंदू धर्माचा अपमान केला आहे. शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या राणे यांचे तरी काय योगदान? राणेंनी वय पाहता आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. राणे सारखे लोक हिंदू धर्माला कलंक आहेत. भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही लोंढे यांनी केली.