पराभूत करणाऱ्यांचा हिशोब चुकता करणार पंकजा मुंडे

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा दहावा दसरा मेळावा यंदा दरवर्षीपेक्षा जास्त उत्साहाने साजरा झाला. मुंडेंच्या मेळाव्याला लाखोंची गर्दी तर दरवर्षीच होते, पण यंदा त्यात विक्रमी वाढ झाली होती पण समर्थकांमध्ये दुपटीने उत्साहही संचारलेला दिसला. त्याचे कारण म्हणजे गेली ५ वर्षे कोणत्याही संविधानिक पदापासून उपेक्षित राहिलेल्या त्यांच्या नेत्या पंकजा मुंडे यांना यंदा अामदारकी मिळालेली होती. त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडे हे प्रथमच बहिणीच्या व्यासपीठावर येऊन त्यांना बळ देत होते. याच बळाच्या जोरावर पंकजा मुंडे यांच्या आवाजालाही धार आली होती. ‘वंचित, दुर्बलांना त्रास देणाऱ्यांचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही,’ असे जाहीर वक्तव्य करुन त्यांनी प्रस्थापित समाजाच्या नेत्यांना खुले आव्हानच दिले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठा व ओबीसी संघर्ष खूपच तापला होता. त्याचा फटका बसून स्वत: पंकजा मुंडे बीडमधून पराभूत झाल्या. पराभवाचा हा चटका अजूनही मनात कायम अाल्याने त्याच तीव्रतेने पंकजांनी प्रस्थापित मराठा समाजातील विरोधकांना धडा शिकवण्याचा एल्गार केलाय.. काय आहे त्या मागची रणनिती मिशन पॉलिटिक्समधून….

दसरा मेळाव्याची परंपरा सुरु ठेवण्याचा निर्धार…

बीड व नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेला भगवानगड वंचित, शोषित समाजाचे श्रद्धास्थान. खास करुन वंजारी समाज आणि ऊसतोड मजूर इथे दरवर्षी दसऱ्याला मोठ्या श्रद्धेने येऊन डोके टेकवतो, संत भगवानबाबांचे आशीर्वाद घेतो. या समाजाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी या वंचित समाजाला एकत्रित आणण्यासाठी याच भगवान गडावर दरवर्षी दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली होती. दरवर्षी त्याला उदंड प्रतिसादही मिळायचा. या मेळाव्यातून मुंडे समाजाला राजकीय संदेशही द्यायचे. मात्र २०१४ मध्ये दुर्दैवाने एका अपघातात गोपनाथरावांचे निधन झाले. त्यामुळे वडिलांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरु ठेवण्याचा निर्धार त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी केला. तेव्हा पंकजा आमदार होत्या. त्यांनी त्याच वर्षी भगवानगडावर मेळावा घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना गडावरुन विरोध झाला. त्यामुळे पहिल्या वर्षी पंकजा यांनी गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला. त्याला प्रतिसादही उत्स्फूर्त मिळाला. दुसऱ्या वर्षी मात्र पंकजा मुंडे यांनी संत भगवानबाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे या मेळावा घेण्याचे ठरवले. त्या परिसराचा विकास करुन भक्तीगडाची निर्मिती केली. गेली १० वर्षे त्या सातत्याने हे मेळावे घेत आहेत. तत्कालिन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीही इथे हजेरी लावून पंकज यांच्यामागे असलेली जनशक्ती अनुभवली होती.

