उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, प्रकाश आंबेडकरांचा निर्णय घेऊनच परतणार

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येण्यासाठी उत्सुक आहेत. उद्धव सेना व राष्ट्रवादीने त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारला आहे. मात्र काँग्रेसने अद्याप वंचित आघाडीच्या समावेशाला हिरवा कंदिल दाखवलेला नाही. हा तिढा सोडवण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे २ जानेवारी रोजी दिल्लीत जाणार आहेत. काँग्रेस हायकमांडशी चर्चा करुन प्रकाश आंबेडकरांबाबतचा निर्णय घेऊनच ते परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२०१९ च्या निवडणुकीच्या वेळीही प्रकाश आंबेडकरांना तत्कालिन आघाडीत घेण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी ताठर भूमिका घेतली होती. ‘मी माझ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षांनीच माझ्याशी चर्चा करावी’ अशी भूमिका त्यांनी मांडली होती. तसेच त्यावेळी वंचित आघाडीत एमआयएमचाही समावेश होता. अशा विविध कारणांमुळे काँग्रेसने त्यावेळी वंचित आघाडीला सोबत घेतले नव्हते. मात्र त्याचा विपरित परिणाम झाला. कारण वंचितने स्वतंत्र निवडणूक लढवली व त्यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीच्या हातातून किमान ८ ते १० मतदारसंघ गेले.

यावेळी मात्र प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीपासून लवचिक भूमिका घेतली आहे. आम्हाला आघाडीत घ्या, अशी विनंती वजा आर्जव ते करताना दिसतात. आधी त्यांनी उद्धव ठाकरेंशी युती करुन आघाडीत समावेशाचा मार्ग सुकर करुन घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही हो नाही करत अनुकूल झाले. पण आता काँग्रेस मात्र वंचितला सोबत घ्यायचे की नाही याबाबत निर्णय घेण्यास खूपच वेळ लावत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर अस्वस्थ झाले आहेत. आम्हाला सोबत घेणार की नाही याचा निर्णय घ्या अन्यथा आम्ही व उद्धव सेना एकत्र येऊन २४- २४ जागा लढवू, असेही वंचित आघाडीकडून सांगितले जाते.

उद्धव ठाकरे मात्र वंचितला महाविकास आघाडीत घेण्यास आग्रही आहेत. शरद पवारांनी मल्लिकार्जुन खरगे यांना विनंती करुनही काँग्रेसने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता ठाकरेंनीच पुढाकार घेऊन दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरवण्याबरोबरच वंचित आघाडीचा ‘महाविकास आघाडी’त समावेश करण्याबाबत अंतिम निर्णय घेऊनच ते मुंबईत परतणार असल्याचे सांगितले जात आहे.

१२-१२-१२ चा फॉर्म्युला अडचणीचा

एका मेळाव्यात प्रकाश आंबेडकरांच्या वतीने महाविकास आघाडीत त्यांच्या समावेशासह चारही मित्रपक्षांनी समसमान म्हणजे प्रत्येकी १२ जागा लढवाव्यात असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तो काँग्रेस व उद्धव सेनेला कदापिही मान्य नाही. पक्षफुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आपल्या मर्यादांची जाणीव झाल्यामुळे त्यांनी १२ जागांवर तडजोडीची तयारी दर्शवली आहे.

सध्या या राष्ट्रवादीचे  ४ खासदार आहेत त्यापैकी ३ शरद पवारांसोबत तर १ अजितदादा गटात आहेत.

शिवसेनेचे एकूण १८ खासदार निवडून आले होते. त्यापैकी १३ शिंदे गटात तर ५ उद्धव ठाकरेंसोबत आहेत. पक्षफुटीनंतर केवळ ५ खासदार शिल्लक राहिले असतानाही हा पक्ष २३ जागांवर दावा करत आहे.

राज्यात काँग्रेसचा फक्त १ खासदार निवडून आला होता. त्यांचेही निधन झाले आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात काँग्रेसचे खाते कोरे आहे. तरीही ते २६ जागांवर दावा करत आहेत. तर वंचित आघाडीकडे एकही खासदार नाही.

अशा स्थितीत वंचित आघाडीचा प्रत्येकी १२ जागांचा प्रस्ताव कोण मंजूर करेल? याविषयी शंका आहे. आणि त्यांचा आघाडीत समावेश करुन घेण्याचे हेही एक वादाचे कारण आहे.

वंचितला आघाडीत घेऊन आणखी एक वाटेकरी करुन घ्यायला काँग्रेस तयार नाही. आघाडीत आम्हाला घेत नसतील तर उद्धव सेना व वंचित दोघेच मिळून २४-२४ जागा लढवू हा प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना मान्य नाही. कारण पक्षफुटीमुळे त्यांची ताकद कमी झाल्यामुळे त्यांनाही काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज आहे. असे त्रांगडे निर्माण झाले आहे.

या परिस्थितीतून निर्णायक मार्ग काढण्यासाठीच उद्धव ठाकरे दिल्लीत गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खासदार संजय राऊतांनी २३ जागांचा दावा केला असला तरी उद्धव ठाकरे त्यात तडजोड करण्यास तयार आहेत. तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी २६ जागांवर दावा केला असला तरी आपल्या ताकदीची जाणीव असल्याने काँग्रेस हायकमांडही यात तडजोड करु शकते. एकूणच उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics