आमचं ठरलंय…महाविकास आघाडीचे जागावाटप ८ दिवसात जाहीर : सुळे
मुंबई : उद्धव सेना व काँग्रेसचे नेते २३ /२६ जागांच्या दाव्यांवरुन भांडत असताना राष्टवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले असल्याचा गौप्यस्फोट सोमवारी पत्रकारांशी बाेलताना केला. लवकरच या जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल, असेही त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची केवळ महाराष्ट्राला नव्हे तर देशाला गरज आहे. ते एक मोठे नेते आहेत, असे सांगून त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीत घेण्याचे संकेतही सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहूल गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केली होती. त्या बैठकीत फॉर्म्युला निश्चित झाला आहे. आठ ते दहा दिवसांत तो जाहीर केला जाईल, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
आघाडीत कधी घ्यायचे ते त्यांनी ठरवावे : प्रकाश आंबेडकर
इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करुन घ्यावे, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली आहे. आता तो निर्णय कधी घ्यायचा हे आघाडीतील नेत्यांच्या मतावर अवलंबून आहे. सध्या तरी आम्हाला आघाडीची दारे बंद आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितले. संविधान वाचवणे व सत्तेवर येणे हा आमचा नवीन वर्षातील संकल्प असल्याचे आंबेडकर म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांना सोबत घ्यायला हवे, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगून एकप्रकारे काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे लवकरच वंचितही महाविकास आघाडीसोबत जाण्याची घोषणा होऊ शकते.