मराठवाड्यात शरद पवारांचे निष्ठावंतांना झुकते माप

महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने गुरुवारी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात मराठवाड्यातील १० उमेदवारांचा समावेश आहे. त्यात ९ निष्ठावंतांसह एका आयात उमेदवाराला तिकीट दिले आहे. काय आहेत शरद पवार यांच्या पक्षाची मराठवाड्यातील गणिते जाणून घेऊया मिशन पॉलिटिक्समधून…

पवारांना साथ देणाऱ्यांना संधी…

अहमदपूर येथून माजी मंत्री विनायक पाटील, उदगीरहून माजी आमदार सुधाकर भालेराव, भोकदरन येथून चंद्रकांत दानवे, घनसांगवी येथून राजेश टोपे, किनवटहून प्रदीप नाईक, वसमतहून जयप्रकाश दांडेगावकर, जिंतूरहून विजय भांबळे व केजहून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यामध्ये पडत्या काळात शरद पवार यांना ज्यांनी साथ दिली अशा विद्यमान आमदार व माजी मंत्री राहिलेल्या चेहऱ्यांसह नवीन उमेदवारांना देखील संधी देण्यात आली आहे. उदगीरमध्ये भाजपचे १० वर्षे आमदार राहिलेले सुधाकर भालेराव शरद पवार गटात आले आहेत. पंकजा मुंडे यांच्यासोबत भाजपचे मराठवाड्यातील आमदार म्हणून ते निवडून आले होते. अजित पवार गटाचे आमदार व क्रीडा मंत्री असलेले संजय बनसोडे यांच्याशी त्यांची लढत होणार असल्याने त्यांच्यासमोर आता तगडे आव्हान असणार आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातून विजय भांबळे यांचे नाव जाहीर झाले आहे. भाजपचे नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर आणि माजी आमदार विजय भांबळे यांच्यात २०१९ मध्ये लढत झाली होती. विजय भांबळे यांचा मेघना बोर्डीकर यांनी अवघ्या ३ हजार ७१७ मतांनी पराभव केला होता. भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्याशी त्यांची प्रमुख लढत होणार आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातून आमदार राजेश टोपे यांना शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली असून त्यांची ही सहावी टर्म आहे. अजून विरोधी पक्षाने या ठिकाणी आपला उमेदवार जाहीर केला नसून त्यानंरच येथील नेमके चित्र स्पष्ट होईल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना १ लाख ७ हजार ८४९ मते पडली होती.

शरद पवार व अजित पवार गटात चुरशीची लढत…

बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघात शरदचंद्र पवार गटाकडून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मागच्या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या उमेदवार आमदार नमिता मुंदडा यांनी ३२९०९ मतांनी पराभव केला होता. पृथ्वीराज साठे यांना ९०५२४ मते पडली होती. यावेळी त्यांची पुन्हा एकदा नमिता मुंदडा यांच्यासोबत प्रमुख लढत होणार आहे. साठे आपले नशिब आजमवणार आहेत. अहमदपूरमध्ये भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केलेले माजी आमदार विनायक पाटील यांना तिकीट मिळाले आहे. त्यांची लढत अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्याशी होणार आहे. अपक्ष आमदार ते राज्यमंत्री असा प्रवेश केलेले विनायक पाटील यांचा मतदारसंघावर पकड आहे. त्यामुळे शरद पवार गट व अजित पवार गटात चुरशीची लढत होणार आहे.

शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना वसमत मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांचा सामना त्यांचेच शिष्य राहीलेल्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजू नवघरे यांच्यासोबत होणार आहे. नवघरे यांनी मागच्या विधानसभेत अपक्ष उमेदवार अॅड. शिवाजीराव जाधव यांचा ५५०० मतांनी पराभव केला होता. जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये माजी आमदार चंद्रकांत दानवे हे जनसंघाचे जुने कार्यकर्ते व भाजपचे दिवंगत माजी खासदार पुंडलिक दानवे यांचे पूत्र आहेत. तीनवेळा आमदार राहिलेले चंद्रकांत दानवे सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांच्यासमोर माजी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र व भाजपचे आमदार संतोष दानवे यांचे आव्हान आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट हा एकेकाळी राष्ट्रवादीचा गड होता. इथून शरद पवार यांनी माजी आमदार प्रदिप नाईक यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत भाजपचे विद्यमान आमदार भिमराव केराम यांच्याशी होणार आहे. वंचितकडून प्रा. विजय खुपसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विधानसभा निवडणुकीत किनवट-माहूर मतदारसंघात जातीय समीकरण निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी- पाटोदा मतदारसंघातून शरद पवारांनी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना संधी दिली आहे. पक्षात फूट पडल्यानंतर महेबूब शेख हे शरद पवारांच्या बाजूने राहिले. नंतर पक्ष वाढीसाठी ते राज्यभर फिरले. त्याची बक्षीसी म्हणून या युवा नेत्याला पवारांनी विधानसभेच्या मैदानात उतरवले आहे. आष्टी- पाटोद्यात सध्या अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे आमदार आहेत. पण महायुतीतून तिथे भाजपचे सुरेश धस व भीमराव धोंडे यांनीही दावा केला आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार कोण असेल हे अजून ठरलेले नाही. पण भाजप व अजित पवार गटात इथे बंडखोरी अटळ आहे. त्यामुळे महेबूब शेख यांच्या ते पथ्यावर पडू शकते.