ठाकरेंची गद्दार आमदारांसाठी, पवारांची दगाबाज मंत्र्यांसाठी दारे बंदच

गेली अडीच वर्षे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ४० आमदारांसह अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात गेले. अडीच वर्षे त्यांनी सत्तेचा लाभही घेतला. मात्र आता शिंदेंपेक्षा ठाकरेंनाच जनतेचा कौल मिळत असल्याचे लक्षात आल्याने किंवा शिंदेसेनेत उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री पटल्याने या संधीसाधू लोकांनी पुन्हा उद्धव सेनेचा रस्ता धरला आहे. ठाकरेंनाही हे जुने शिवसैनिक हवेच आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी मातोश्रीची दारे खुली करण्यात आली आहेत. मात्र शिंदेसह त्यांच्यासोबत गेलेल्या ४० गद्दार आमदारांना कदापि स्वीकारणार नाही, असे ठाकरेंनी परखडपणे सांगितले आहे. त्यामुळे शिंदेंसोबत गेलेल्या ४ पैकी किमान २० आमदारांचे भवितव्य अडचणीत आले आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही अजितदादांसोबत गेलेल्यांसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत. अनेक विद्यमान आमदारही पुन्हा पवारांची ‘तुतारी’ वाजवण्याच्या तयारीत आहेत. अजितदादा व त्यांच्यासोबत गेलेल्या ९ मंत्र्यांना मात्र राष्ट्रवादीची दारे कायम बंद असतील, असे पवारांच्या पक्षाने सुनावले आहे. काय आहे या दोन्ही पक्षातील बंडखोर आमदारांचे भवितव्य….

सामान्य शिवसैनिकांसाठी मातोश्रीची दरवाजे खुली असल्याचे संकेत…

कल्याण- डोंबिवलीतील युवक नेता, शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव दीपक म्हात्रे यांनी नुकताच पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. अडीच वर्षांपूर्वी ते शिंदेंसोबत गेले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात. पण आता डोंबिवलीत शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळू शकत नसल्याने त्यांनी ‘मशाली’चा झेंडा हाती घेतलाय. अशीच अवस्थे अनेक पदाधिकाऱ्यांची झाली आहे. म्हात्रे यांना पक्षप्रवेश देताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभेपूर्वी आपल्या पक्षात परत येऊ इच्छिणाऱ्या सामान्य शिवसैनिकांसाठी मातोश्रीची दरवाजे खुली असल्याचे संकेत दिले. मात्र ४० बंडखोर आमदारांना कदापि स्वीकारणार नसल्याचेही सांगायला ते विसरले नाहीत. त्यामुळे जे मारुन- मुटकून, चौकशीच्या भीतीने किंवा सत्तेच्या लालसेने शिंदेसोबत गेले व ज्यांना आता स्वबळावर निवडून येण्याची खात्री नाही अशा आमदारांचे भवितव्य संकटात असल्याचे मानले जाते.

तर माझे दरवाजे खुले…

आपली भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आज अनेक जण पुन्हा आपल्या घरात येत आहेत, ही चांगली गोष्ट झाली आहे. मी बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वापासून शिवसेना दूर नेली या भ्रमाला अनेक जण भुलले आणि अनेकांनी त्यांच्या पालख्या वाहिल्या. आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले, तुम्ही ज्याच्या आहारी गेला होतात त्यांचे हिंदुत्व, शिवसेना आपली नाही, हा बाळासाहेबांचा विचार नाही, महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार नव्हता,’ याची जाणीवही ठाकरेंनी शिवसैनिकांना करुन दिली. ‘ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं, शिवसेना संपवायला निघाले आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत मी परत घेणार नाही. तिकडे बसलेत त्यांना उमेदवारी देणार नाही. तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते धाकदपटशाहमुळे, दिशाभूल केल्यामुळे तिकडे गेले असतील. ते जर आज स्वखुशीने परत येणार असतील तर त्यांच्यासाठी माझे दरवाजे खुले आहे’ असे सांगून ठाकरेंनी शिंदेंकडे नाराज असलेल्या शिवसैनिकांना परत येण्याचे आवाहन केले आहे.

पवारांची भूमिका उलटच…

आता ही झाली ठाकरेंची भूमिका. पण शरद पवार यांची भूमिका मात्र त्या उलट आहे. लोकसभेत शरद पवारांच्या पक्षाची कामगिरी सर्वोत्तम व अजितदादांच्या पक्षाची अतिशय सुमार झाली. त्यामुळे जनमताचा कौल लक्षात घेतान दादांकडील अनेक आमदार, नेते पुन्हा शरद पवारांकडे जाऊ लागले आहेत. या सर्वांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी शरद पवारांनीही पायघड्या घालण्यास सुरुवात केली आहे. तर जे आमदार अजूनही दादांसोबत राहिलेत त्यांना पराभूत करण्यासाठीही शरद पवारांनी विशेष रणनिती आखली आहे. म्हणजे एकतर आमच्यासोबत या किंवा आमदारकी सोडण्यास तयार राहा, असे संकेतच पवारांकडून दिले जात आहेत. त्यामुळे दादा समर्थक दिग्गज आमदारांचे धाबे दणाणले आहे. शरद पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी तर स्पष्टच सांगितले की, अजित पवारांसोबत गेलेले जे ९ नेते सध्या मंत्री आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत आम्ही परत घेणार नाही. बाकीच्यांसाठी दरवाजे खुले आहेत.

आमदारांना आस्मान दाखवण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंनी स्वीकारले…

म्हणजे सत्तेच्या, मंत्रिपदाच्या मोहापायी ज्या लोकांनी शरद पवारांना दगा दिला त्यांचा कायमचा हिशोब करण्याची रणनिती पवारांच्या राष्ट्रवादीनेही आखली आहे. एकूणच या विधानसभा निवडणुकीत शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना आस्मान दाखवण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंनी स्वीकारले आहे तर दादांसोबत गेलेल्यांना पुन्हा निवडून न येऊ देण्याचा चंग पवार गटाने बांधलेला अाहे. आता यात महाविकास आघाडीतील हे दोन्ही पक्ष यशस्वी ठरतात की महाशक्तीशाली भाजपच्या बळावर शिंदे व अजित पवार पुन्हा आपापले ४० आमदार निवडून आणू शकतात, हे निकालानंतर कळेलच.