जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस व उद्धवसेनेत वादाचा भडका उडालेला असताना राज्याच्या राजकारणात आणखी एका चर्चेने खळबळ उडाली. ‘उद्धव ठाकरे व फडणवीस यांची भेट झाली. संजय राऊत यांनी अमित शाहांना फोन केला.. अाता ठाकरे स्वबळावर २८८ जागा लढणार’ अशी बातमी माध्यमांमधून चर्चेत आली. विशेष म्हणजे काँग्रेसच्या गोटातून ही माहिती समोर आल्याच्या वावड्याही उठवण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अशा कुठल्याही गाठीभेटी झाल्या नसल्याचे स्पष्ट केले. तर, काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही अशी कुठलीही माहिती आमच्या पक्षाकडे अालेली नसल्याचे सांगून या चर्चेला पूर्णविराम दिला. पण वारंवार अशा वावड्या का उठवल्या जातात… सत्तेवरुन पायउतार केल्यानंतरही भाजपला ठाकरेंची इतकी धास्ती का वाटते…?
देवेंद्र फडणवीस मातोश्री निवासस्थानी..?
काही दिवसांपूर्वी वंचित आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनीही एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करुन खळबळ उडवून दिली होती. त्यात म्हटले होते की, ‘उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी २५ जुलै रोजी दिल्लीतील ७ डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते. तिथे या दोघांत दोन तास बैठक झाली होती,’ असा दावा मोकळे यांनी केला होता. भाजप व उद्धव सेना हे दोन्ही पक्ष एकसमान विचाराचे व आरक्षणविरोधी आहेत हे जनतेला पटवून देण्यासाठी आम्ही ही माहिती देत असल्याचेही मोकळे यांनी सांगितले होते.
ठाकरे-फडणवीस कथित भेटीची बातमी?
आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा अशाच बातम्यांच्या वावड्या उठल्या आहेत. कुठल्या तरी एका मीडियाने ‘उद्धव ठाकरे व फडणवीस यांची भेट झाली. संजय राऊत यांनी अमित शाहांना फोन केला.. अाता ठाकरे स्वबळावर २८८ जागा लढणार’ अशी बातमी दिली. विशेष म्हणजे काँग्रेसच्या गोटातून ही बातमी आपल्याला मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन काँग्रेस व उद्धव सेनेत ताणाताणी सुरू असताना त्याचवेळी ठाकरे व फडणवीस यांच्या कथित भेटीची बातमी पसरवून महाविकास आघाडीत संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जागावाटप लांबण्याची कारणे वेगळीच आहेत, पण त्याला आघाडीत फाटाफूटीचा रंग जाणीवपूर्वक दिला जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या ५ वर्षांचा अनुभव पाहता कोण कोणत्या पक्षासोबत जाईल याचा मतदारांनाही भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे लोकही अशा वावड्यांवर विश्वास ठेवतात व त्याची चर्चा सुरु होते.
अशा लोकांशी आम्ही पुन्हा संपर्क का करू?
उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत व काँग्रेसच्या नेत्यांनी तातडीने या बातम्यांचे खंडन केले. राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान पायतळी तुडवणाऱ्यांशी शिवसेना कधीच हातमिळवणी करणार नाही. त्यांच्याशी हातमिळवणी म्हणजे औरंगजेब-अफजल खानाशी हातमिळवणी केल्यासारखे आहे. ज्या शक्तीसोबत शिवसेनेने सर्वात जास्त संघर्ष केलाय, ज्यांनी आम्हाला तुरुंगात टाकलंय, आमचं सरकार पाडलं, पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, महाराष्ट्र गद्दारांच्या हातात दिला… अशा लोकांशी आम्ही पुन्हा संपर्क का करू? या लोकांशी संघर्ष करूनही जर आमच्यावर आता कुणी शंका घेत असतील तर ते एका बापाची औलाद नाही.’ अशा कडक शब्दात त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला. काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही अशा अफवांची काँग्रेसच्या डोक्यावर फोडले जाणारे खापर चुकीचे असल्याचा दावा केला. वडेट्टीवार म्हणाले, ‘ काँग्रेसकडे अशा भेटीची बातमी नाही. ज्या बातम्या चालवल्या जात आहेत, किंवा जे दावे केले जात आहेत त्यात एक टक्काही सत्यता नाही. आमच्यात भांडणे लावण्याचा हा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात तणाव वाढविण्यासाठी भाजपकडूनच अशा बातम्या पेरण्यात आल्या आहेत. मात्र, आमचा फेव्हीकॉलचा जोड आहे.’
यंदाची निवडणूक भाजप विरुद्ध उद्धव सेनाच…
..पण प्रश्न हा उरतो की भाजपने एकनाथ शिंदे व अजित पवार यांना हाताशी धरुन महाविकास आघाडी खिळखिळी केलेली असताना अजूनही त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नावाची धास्ती का लागलेली आहे. तर याचे उत्तर म्हणजे लोकसभा निवडणुकीत ठाकरे व शरद पवार यांना मिळालेली जनतेची सहानुभूती. पक्ष फोडूनही या दोघांचे जनसमर्थन कमी होत नसल्याने आता भाजपकडूनच अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा संशय विरोधक व्यक्त करत आहेत. वास्तविक… राजकीय विश्लेषकांना मात्र किमान या निवडणुकीत तरी भाजप व उद्धव सेना एकत्र येतील अशी कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. ज्या भाजपन उद्धव ठाकरेंना सत्तेवरुन खाली खेचले, ज्या भाजपने संजय राऊतांना तुरुंगात टाकले, ज्या भाजपने ठाकरेंच्या निकटवर्तीयांमागे ईडी लावली व सर्वात मोठा अपराध म्हणजे ज्या भाजपने बाळासाहेबांची शिवसेना उद्धव यांच्या हातातून हिसकावून घेत एकनाथ शिंदेंकडे दिली त्या भाजपशी हातमिळवणीला उद्धव ठाकरे कदापिही तयार होणार नाहीत, असे सध्या तरी वातावरण आहे. त्यामुळे ही विधानभा निवडणूक तरी भाजप विरुद्ध उद्धव सेना अशीच होणार यात शंका नाही. हां… निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर चित्र काय असेल हे सांगण्याचे धाडस मात्र कुणीही ज्योतिष्यकारही करणार नाही, याचे कारण महाराष्ट्राच्या राजकारणाची नाड अोळखण्याची क्षमता आता कुणातही राहिलेली नाही. अगदी शरद पवारांमध्ये सुद्धा…