भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात बहुतांश ८२ आमदार हे विद्यमान आहेत. तर १७ जागांवर नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यातील अनेक जण २०१९ चे पराभूत आहेत. महायुतीच्या जागावाटपात भाजपने पहिली यादी जाहीर करुन आघाडी घेतली. पण त्यांचा हा आनंद २४ तासही टिकू शकला नाही. कारण यादी जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी नाराजांचा भडका उडाला. उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील बंगल्यावर जाऊ त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. काहींनी बंडखोरीची भाषाही केली. त्यामुळे भाजपच्या गोटात आता चिंतेचे वातावरण आहे. कोण कोण आहेत नाराज..
नव्या चेहऱ्यांची फडणवीसांकडे नाराजी…
२०१४ पासून राज्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर आयात झाली आहे. त्यामुळे मुळ निष्ठावंत बाजूला पडत चालले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अनेकांना विधानसभेचे आश्वासन दिले. मात्र बदलत्या परिस्थितीत भाजपला विद्यमान आमदारांना कायम ठेवणे भाग पडले. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना ते उमेदवारी देऊ शकले नाहीत. त्यामुळे ज्यांचा हिरमोड झाला. असे अनेक नेते फडणवीसांकडे नाराजी व्यक्त करत होते. आम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करणार, असे इशारेही काहींनी दिले. मात्र त्याचा भाजपवर काहीही परिणाम झाल्याचे दिसत नाही. कारण दिलेल्या यादीत बदल होणे जवळपास अशक्यच आहे. आणि आपल्या हाती काही नाही, हे फडणवीस नाराजांना समजावून सांगत होते. पण कुणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
पहिल्या यादीत नाव नसणे म्हणजे धोक्याचे संकेत?
भाजपचे १०५ आमदार अाहेत. त्यातल्या ८२ जणांना तिकिटे जाहीर झाली. अजून २२- २३ आमदारांच्या नावांची यादी आलेली नाही. जर पहिल्या यादीत विद्यमान आमदारांना स्थान दिले गेले तर मग आम्हाला का नाही? असा प्रश्न या आमदारांनी विचारलाय. पण पहिल्या यादीत नाव नाही म्हणजे त्यांची उमेदवारी धोक्यात असल्याचे संकेत दिले जात आहेत. याच काळजीपोटी हे आमदार फडणवीसांकडे आले होते. बेलापूर मतदारसंघातून भाजपने आमदार मंदा म्हात्रे यांना तिकीट दिले आहे. याशिवाय ऐरोली विधानसभा मतदारसंघातून आमदार गणेश नाईक यांना पक्षाने तिकीट दिले आहे. मात्र नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी मंदा म्हात्रे यांना उघड विरोध सुरू केला आहे. त्यांनी बेलापूर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे घाबरलेल्या मंदा म्हात्रे यांनी नाईक पिता- पूत्रांच्या या कारवायांबाबत फडणवीसांकडे तक्रार केली.
विद्यमान आमदारांची नावे असतील तर मग माझे का नाही?
श्रीगोंद्यातून आमदार बबनराव पाचपुते यांच्याएेवजी पत्नी प्रतिभा यांना तिकिट दिले आहे. मात्र हे दोघेही आपला मुलगा विक्रमसिंह यांना तिकिट मिळावे यासाठी साकडे घालण्यास गेले होते. पण फडणवीसांनी त्यांना परत पाठवले. नाशिक जिल्ह्यातील देवळा-चांदवडमधून उमेदवारी मला नको, चुलतभाऊ केदा यांना द्या, असे साकडे आमदार राहूल आहेर यांनी घातले. मात्र पक्षाचा सर्व्हे केदा यांना अनुकूल नसल्याचे सांगत डॉ. राहूल यांनाच तिसऱ्यांदा लढण्याचे आदेश देण्यात आले. नाशिक मध्य मतदारसंघाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांचेही नाव पहिल्या यादीत नाही. जर विद्यमान आमदारांची नावे असतील तर मग माझे का नाही? हा प्रश्न फरांदेंनी विचारला. सुमारे २० ते २५ माजी नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांना मुंबईत आणून त्यांनी फडणवीसांसमोर शक्तीप्रदर्शन केले.
फडणीसांपुढे बंडखोरीचे संकंट!
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून पहिल्या यादीत नाव नसल्याचे कारण विचारण्यासाठी आमदार भारती लव्हेकरही फडणवीस यांना भेटायला आल्या होत्या. सोलापूरच्या माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचेही नाव पहिल्या यादीत नाही. लेाकसभेेला ते सोलापूरमध्ये पराभूत झाले. २०१९ मध्ये त्यांच्या विजयाचे शिल्पकार असलेले मोहिते पाटलांनी आता भाजप सोडली आहे. त्यामुळे सातपुतेंचा विजय कठीण बनलाय. मग आपले काय होणार? हा प्रश्न सातपुते फडणवीसांना विचारत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पक्षाने पुन्हा कुलाब्यातून उमेदवारी दिली. भाजपचे नेते माजी राज्यमंत्री राज के. पुरोहित यांना इथून उमेदवारी हवी होती. त्यामुळे त्यांनी फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन नाराजी व्यक्त केली. नार्वेकर यांच्याविरोधात त्यांनी उघडपणे मोर्चा उघडला आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना बोरिवलीचे विद्यमान आमदार सुनील राणे यांच्या जागी उमेदवारी हवी आहे. पण पहिल्या यादीत ना राणेंचे नाव होते ना शेट्टींची. त्यामुळे आपले काय होणार? हा प्रश्न शेट्टींनी फडणवीसांना विचारला. माजी आमदार अतुल शहा यांनी मुंबादेवी मतदारसंघातून तिकीट मागितले आहे. आता या नाराजांची समजूत कशी काढायची? त्यांची बंडखोरी कशी रोखायची? असे अनेक प्रश्न फडणवीसांपुढे उभे आहेत. यातून ते कसा मार्ग काढतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे.