अडीच वर्षांपूर्वी म्हणजे जून २०२२ मध्ये सत्तेसाठी व्याकूळ झालेल्या १०५ अामदारवाल्या भाजपने एकनाथ शिंदे या निष्ठावंत शिवसैनिकाला त्यांचेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून फाेडले. एकटे शिंदेच नव्हे तर त्यांच्यासोबत १० -१२ आमदारांचीही रात्री गूपचूप महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर व गुजरात राज्यात संरक्षणात जाण्याची सोय केली. तेथून गुवाहटीत चार्टर्ड प्लेनने हे सर्व आमदार नेले, तिथे त्यांची फाईव्ह स्टार व्यवस्था केली. हळूहळू एक- एक करत ४० आमदार चार्टर्ड प्लेननेच गुवाहटीत नेले. तिथे त्यांचा फाईव्ह स्टार पाहुणचार करण्यात आला. चार- आठ दिवसांच्या मुक्कामानंतर या सर्वांना गोवामार्गे विमानाने मुंबईत आणले. सर्व घटक मॅनेज करुन सत्ता स्थापनेत या बंडखोर आमदारांना सहभागी करुन घेतले. आपले सरकार स्थापन केले. आणि विशेष म्हणजे ज्याला बंड करायला प्रेरित केले त्याच एकनाथ शिंदे यांना अवघ्या ४० आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री केले.
आता हीच घटना दुसऱ्या अँगलने पाहू…
शिवसेनेच्या सत्तेत श्वास गुदमरत असल्याने कॅबिनेट मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षप्रमुखांविरोधात बंड करुन ४० आमदार फोडले. भाजपच्या महाशक्तीशी हातमिळवणी करत आपल्याच पक्षप्रमुखांचे सरकार पाडले. महाशक्तीच्या मदतीने सूरत, गुवाहटीला पळ काढला. तेथे पंचतारांकित सुविधांचा अनुभव घेतला. परत मुंबईला येऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व बंडात तन- मन – धनाने साथ देणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपदावर बसवले. आणि आपणही भाजपच्या तालावर अडीच वर्षे सत्तेचा राजशकट हाकला…या झाल्या एकाच घटनेच्या दोन बाजू. आता तुम्ही सांगा यात सर्वात मोठा त्याग कुणाचा. आपल्याच पक्षाच्या सत्तेला सुरुंग लावून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवणाऱ्यांचा …. की २५ वर्षे आपला मित्र असलेल्या पक्षातच फूट पाडून, त्यांच्याच शिलेदारांना फितवून सत्ता आणणाऱ्या पण त्या सत्तेचा रिमोट कंट्रोल मात्र स्वत:कडे ठेऊ न शकणाऱ्या हतबल महाशक्तीचा…महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या या दोन्ही गटाकडून तुमचा त्याग मोठा की आमचा, याविषयी वादविवाद सुरु आहेत. त्याचे कारण म्हणजे आता पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळवण्याची या दोन्ही संघांमध्ये स्पर्धा लागली आहे.
उपकार कसले? तुम्हाला गरज होतीच…
महाराष्ट्रात विधानसभेचा बिगूल वाजला आहे. अडीच वर्षांपूर्वी क्षमता नसतानाही आपण एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. या उपकाराची जाणीव ठेऊन शिदेंनी आता भाजपला विधानसभेच्या १५० जागा द्याव्यात, अशी महाशक्तीची अपेक्षा. तर अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिल्याने आमची ताकद वाढलीय. त्यामुळे भाजपने २०-३० जागा कमी घेऊन त्या आम्हाला द्याव्यात, अशी अपेक्षा एकनाथ शिंदेंची. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. या मागणीवर तोडगा निघत नसल्याने मग वाद वाढत चाललेत. भाजपने शिंदेंना केलेल्या उपकाराची आठवण करुन दिलीय. तर उपकार कसले? तुम्हाला गरज होती म्हणून आम्हाला पुढे केले.. याची जाणीव शिंदे गट महाशक्तीला करुन देतोय.
अजितदादांचे मात्र सँडविच होतंय…
भाजपच दिग्गज नेते अमित शाह यांनी तर एकनाथ शिंदेंना स्पष्टच सांगितले, की आमच्या लोकांनी त्याग करुन तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलंय. आता तुम्हीही परतफेड करा आणि आम्ही सांगू तेवढ्याच जागा लढवा. दुसरीकडे शिंदेसेनेचे शिलेदारही सत्तेच्या बरणीत इतके रापलेत की .. आम्ही होतो म्हणून तुम्हाला सत्ता मिळाली, याचे भान ठेवा, अशी आठवण महाशक्तीलाच करुन देऊ लागलेत. आता या दोघांच्या भांडणात सख्ख्या काकाला सोडून आलेल्या अजितदादांचे मात्र सँडविच होत अाहे. एक तर लोकसभेच्या परीक्षेत हे दादा सपशेल फेल झाले. अन मित्रपक्षातील दोन थोरले भाऊ असे भांडू लागलेत की त्यात या दादांचा आवाज कुणालाच एेकू येईनासा झालाय. त्याग तर मीही केलाय. महाशक्तीच्या सांगण्यावरुन काकांना सोडले. चुलत बहिणीला सोडले. भाऊ, पुतणे या सर्वांची साथ सोडली. एवढेच काय बारामतीही गमावलीय… हा माझा त्याग कमी आहे काय? असा प्रश्न अजितदादांनाही पडलाय. पण त्याबाबत मोठ्या आवाजात जाब विचारण्याचे त्यांच्याच धाडस नाही. अशा परिस्थितीत वडिलकीच्या नात्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे, अजितदादांना सल्ला दिलाय. महायुतीत एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भाजपानेही त्याग केला आहे. सर्वाधिक आमदार आमच्याकडे आहे. त्यामुळे कोणी किती मोठा त्याग केला हे महत्त्वाचे नाही. तर महायुतीचे नुकसान होवू नये यासाठी तीनही नेत्यांनी समन्वय ठेवावा आणि मोठे मन करीत सर्वाधिक आमदार आमचे असल्याने आमच्या पाठीशी उभे राहावे, असा सल्ला शिंदे, अजितदादांना दिलाय..
पण सत्तेच्या मोहापायी आपल्याच पक्षप्रमुखांना व कुटुंबीयांना सोडून आलेले नेते मदत करणाऱ्यांच्या त्यागाची, उपकाराची जाणीव ठेवतील अशी अपेक्षा करणारेच चुकीचे आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अर्थात विधानसभेच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी एकाच कुटुंबीयांती ३ भावंडांच्या वादाचे हे पेल्यातील वादळ आहे. उद्या दिल्लीतून वडिलधारी मंडळींनी डोळे वटारुन एकेक फाईल नुसती बाहेर काढल्याचे दाखवले तरी महाशक्तीला जाब विचारणाऱ्या दोन दादांची बोलती बंद होईल, हे सांगायला कुणा भविष्यकाराची गरज नाही.