वर्षभरात 450 कोटींचे अमली पदार्थ जप्त, मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई, अनेक कारखानेही केले उद्ध्वस्त

नवीन वर्ष येण्यास आता अवघे काहीच दिवस उरले असून नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी पार्टी केली जाते. त्यामध्ये रेव्ह पार्ट्यांचाही समावेश असतो. या पार्ट्यांवर मुंबई पोलिसांची करडी नजर असते. त्याच पार्श्वभूमीवर एक मोठी, महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी या वर्षभरात सुमारे 450 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्यामध्ये सर्वाधिक, म्हणजेच चारशे कोटीं रुपयांहून अधिक किमतीचे एमडी हे ड्रग जप्त करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर मुंबई पोलिसांनी वर्षभरात 4,800 कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्टही केले.

वर्षभरात मुंबई पोलिसांनी नाशिक व सोलापूर येथील अमलीपदार्थाचे कारखाने उद्ध्वस्त केले. तेथून मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत साडेचार हजार कोटींहून अधिक किमतीचे एमडी जप्तही केले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नालासोपारा आणि गुजरात येथील एमडी या अमली पदार्थाची निर्मिती करणारे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले. तर यावर्षीही पोलिसांनी अशीच कारवाई केली असता सर्वाधिक म्हणजे 405 कोटींहून अधिक किमतीचे एमडी जप्त करण्यात आले .

2023 साली 1319 गुन्ह्यांमध्ये एकूण 437 कोटी 98 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर त्याप्रकरणी 1718 आरोपींनाही अटक करण्यात आली. तसेच मुंबई पोलिसांनी वर्षभर कारवाई करून साडेसात कोटी रुपयांचा गांजा, 50 लाखांचे कोकेन, 10 कोटींचे चरस, 4 कोटी 21 लाखांचे हेरॉईन आणि बरेच अमली पदार्थ जप्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics