मेळावा दसऱ्याचा, शिंदे-ठाकरेंमध्ये मात्र आरोपांचीच धुळवड

ऐतिहासिक दसरा मेळाव्यात वाजत गाजत या. विचारांचे सोनं लुटायला या.. असे आवाहन करत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांना दरवर्षी मुंबईच्या शिवाजी पार्कवर आग्रहानं बोलवायचे. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी अगदी विदर्भ- मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यापासून ते तळकोकणातील छोट्या वाडीपर्यंतचा सामान्य शिवसैनिक घरचं सीमोहल्लंघन सोडून घरची चटणी भाकरी बांधून घेत शिवाजी पार्कवर जायचा. बाळासाहेब जे विचार द्यायचे ते एक मिशन समजून जीव तोडून काम करायचा. प्रसंगी त्याच्यावर चार- दोन राजकीय गुन्हेही दाखल व्हायचे पण पुढचे वर्षभर तो बाळासाहेबांच्या विचारांचा झेंडा कधी खाली पडू देत नव्हता. बाळासाहेबांच्या पश्चात मात्र या दसरा मेळाव्यात आरेापांचाच शिमगा होऊ लागलाय.. गेल्या देान वर्षात तर शिंदेसेना व उद्धव सेनेचे वेगवेगळे मेळावे होत आहेत. दोन्ही ठिकाणी बाळासाहेबांचेच नाव घेऊन सुरुवात होते, नंतर मात्र आम्ही कसा उठाव केला व त्यांनी कशी गद्दारी केली? याचेच गुऱ्हाळ चालू राहते. सामान्य शिवसैनिक या गुऱ्हाळाला कंटाळला आहे. नुकत्याच झालेल्या दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हेच गुऱ्हाळ एेकायला मिळाले. आणि आता आपण कोणता झेंडा हाती घ्यायचा या संभ्रमावस्थेत शिवसैनिक आल्या पावली घरी परतले.. जाणून घेऊ या दोन्ही मेळाव्यातील महत्त्वाचे मुद्दे मिशन पॉलिटिक्समधून..

शिंदेंनी घेतला ठाकरेंचा समाचार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेला तिसरा दसरा मेळावा यावेळी आझाद मैदानावर झाला. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो.. अशी बाळासाहेबांच्या स्टाईलने शिंदेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली अन‌् लगेचच ते बाळासाहेबांचे पूत्र असलेल्या उद्धव ठाकरेंवर घसरले. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा भाषणाची सुरुवात करायचे तेव्हा सर्वांच्या अंगावर रोमांच उभा राहायचा. आता हिंदू म्हणवून घ्यायला काही जणांची जीभ कचरू लागली आहे. बाळासाहेब ठाकरे या हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला आली. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसा सांगणारे आता पाकिस्तानची भाषा बोलू लागलेत. त्यामुळे एमआयएम आणि ठाकरेंमध्ये फरक राहिलेला नाही’, अशा शब्दांत शिंदे यांनी ठाकरे यांचा समाचार घेतला.

शिंदेंच्या भाषणात अनेक मुद्द्यांची पुनरावृत्ती!

मग बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार टिकवून ठेवण्यासाठी आम्ही कसा उठाव केला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला कसे मुख्यमंत्री केले, दोन वर्षे कसे सरकार चालवून दाखवले.. अशा त्याच त्या भाषणाची पुनरावृत्ती शिंदेंनी या मेळाव्यात केली. महाविकास आघाडी सत्तेत असताना प्रकल्पांना स्पीड ब्रेकर लावले. आम्ही उठाव केल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले. त्या सरकारलाही उखडून टाकले, अशा शब्दात शिंदेंनी पुन्हा एकदा आपल्या उठावाचे समर्थन केले. मात्र ज्या आघाडी सरकारवर शिंदे स्पीड ब्रेकरचा आरोप लावत होते त्याच सरकारमध्ये अडीच वर्षे स्वत: शिंदे कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे असलेल्या खात्याकडेच पायाभूत सुविधांची कामे होते हे मात्र शिंदे विसरुन जातात. याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्याचे धाडसही कुणी करत नाही, म्हणून शिंदेंसारखे लोक पुन्हा त्यात त्या गोष्टी उगाळत राहतात अन‌् महाराष्ट्र मात्र नाईलाजाने ते सर्व एेकत राहतोय. दसरा मेळाव्यातून महाराष्ट्राला नवीन व्हिजन देण्याचा मात्र राज्याच्या प्रमुखांनी कधी प्रयत्न केला नाही, याची खंत तमाम महाराष्ट्राला वाटतेय.

