राज ठाकरे यांच पूत्र अमित हे माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून उभे राहिले खरे, पण त्यांना निवडून कसे आणायचे ? हा प्रश्न राज ठाकरेंसमोर आहे. त्यासाठी तडजोडीही कराव्या लागतील. लेाकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्या बदल्यात आता अमितला निवडून आणणे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी माहिममध्ये अमित यांना युतीने पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव मांडला. पण शिंदेसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तो अमान्य आहे. काहीही झाले तरी मी ही जागा सोडणार नाही, असे ते सांगत आहेत. भाजपने ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ ही भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मात्र कोंडी झालीय.. खरंच राजपुत्रासाठी शिंदे आपल्या शिवसैनिकाला माघार घ्यायला लावतील का?… हा दबाव सदा सरवणकर झुगारण्याचे धाडस दाखवतील का? याबाबत जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…..
माहीम शिवसेनेचा बालेकिल्ला…
२०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे आमदार व नंतर मंत्रीही झाल्याने आता राज ठाकरेंचे पूत्र अमित यांनाही आमदारकीचे वेध लागले आहेत. सुमारे तीन दशके राजकारणात असूनही राज ठाकरेंनी हा मोह टाळला, पण आता पुत्रहट्टापुढे त्यांचाही नाईलाज झालाय. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करुन मनसेने अमित यांना माहिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. माहिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला. मनसे व शिंदेसेना या शिवसेनेच्याच पोटशाखा. २००९ मध्ये मनसेचे नितीन सरदेसाई माहिममधून निवडून अाले होते. त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये शिवसेनेचे सदा सरवणकरच इथले आमदार अाहेत. शिवसेना भवनाची वास्तूच या मतदारसंघात असल्याने इथला आमदार होणे हे एका शिवसैनिकासाठी अभिमानाची बाब असते.
सरवणकरांमुळे शिंदेंची गोची…
शिवसेनेत फूट पडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज ठाकरे यांच्यातील मैत्री अधिक घनिष्ट झाली आहे. कदाचित उद्धव ठाकरेंना धडा शिकवल्याचा आनंद शिंदेंपेक्षा राज यांनाच अधिक झालाय हे यातून दिसून येते. त्यामुळे राज यांनी वेळोवेळी महायुतीला अनुकूल भूमिका घेतली. नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीतही त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आताच्या विधानसभा निवडणुकीतही सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा मनसेचा उद्देश हा त्यांचे आमदार निवडून आणण्यापेक्षा महायुतीला अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी मत काटाकाटीचे राजकारण हाच जास्त असल्याचा दिसून येताे. खास करुन मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासारख्या शहरी भागात मनसेचे उमेदवार उद्धव सेनेच्या मतांत फूट पाडण्यासाठीच उभे केले आहेत, हे लपून राहिलेले नाही. या सर्व सहकार्याच्या मोबदल्यात भाजपने अमित यांना माहिममधून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवलाय. आता राज ठाकरे आपल्यासाठी इतके काही करत आहेत म्हटल्यावर एकनाथ शिंदे हेही अमित यांना निवडून आणण्याची जबाबदारी टाळू शकत नाहीत. पण आता शिंदेसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी मात्र त्यांची गोची करुन ठेवलीय. शिवसेना ठाकरे गटाकडून इथे महेश सावंत यांना तिकीट देण्यात आली आहे. पण त्यांची फारशी चर्चा नाही. खरी लढत होऊ शकते ती अमित व सरवणकर यांच्यातच.
सरवणकरांचा लढण्याचा निर्धार…
भाजपच्या दबावामुळे सरवणकर यांचे तिकिट कापले जाण्याची चर्चा सुरु झाल्याने असंख्य शिवसैनिकांनी त्यांच्या प्रभादेवीतील कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. पण सरवणकरांनी त्यांना शांत केले. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आपला विश्वास आहे. त्यांनी मला एबी फॉर्म दिलाय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत किंवा कुणाच्याही दबावामुळे मी मागे हटणार नाही. सोमवारी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. आशिष शेलार हे राज ठाकरेंचे मित्र आहेत. त्यामुळे कदाचित त्यांनी अमित यांना पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली असेल, पण शिंदेंनी मला एबी फॉर्म दिलाय. त्यामुळे मीच इथून लढणार’ असा निर्धार सरवणकर यांनी व्यक्त केलाय…
उद्धव ठाकरेंची परतफेड?
त्यामुळे राज ठाकरे यांना वाटते तितकी माहिमची लढत सोपी राहिलेली नाही. आता भाजप व एकनाथ शिंदे यांच्याकडून दबाव वाढला तर सरवणकरांना माघार घेण्याशिवाय पर्याय नसेल. पण त्यामोबदल्यात घसघशीत काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी ते उमेदवारी कायम ठेवण्याचा ताठरपणा करत असतील, अशी शंका काही राजकीय विश्लेषकांना वाटते. उद्धव ठाकरेंची भूमिकाही इथे तितकीच महत्त्वाची आहे. २०१९ मध्ये मनसेने आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळीत उमेदवार दिला नव्हता. त्याची परतफेड करण्यासाठी उद्धव यांनी इथे कमकुवत उमेदवार दिल्याची चर्चा होत अाहे. पण सर्वांचे लक्ष आहे ते खरंच सदा सरवणकर आपल्या भूमिकेवर ठाम राहतात का की अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी तडजोड करुन माघार घेतात.. यात दुसरी शक्यता जास्त वाटतेय…