महायुतीच्या जागावाटपाची किंवा उमेदवारांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी मुंबईतील एका लक्षवेधी मतदारसंघातून उद्धव सेनेने आपल्या युवासैनिकाला मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे ठाकरेंचे निवासस्थान ‘मातोश्री’ बंगला असलेल्या परिसरातील वांद्रे पूर्व या मतदारसंघातून पूर्वाश्रमीचे काँग्रेस आमदार व आता अजितदादा गटाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेले झिशान बाबा सिद्दीकी यांच्याविरोधात लढणार आहेत. उद्धव सेनेचा नव्या दमाचा हा नेता खरंच सिद्दीकीच्या सहानुभूतीला टक्कर देऊ शकेल का?
कोण आहेत वरुण सरदेसाई?
वरुण सरदेसाई… उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे पुत्र आहेत. म्हणजेच ते आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगचे पदवीधरधारक असलेल्या वरुण यांच्याकडे युवा सेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे. पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुखही तेच आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे २०१९ मध्ये हा चेहरा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात चर्चेत आला. ठाकरेंचे नातेवाईक असल्यामुळे मंत्रालयात त्यांचे वजन वाढले. मावशीचे पती मुख्यमंत्री अन् मावसभाऊ आदित्य मंत्री असल्यामुळे वरुण यांचा सरकारी कामात हस्तक्षेपही वाढल्याचा आरोप तेव्हा झाला. अगदी कुठलेही संविधानिक पद नसताना ते मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या बैठकींनाही बिनदिक्कतपणे हजर राहू लागले. हा विषय उद्धव ठाकरेंना अडचणीचा ठरु लागल्याने मग वरुण यांनी बैठकांना उपस्थित राहणे बंद केले पण मंत्रालयात त्यांचा हस्तक्षेप मात्र सुरुच होता.
राणेंच्या दारात केलं आंदोलन..!
वरुण यांच्या आक्रमकपणाची खरी ओळख झाली ती शिवसेना फुटीनंतर. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेंकडे जे मोजके निष्ठावंत राहिले होते त्यात वरुण व त्यांच्यासोबतच्या युवा सैनिकांची मजबूत फळी हा पक्षासाठी भक्कम आधार होता. यापूर्वीही ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांनी त्यांच्याबद्दल अाक्षेपार्ह वक्तव्य केले होते तेव्हा थेट राणेंच्या दारासमोर जाऊन आंदोलन करण्याची धमक वरुण यांनी दाखवली होती. तसेच अमरावतीच्या तत्कालिन खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी ‘माताेश्री’समोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचा जो स्टंट करण्याचा प्रयत्न केला होता, त्यालाही वरुण व त्यांच्या युवा सैनिकांनी रस्त्यावर उतरुन चोख प्रत्त्युत्तर दिले होते. मध्यंतरी स्काऊटमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिषाने वरुण यांनी काही तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचेही आरोप झाल्याने ते वादात अडकले होते. या प्रकरणाची चौकशीही सुरु आहे.
वरुण यांना आमदारकीचे वेध?
या युवा नेत्याचा हा सर्व इतिहास उगाळण्याचे कारण म्हणजे आता वरुणला आमदार होण्याचे वेध लागले आहेत. आधी त्यांना डोंबिवलीतून उमेदवारी देण्याची चर्चा सुरु होती. पण आता उद्धव सेनेचे नेते, आमदार अनिल परब यांनी परवा एका मेळाव्यात वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण यांची उमेदवारीच जाहीर करुन टाकलीय. सध्या वांद्रे पूर्व मतदारसंघात काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आमदार आहेत. २०१९ मध्ये तेही प्रथमच निवडून आले. त्यावेळी संयुक्त शिवसेनेत बंडखोरी झाल्याने ठाकरेंना हा आपल्या अंगणातील मतदारसंघ गमवावा लागला. तरीही २०१९ मध्ये ठाकरे व काँग्रेस पक्ष सत्तेत एकत्र आल्याने ठाकरे व झिशान यांच्यात चांगले संबंधही जुळले होते. परंतु आता सिद्दीकींनी मविआची साथ सोडून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजितदादा गटाची वाट पकडल्याने ठाकरेंनी त्यांच्याविरोधात आपल्या घरातील उमेदवार देण्याचा निश्चिय केला आहे.
ठाकरेंच्या बळावर वरुण सरदेसाई मैदानात…
झिशान यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची नुकतीच हत्या झाली. बाबा हे वांद्रे पश्चिममधून १९९९, २००४ आणि २००९ असे सलग तीन टर्म्स आमदार होते. चार वर्षे मंत्रीही होते. अजितदादा पवार गटात त्यांनी प्रवेश केल्यानंतर आठच महिन्यात त्यांची हत्या झाली. बाबा यांचा मुंबईतील वांद्रे भागात मोठा प्रभाव आहे. बॉलीवूडमध्येही त्यांचा दबदबा होता. त्यामुळे ही सर्व ताकद व बाबांच्या हत्येची सहानुभूती या जोरावर झिशान ही निवडणूक लढवणार आहे. तर ठाकरेंच्या बळावर वरुणही मैदानात उतरले. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष वरुणसोबत राहणार असल्याने झिशानचे काही मतदार ठाकरेंकडे वळतील. तर येथील शिवसेनेला मानणारा मतदार मुस्लिम उमेदवार असलेल्या झिशानला मदत करणार नाहीत. या पार्श्वभूमीवर आता झिशानच्या पाठीशी असलेली सहानुभूती जिंकते की ठाकरेंच्या बळावर वरुण बाजी मारतात हे २३ नोव्हेंबरला कळेल.