उद्धव यांचा खरा राग भाजपवर?

आता दुसरा मेळावा झाला तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा, तोही शिवाजी पार्कवरच. नेहमीप्रमाणे उद्धव यांनी आक्रमकपणे आपल्या भाषणाची सुरुवात करत शिंदे व भाजप यांचा समाचार घेतला. काँग्रेसशी युती केल्याने लोकसभेच्या वेळीपर्यंत त्यांच्या भाषणातून जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो व मातांनो हे शब्द वगळले जात होते. ते फक्त देशभक्त बांधवांनो, भगिनींनो म्हणायचे. यावेळी त्यांनी ही चूक सुधारलेली दिसली. आपलेच हिंदुत्व कसे अस्सल आहे हे दाखवण्याचा त्यांचा यातून प्रयत्न दिसून आला. आयुष्यात पहिल्यांदा मिळालेल्या मुख्यमंत्रिपदावरुन अडीच वर्षातच कसे पाय उतार व्हावे लागले, याची खंत ठाकरेंच्या बोलण्यातून जाणवत होती. म्हणूनच दोन महिन्यात पुन्हा आमचे सरकार येणार आहे, तेव्हा कोणालाही सोडणार नाही अशा धमक्या ते जाहीरपणे सभेतून देत होते. उद्धव यांचा खरा राग भाजपवर आहे. कारण त्यांनीच शिंदेंना फोडून ठाकरेंची खुर्ची खेचली. त्यामुळे भाजपवर विशेषत: या पक्षातील गुजरातच्या दोन नेत्यांवर ते सातत्याने तोंडसुख घेत असतात. यंदाच्या दसरा मेळावाही त्याला अपवाद नव्हता. ‘मी जिवंत असेपर्यंत महाराष्ट्र मोदी- शाह- अदानींचा होऊ देणार नाही’ अशी घोषणाही त्यांनी करुन टाकली.

प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार…

महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरेाप करताना ठाकरेंनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेबद्दलही या सरकारला जबाबदार धरुन त्यांचा समाचार घेतला. इतकेच नव्हे तर आम्हीच खरे शिवप्रेमी हे सिद्ध करण्यासाठी आपले सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवंाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. एकूणच, दोन्ही मेळाव्यात माझे हिंदुत्व खरे की तुझे हे सिद्ध करण्यासाठी स्पर्धा लागलेली दिसली. भाजपचे गोमूत्रधारी हिंदुत्व मान्य नसल्यामुळेच मी त्यांची साथ सोडले असे एकीकडे ठाकरे सांगतात. तर ज्या बाळासाहेबांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार देऊन काँग्रेसशी लढा दिला त्याच लोकांच्या मांडीवर सत्तेसाठी उद्धव जाऊन बसलेत, असे शिंदे सांगतात. पण हे मुद्देही जनतेने अनेकदा एेकले आहेत, त्यामुळे त्यात एेकणाऱ्यांना आता फारसे स्वारस्य राहिलेले नाही.

कविता सादर करत उपस्थितांचे मनोरंजन…

हां.. इतक्या दूरवरुन आलेल्या कार्यकर्त्यांचे काहीसे मनोरंजन व्हावे याची काळजीही दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणातून घेतल्याचे दिसले. ‘म्हणे हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण. पण… त्या पुढे जाऊन अदानी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान’ असे म्हणायला हवे अशी कोपरखळी उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला. अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटची खिल्ली उडवताना ठाकरे म्हणाले, ‘कापसाच्या खोडाला खोडकिडा लागतो. तर बोंडावर गुलाबी अळी पडते. तिला गुलाबी अळी म्हणतात. आता भाजपच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा लागला असून, बोंडालाही गुलाबी अळी लागली आहे. पण या अळीने कधी जॅकेट घातल्याचे आम्ही एेकले नाही,’ असा टोला ठाकरेंनी लगावला. तर एकनाथ शिंदे यांनीही माझी दाढी यांना खूपते.. पण ‘होती दाढी म्हणूनच उद्धवस्त केली आघाडी’ अशी आठवले स्टाईल कविता सादर करत उपस्थितांचे मनोरंजन केले. बाकी सर्व आरोप- प्रत्यारोपांचे चावून चावून चोथा झालेले गुऱ्हाळ तिथेच टाकून सामान्य शिवसैनिक मात्र शेवटच्या टप्प्यात झालेल्या करमणुकीच्या चार ओळी लक्षात ठेऊन घरी माघारी परतला नसेल तरच नवल!