पंकजा मुडेंचे विधान परिषदेवर पुनर्वसन…

मात्र गेली ५ वर्षे पंकजांसाठी खूप खडतर गेली. २०१९ मध्ये चुलतभाऊ धनंजय यांच्याकडून त्यांचा परळीत पराभव झाला. भाजपमधूनही त्यांना उपेक्षेची वागणूक मिळू लागली. जवळचे काही लोक काही लाभाच्या पदाच्या आमिषाने पक्षांतर्गत विरोधकांना जाऊन मिळाले. हा सर्व त्रागा पंकजा दरवर्षी दसरा मेळाव्यात काढायच्या. मात्र मेळाव्याला आलेल्या गर्दीतून त्यांना संघर्षाचा शक्ती मिळायची. यातून त्या लढत गेल्या. यावर्षी भाजपने त्यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन केले आहे. राजकीय विसंवादामुळे गेली १० वर्षे जो भाऊ धनंजय दुरावला होता, तोही आता नव्या राजकीय समीकरणांमुळे सोबत आलाय. यंदाच्या दसरा मेळाव्याला मंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते. भावाचा भक्कम पाठिंबा मिळाल्याने यंदाच्या भाषणात पंकजा यांच्या भाषणालाही धार चढली होती. शेवटच्या श्वासापर्यंत आपण वंचितांसाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. लोकसभेला झालेल्या अापल्या पराभवाची सल मांडताना पंकजा म्हणाल्या, ‘आम्ही कधीच जातीपातीचे राजकारण केलेले नाही. जातीवर स्वार होणाऱ्या कुणाच्या पाठीशीही आपल्याला उभे राहायचे नाही. आता घोडा मैदान लांब नाही जर आपले लोक आणि वंचितांना त्रास देत असेल तर त्याचा हिशेब नक्कीच घेतला जाईल. आपल्याला आता आपला डाव खेळायचा आहे,’ असे सांगून पंकजा यांनी विधानसभेला जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचा इशारा दिलाय.

अन् म्हणून पंकजांचा झाला पराभव…

पंकजा यांनी कुणाचे थेट नाव घेतले नसले तरी त्यांचा हा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी होता हे लपून राहिलेले नाही. याचे कारण म्हणजे जरांगे यांनी सत्ताधारी भाजपविरोधात लोकसभेला वातावरण निर्मिती केली होती, त्यामुळेच पंकजा यांचा बीडमधून पराभव झाला. ही सल पंकजा यांच्या मनात आहे. तसेच जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी आग्रहपूर्वक आंदोलन चालवले आहे. अन‌् ओबीसी समाजाचा त्याला विरोध आहे. पंकजा मुंडे या स्वत: ओबीसी नेत्या आहेत. आपल्या हक्काची व्होटबँक असलेल्या समाजाच्या आरक्षणात वाटेकरी होऊ इच्छित असलेल्या मनोज जरांगे पाटलांना विरोध करणे हा पंकजांच्याही राजकारणाचा एक भाग आहे. म्हणूनच दसरा मेळाव्यातून त्यांनी अप्रत्यक्ष जरांगे पाटील यांना आव्हान दिले. त्यांच्या या भूमिकेला उपस्थित ओबीसी जनसमुदायातून पंकजा यांना मोठा प्रतिसाद मिळाला. याच जोरावर आता राज्यभर दौरे करण्याची घोषणाही त्यांनी केली. पंकजा यांच्यासारख्या फायरब्रॅन्ड नेत्यामार्फत राज्यभर प्रचार करुन भाजप ओबीसी व्होटबँक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे संकेत या मेळाव्यातून मिळाले.

ओबीसी नेत्यांचीही मेळाव्याला उपस्थिती…

आणखी एक महत्त्वाचे म्हणजे.. पंकजा यांच्या मेळाव्याला ओसीबींचे राज्यातील नेते अावर्जुन उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला तीव्र विरोध करुन त्यांच्याच गावात जाऊन उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे दोन्ही ओबीसी नेतेही पंकजांच्या व्यासपीठावर हजर होते. या दोघांचही सन्मानपूर्वक उल्लेख करत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश पंकजांनी लोकांमध्ये दिला. लोकसभेत बहिणीला पराभूत केले आता परळीत भावाचा नंबर.. असा इशारा जरांगेंनी दिला होता. म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांना परळीतून पराभूत करण्याचा त्यांचा मनोदय आहे. पण पंकजांनी हे आव्हानही स्वीकारलंय… आम्ही कुणाला घाबरत नाही. जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे. तोपर्यंत आपण कोणालाही घाबरत नाही . सर्वांनी एकजुटीने राहायचे आहे. परळीत तर धनुभाऊला आणायचेच आहे, असा निर्धार पंकजाताईंनी व्यक्त केला. एकूणच या विधानसभेला मराठा नेते मनोज जरांगे पाटील व ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्यात आरपारची लढाई होण्याचे संकेत दोघांच्याही दसरा मेळाव्यातून मिळत आहेत. यात कुणाची सरशी होते हे विधानसभा निकालानंतरच कळेलच.