वंदे भारत…. इम्तियाज यांचा थयथयाट भागवत कराडांचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार

मराठवाड्यातील पहिली बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित वंदे भारत ट्रेन ३० डिसेंबरपासून जालना ते मुंबईदरम्यान सुरु झाली. मराठवाड्याच्या रेल्वे लाईनचे विद्युतीकरण जवळपास पूर्ण होत आल्यामुळे ही वातानुकूलित रेल्वे सुरु होऊ शकली. त्यामुळे जालना- छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईसाठी आणखी एक रेल्वेची सोयही उपलब्ध झाली आहे. मात्र या रेल्वे उद‌्घाटनाच्या निमित्ताने राजकारण उफाळून आले आहे.
देशाचे रेल्वे राज्यमंत्रिपद रावसाहेब दानवे यांच्या रुपाने जालना मतदारसंघाला मिळाले आहे. त्यांच्या माध्यमातून मराठवाड्याचा मोठ्या प्रमाणावर रेल्वे विकास होईल अशी आशा सुरुवातीपासून केली जात होती. त्या काही प्रमाणात पूर्ण होत आहेत. मात्र सरकारच्या योजना जनहितासाठी लागू करताना हे मंत्री श्रेयवादाचे राजकारणही करत असल्याचे दिसून येते. आपल्या मतदारसंघापर्यंत विकास खेचून नेताना दानवे मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरकरांची मात्र गैरसाय करताना दिसतात. यापूर्वी जनशताब्दी ही मुंबईसाठीची रेल्वे जालन्यापर्यंत विस्तारित करताना दानवेंच्या रेल्वे खात्याने या रेल्वेचे वेळापत्रक गैरसोयीचे करुन टाकले. तर संभाजीनगरला प्रस्तावित असलेली पीटलाईन जालन्याला पळवून नेली. त्याची मोठ्या प्रमाणावर वाच्यता झाल्यानंतर जालन्याच्या तुलनेत कमी क्षमतेची पीटलाईन संभाजीनगरला मंजूर करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

आता सुरु होत असलेली वंदे भारत रेल्वे जालन्याप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर या उद्योगनगरी, पर्यटन नगरसाठीही तितकच महत्त्वपूर्ण ठरते. येथील स्थानिक खासदार इम्तियाज जलील यांनी यापूर्वी अनेकदा संभाजीनगरहून रेल्वे, विमान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी संसदेत प्रश्न मांडले. मात्र जेव्हा नवीन रेल्वेचे उद‌्घाटन करण्याची वेळ आली तेव्हा निमंत्रण पत्रिकेतून त्यांचे नाव मात्र वगळण्यात आले. हे कळताच इम्तियाज यांनी थयथयाट केला. उद‌्घाटन कार्यक्रमात ‘हिसका’ दाखण्याचा इशाराही दिला.
खरे तर या गदारोळात एक गोष्ट मात्र फारशी चर्चेत आली नाही, ती म्हणजे देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेल्या डॉ. भागवत कराड यांनाही त्यांचेच मंत्रिमंडळातील सहकारी रावसाहेब दानवे यांच्या रेल्वे खात्याने वंदे भारतच्या उद‌्घाटन कार्यक्रम पत्रिकेतून वगळले होते. शेजारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, एकाच पक्षाचे नेते व एकाच मंत्रिमंडळातील सहकारी सदस्य असूनही दानवे यांच्या रेल्वे खात्याने डॉ. कराड यांना का डावलले असावे अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

परभणीच्या खासदाराला कसे बोलावले?
उद‌्घाटनाचा कार्यक्रम जालना स्टेशनवर असल्याने त्या जिल्ह्याशी संबंधित लोकप्रतिनिधींचीच नावे निमंत्रण पत्रिकेत प्रकाशित करण्याचा प्रोटोकॉल आम्ही पाळला, असे स्पष्टीकरण देत रेल्वे खात्याने हात वर केले. त्यावर ज्या स्थानकावर रेल्वे जाणारच नाही त्या परभणीच्या खासदाराचे नाव पत्रिकेत कसे आले? असा प्रश्न खा. इम्तियाज यांनी विचारला. परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे उद्धव सेनेचे. त्यांच्या मतदारसंघात जालना जिल्ह्यातील काही गावे येत असल्याने ते जालन्याचेही लोकप्रतिनिधी मानले जातात. म्हणून त्यांचे नाव प्रोटोकॉनुसार पत्रिकेत आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. हा नियम लावला तर इम्तियाज यांचे नाव वगळण्याचे कारण एकवेळ पटूही शकेल.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांना डावलले

जालन्याच्या शेजारी असलेल्या संभाजीनगर जिल्ह्यात, ज्या स्टेशनवरुन ही रेल्वे जाणार आहे तिथले लोकप्रतिनिधी असलेल्या व देशाचे अर्थ मंत्रालय सांभाळणाऱ्या, भाजपचेच नेते असलेल्या डॉ. भागवत कराड यांना दानवेंचे खाते कसे विसरले ? हा प्रश्न आता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
रावसाहेब दानवेंच्या या खेळीमागे पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण असल्याचे आता लपून राहिलेले नाही. दानवे ५ टर्मपासून जालन्याचे खासदार आहेत. तर डॉ. कराड यांना अचानक राज्यसभेची व लगेचच केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी लागली. कराड यांच्या तुलनेत दानवे सिनिअर आहेत. मात्र सध्या केंद्रात दानवेंपेक्षा अर्थखाते सांभाळणाऱ्या कराड यांचे महत्त्व वाढताना दिसते. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारीही डॉ. कराड करत आहेत. तर दुसरीकडे ‘अॅन्टी इन्कमबन्सी’चा फटका नको म्हणून जालन्यात यावेळी रावसाहेब दानवेंना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. या परिस्थितीची जाणीव असल्याने गेल्या काही महिन्यांपासून दानवे व कराड यांच्या शितयुद्ध सुरु असल्याचे दिसून येते.

खासदार इम्तियाज जलील  नाराज
म्हणूनच, उद‌्घाटनाचे निमंत्रण नाही म्हणून खासदार इम्तियाज जलील जसे नाराज आहेत तसेच डॉ. कराडही नाराज आहेत. मात्र इम्तियाज जसे थयथयाट करु शकले ते धाडस डॉ. कराड दाखवू शकत नाहीत. यातून पक्षशिस्त मोडल्याचा ठपका बसू शकतो ही भीती असल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.


या श्रेयवादाची खूपच चर्चा झाल्यानंतर अखेर खडबडून जागे झालेल्या रेल्वे खात्याने ‘वरिष्ठांच्या आदेशा’नुसार एेनवेळी उद‌्घाटनाच्या काही तास आधी निमंत्रण पत्रिका बदलून त्यात केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड व संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाचा समावेश केल्याचे दिसून आले. इम्तियाज यांच्या इशाऱ्याला घाबरुन दानवेंच्या रेल्वे खात्याने हा बदल केल्याचे वरकरणी दिसत असले तरी डॉ. कराड यांना डावलल्याची भाजप हायकमांडपर्यंत तक्रार जाऊ नये ही धास्तीही त्यामागे रावसाहेबांना आहे.