भाजपने खेळला सेफ @ 99 गेम

महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपाचा खल सुरू असताना भाजपने सर्वात आधी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करुन प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपच्या वाट्याला एकूण १५० ते १६० मतदारसंघ येऊ शकतात. २०१९ मध्ये त्यांचे १०५ आमदार निवडून आले होते. त्यामुळे विद्यमान आमदारांपैकी ९९ जागा जाहीर करणे तसे त्यांच्यासाठी अवघड नव्हते. इतर पक्ष बंडखोरांच्या धास्तीने यादी लांबवत असताना विद्यमान आमदारांचाच सर्वाधिक समावेश असलेली पहिली यादी जाहीर करुन भाजपने सेफ गेम खेळला असल्याचे मानले जाते. काय आहेत या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

विद्यमान आमदारांचा पहिल्या यादीत समावेश…

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी दुपारी जाहीर करण्यात आली. त्यात ७९ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यावर भाजपला पाठिंबा देणाऱ्या गोंदियाचे विनोद अग्रवाल, उरणचे महेश बालदी व इचलकरंजीचे प्रकाश आवाडे यांना भाजपने आता ‘कमळा’वर लढण्याची अट घालून उमेदवारी जाहीर केली आहे. अशा ८२ विद्यमान आमदारांचा पहिल्या यादीत समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपुरातून उमेदवारी मिळाली आहे. ते सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. २०१९मध्ये तत्कालिन मंत्री व सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापून टेकचंद सावरकरांना उमेदवारी देण्यात आली होती. सावरकर निवडूनही आले होते, पण बावनकुळेंचे तिकिट नाकारल्याने ओबीसीसह भाजप निष्ठावंतांमधून मोठी नाराजी व्यक्त झाली होती. ती दूर करण्यासाठी बावनकुळेंना प्रदेशाध्यक्षपद देऊन विधान परिषदेचे आमदारपद देण्यात आले होते. पण तरीही नाराजी कायम होती. त्यामुळे आता सावरकरांना बाजूला सरकवून बावनकुळेंना कामठीतून उमेदवारी मिळाली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत १३ महिलांनाही स्थान मिळाले अाहे, हे विशेष.

पहिल्या यादीत ५ नवे चेहरे…

ज्या उमेदवारांविषयी काहीच आक्षेप नाही, अंतर्गत सर्व्हेमध्ये ज्यांच्या नावावर फुली नाही अशाच उमेदवारांची, आमदारांची नावे भाजपने पहिल्या यादीत घेतले आहेत. आता उर्वरित ५० ते ६० उमेदवारांची नावे दोन-तीन याद्यांमधून जाहीर होतील. त्यात मात्र बरेच बदल झालेले दिसतील. पहिल्या यादीतही ५ मतदारसंघात नवे चेहरे देण्यात आले आहेत. पहिला बदल कामठी मतदारसंघात झाला. तिथे सावरकर यांच्याएेवजी २००९ व २०१४ मध्ये विजयी झालेल्या बावनकुळेंना पुन्हा संधी देण्यात आली. त्यानंतर कल्याण पूर्वमध्येही उमेदवार बदलण्यात आला. शिंदेसेनेच्या शहरप्रमुखावर पोलिस ठाण्यातच गोळीबार करणारे कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी पत्नी सुनिता यांना तिकिट दिले. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी पोटनिवडणूक विजयी झाल्या होत्या. पण जगताप कुटुंबात उमेदवारीवरुन वाद उफाळून आले. त्यामुळे भाजपने अश्विनी यांचे तिकिट कापून त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी दिली.

काही आमदारांना बळजबरीने दिली तिकिटं…

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील भाजप आमदार बबनराव पाचपुते आजारी आहेत. त्यांच्या जागी पत्नी प्रतिभा पाचपुतेंना संधी दिली. पण पाचपुतेंनी आपल्या मुलासाठी उमेदवारी मागितली होती. आता पुन्हा तिकिट बदलून आणण्यासाठी पाचपुतेंनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे आता राजस्थानचे राज्यपाल झाले. त्यांच्या जागी माजी जि.प. सदस्या अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी. विशेष म्हणजे २०१४ मध्ये चव्हाण या बागडेंविरोधात राष्ट्रवादीकडून लढल्या होत्या पण पराभूत झाल्या होत्या. या यादीचे वैशिष्ट म्हणजे नको नको म्हणणाऱ्या दोन उमेदवारांना भाजपने बळजबरीने तिकिट दिले आहे. सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ व नाशिक जिल्ह्यातील चांदवडचे आमदार डॉ. राहूल दौलतराव आहेर हे आमदार यावेळी आम्हाला आमदारकी लढायचीच नाही, असे सांगत होते. पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी आपल्या भूमिका जाहीर केल्या. मात्र तरीही भाजपच्या पहिल्या यादीत त्यांची नावे आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता भाजपच्या दुसऱ्या यादीत कुणाचा पत्ता कट होतो व कोणकोणते नवीन चेहरे येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.