झाडी.. डोंगार फेम शहाजीबापूंना धुळ चारणार ठाकरेंचा नवा भिडू

काय झाडी.. काय डोंगार… या डायलॉगने सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिंदेसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांची राज्यभर ओळख आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेेल्या शहाजीबापूंनी एकनाथ शिंदेंसोबत बंड करुन सत्तेची खुर्ची पटकावली. त्यांच्यावर ५० खोक्यांचे आरोप झाले, गद्दारीची शिक्काही लागला. आता याच शहाजीबापूंना पराभवाचा डोंगर दाखवण्याचा विडा उद्धव ठाकरेंनी उचलला आहे. त्यासाठी शरद पवारांशी अनेक वर्षे निष्ठावंत असलेल्या दीपक आबा साळुंखे या दादा गटाच्या नेत्याला त्यांनी गळाला लावले आहे. काय आहेत या मागे ठाकरेंचे डावपेच.

शहाजीबापूंची राजकीय कारकीर्द…

अडीच वर्षांपूर्वी ज्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदेंसोबत बंड करुन दगा दिला त्या एकेकाच विधानसभेत हिशोब करण्याची रणनिती उद्धव ठाकरेंनी आखली आहे. आता एकनाथ शिंदेंसारख्या पाच- सहा स्वयंभू नेत्यांना पराभूत करणे ठाकरेंना शक्य होईल की नाही? याबद्दल शंका आहे. पण फक्त शिवसेनेच्या नावावर निवडून आलेल्या २० आमदारांना तरी पराभूत करायचेच यासाठी ठाकरेंनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सोलापूर जिल्हयातील सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू हे त्यांच्या यादीतलं एक नाव. शहाजीबापू तसे रांगडं व्यक्तीमत्व. उमेदीच्या काळात काँग्रेसमधून त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात झाली. १९९५ मध्ये व २०१९ मध्ये अशा दोन वेळा त्यांना आमदारकीची संधी मिळाली. खरं तर सांगोला हा मतदारसंघ शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुखांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. तब्बल ११ वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. फक्त १९९५ चा अपवाद होता. त्यावेळी शहाजी बापूंनी गणपतरावांचा पराभव केला. त्याची सर्वत्र चर्चा झाली. पण हा अपवाद वगळला तर १९९० पासून ते २०१४ पर्यंत तब्बल ५ वेळा गणपतरावांनी शहाजीबापूंना आस्मान दाखवले होते. अखेर २०१९ मध्ये गणपतरावांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांचे नातू अनिकेत पाटील यांना शेकापने उमेदवारी दिली, तेव्हा कुठे शहाजीबापूंच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. शिवसेनेच्या तिकिटावर २०१९ मध्ये बापू निवडून आले.

अन् दीपक आबांनी बांधले शिवबंधन…

शहाजीबापू म्हणजे अस्सल मराठमोळं व्यक्तीमत्व. त्यांच्या रांगड्या भाषेतील भाषणं एेकायला मतदारसंघात नेहमीच गर्दी होते. ५ निवडणुकात ते पराभूत झाले असले तरी त्यांच्या सभांना गर्दी मात्र नेहमीच असायची. १९९५ व २०१९ मध्ये दोनदा बापू आमदार झाले तेव्हाही त्यांचे मतदाधिक्य अनुक्रमे १९२ व ६७४ एवढेच होते. म्हणजे तेव्हाही ते काठावरच पास झाले. शंभरपेक्षा जास्त एकर जमीन विकून आपण निवडणूकीचा जुगार खेळल्याचे बापू सांगत असतात. मात्र यावेळी सत्तेसाठी जो बंडाचा जुगार खेळला तो त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. त्यांना लढत देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आता अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले दीपक आबा साळुंखे हा मोहरा फोडला आहे. साळुंखे तसे शरद पवारांचेच निस्सीम भक्त. पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदारही केले होते. पण सत्तेच्या मोहापायी ते राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादा गटात गेले. आता सांगोल्यात शिंदेसेनेचे शहाजीबापू अामदार असल्याने तिथे साळुंखेंना अजितदादा उमेदवारी देऊ शकत नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन दीपकआबांनी उद्धवसेनेचे शिवबंधन बांधून घेतले. ठाकरेंनी त्यांना उमेदवारीचे संकेतही दिले आहेत.

सांगोल्यात तिहेरी लढत?

खरं तर महाविकास आघाडी सांगोला हा मतदारसंघ शेकापचे तरुण उमेदवार व गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत यांच्यासाठी सोडणार होती. पण अनिकेत यांच्यापेक्षा दीपक आबा साळुंखे हेच शहाजीबापूंना कडवी झुंज देऊ शकतात, ही खात्री पटल्याने ठाकरेंनी त्यांना पक्षात आणण्याचा निर्णय घेतलाय. मात्र शेकापचे अनिकेत हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे सांगोल्यातून शहाजीबापू, साळुंखे व अनिकेत पाटील यांच्यात तिहेरी लढत होईल. यात जर अनिकेत यांनी चांगली मते घेतली तर ते शहाजीबापूंच्या पथ्यावर पडू शकेल. मात्र अनिकेत यांचे मन वळवण्यात महाविकास आघाडीचे नेते यशस्वी झाले अन‌् एेकास एक फाईट झाली तर मात्र शहाजीबापूंना पराभवाचा डोंगर साळंुखे आबा नक्कीच दाखवू शकतात.. असा ठाकरेंना विश्वास आहे.