लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणमधून पराभूत झालेले भाजप नेते डॉ. सुजय विखे पाटील यांना आता आमदारकीचे वेध लागले आहेत. विखे घराण्याचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्याच संगमनेर मतदारसंघातून उभे राहण्याची तयारी त्यांनी सुरु केलीय. कॅबिनेट मंत्री असलेले वडिल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जोरावर डॉ. सुजय विखे यांनी आठ वेळा आमदार राहिलेल्या बाळासाहेबांना आव्हान देण्याची तयारी दाखवली आहे. भाजपलाही तिथे तगडा उमेदवार मिळत नसल्याने त्यांनीही सुजय यांना ‘गो अहेड’चे संकेत दिले होते. पण आता सुजय यांच्या सभेत एक अशी घोडचूक झालीय की ज्यामुळे थोरातांविरोधात जिंकणे तर दूर, सुजय यांना भाजप उमेदवारी देतोय की नाही? अशीच शंका उपस्थित होत अाहे. काय आहे या मागचे राजकारण जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…
थोरातांच्या कन्येविरुद्ध आक्षेपार्ह विधान…
सुजय विखे पाटील यांनी विधानसभेच्या वातावरण निर्मितीसाठी २५ ऑक्टोबर रोजी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात सुजय हे उपस्थित होते. व्यासपीठावर थोरात विरोधकांची गर्दी जमली होती. संगमनेर तालुक्यातील थोरातांचे जुने राजकीय विरोधक असलेले भाजपचे वयस्कर नेते वसंतराव देशमुख यांनीही विखेंच्या मेळाव्यातून जोरदार भाषण ठोकले. मात्र थोरातांवर प्रखर टीका करताना त्यांनी बाळासाहेबांची कन्या डॉ.जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. झालं.. ही बातमी गावात पसरली अन् काही वेळातच थोरात समर्थक कार्यकर्ते व काही महिलांनी या ठिकाणी येऊन मेळावाच उधळून टाकला. इतकेच नव्हे तर गावातून बाहेर जाणाऱ्या विखे पाटील समर्थकांच्या गाड्या अडवून त्यावर दगडफेक केली, एका गाडीला तर आगही लावली. यावरून विखे आणि थोरात यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून राजकारणही तापले आहे.
सुजय विखे पाटील यांनी माझ्यावर हल्ल्याचा विरोधकांचा कट होता, असा आरोप केलाय. तर महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना त्वरित अटक करा, या मागणीसाठी थेारात समर्थकांनी दोन दिवस जोरदार आंदोलन केले. अखेर पोलिसांनी वसंतराव देशमुख यांना अटक केली. तसेच दगडफेक व जाळपोळ प्रकरणात जयश्री थोरात यांच्यासह त्यांच्या ५० समर्थकांवरही गुन्हे दाखल केले. हिंसाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याचे आपण समजू शकतो. पण जे वसंतराव आक्षेपार्ह बोलले त्यांच्यावर कडक करण्याएेवजी त्यांनी ज्यांची बदनामी केली त्या जयश्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल का केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘मला न्याय देण्याची आवश्यकता असताना विषय दुसरीकडे भरकटवला जात आहे. मात्र, मी आता पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणार आहे. अटक करायची असेल तर मला अटक करा. मात्र, या सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचं काम करायचं नाही. आता दिवाळी आली आहे, त्यामुळे प्रत्येकांच्या घरी दिवाळी साजरी केली जाते. मात्र, ते सर्वसामान्य लोकांची दिवाळी खराब करत आहेत, अशी टीका त्यांनी पोलिसांवर केली. एकूणच या एका सभेमुळे संगमनेरमधील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
आता वयाने इतके ज्येष्ठ असूनही आक्षेपार्ह भाषा बोलणारे वसंतराव देशमुख आहेत तरी कोण हे आपण जाणून घेऊ या..
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक या गावचे रहिवासी असलेले देशमुख हे थोरातांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात दिवंगत भाऊसाहेब थोरात, त्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर ते कायम टीका करत असतात. यातून अनेकदा वादही झाले आहेत. संगमनेर साखर कारखान्याच्या एका वार्षिक सभेमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. कदाचित वाढत्या वयामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून तसे अलिप्त होते. मात्र,
सुजय विखेंनी जाणीवपूर्वक त्यांना संगमनेरच्या सभेत अध्यक्षस्थानी विराजमान केले अन् देशमुखांची जीभ घसरली. यामुळे देशमुखांचे फार नुकसान होणार नाही, पण त्यांना बोलावून सुजय यांनी आपल्या पायावरच धोंडा पाडून घेतलाय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
एकीकडे भाजप लाडकी बहिण योजनेतून महिलांचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्याच पक्षाचे नेते महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करुन त्यांचा अवमान करत आहेत, अशी टीका आता विरोधक करु लागले आहेत. हे प्रकरण पेटते कसे राहिल याची काळजी थोरात समर्थक घेत आहेत. या मुद्द्याचा त्यांना निवडणुकीतही फायदा होऊ शकतो. अशा तणावपूर्ण परिस्थितीत सुजय यांना संगमनेरमधून मतदारांचाही कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी शंका आहे. त्यामुळे भाजप त्यांना उमेदवारीच देईल का? याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. एकूणच थोरातांविरोधात लढण्याची चांगली चालून आलेली संधी सभेतील एका ज्येष्ठ नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याने सुजय यांनी गमावली, त्यांनी स्वत:हून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलाय.. असेच म्हणावे लागेल.