बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच असल्याने जनमाणसातून संताप व्यक्त केला जात अाहे. विशेष म्हणजे या हत्येत ज्यांचा सहभाग असल्याची नावे समोर येत आहेत, ते धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित आहेत. व स्वत: वाल्मिक कराडवरही दोन कोटीच्या खंडणीचा गुन्हा दाखल असल्याने खून प्रकरणातही कराडचे नाव जोडले जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकताच बीडमध्ये एक भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यात बीडमधील वाढत्या दहशतीला मंत्री धनंजय मुंडे हेच जबाबदार असल्याचा आक्रोश सर्वच पातळीवरुन व्यक्त करण्यात आला. सुशासन व पारदर्शी कारभाराचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही राजकीय अपरिहार्यतेचे कारण पुढे न करता या गंभीर विषयावर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचे धाडस दाखवावे, अशी अपेक्षा अाता बीडकरांमधून व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री हे धाडस दाखवतील का? हा प्रश्न आहे. काय वाढलाय बीडमध्ये मुंडे- कराड यांच्याविरोधात इतका रोष.. जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून
मनोत राग धरुन संतोष देशमुखांती क्रूरपणे हत्या…
पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना २ कोटी रुपयांची खंडणी मागिततल्याच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यासह काही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ डिसेंबर रोजी काही लोक कंपनीच्या कार्यालयात पैसे मागायला गेले होतेे, तेव्हा वाल्मिक कराडने कंपनीच्या व्यवस्थापकांना फोन लावून २ कोटी रुपये द्या नाहीतर काम बंद करा, असे धमकावल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी या गुंडांनी तेथील एका सुरक्षा रक्षकाला मारहाणही केली होती. ही घटना मस्साजोग परिसरात घडली. त्यामुळे तेथील सुरक्षा रक्षकाने स्थानिक सरपंच संतोष देशमुख यांना मदतीसाठी बोलावले. देशमुख यांनी मध्यस्थी करत खंडणीखोरांना तेथून हाकलून दिले. हाच राग मनात धरुन या आरोपींना ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
हत्येमागे खरा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा विरोधकांचा आरोप…
सुरुवातीच्या काळात हे प्रकरण पोलिसांनीही फारसे गांभीर्याने घेतले नाही. किंवा त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे त्यांनी आरेापींना अटक केली नसल्याचा आरोप होत आहे. मात्र देशमुख यांच्या हत्येचा आक्रोश वाढल्यानंतर, सर्वपक्षीय नेत्यांनी यात लक्ष घालून सरकार व पोलिसांना जाब विचारल्यानंतर मात्र पोलिसांनी वाल्मिक कराडवर २ कोटीची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला. पण केवळ खंडणीपुरते हे प्रकरण मर्यादित नाही तर देशमुखांच्या हत्येमागे खरा सूत्रधारही कराडच असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे त्याला तातडीने अटक करावी व त्याच्यावर खूनाचा गुन्हाही दाखल करावा, या मागणीसाठी बीडमध्ये भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. कराडने आतापर्यंत अनेक खून केले आहेत, अनेकांकडून खंडणी वसूल केलीय, शेकडो एकर जमिनी हडप केल्याचा आरोप केला जातोय.
गेली ५ वर्षे बीडचे पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्यामुळे कराडची इतकी गुंडगिरी वाढल्याचा आरोप आतापर्यंत फक्त विरोधकच करत होते. पण आता सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस, केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा, स्वत: धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी पक्षातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित करु लागले आहेत. विशेष म्हणजे वाल्मिक कराड आपला निकटवर्तीय असल्याचे स्वत: धनंजय मुंडेही जाहीरपणे मान्य करतात. त्यामुळेच कराडला मुंडेंनीच लपवून ठेवल्याच्या आरोपात तथ्य वाटतेय.
अंजली दमानियांकडून धक्कादायक पुरावे…
देशमुख यांच्या खूनाच्या निमित्ताने वाल्मिक कराडच्या गुंडगिरीचा व त्याच्यावर वरदहस्त असणाऱ्या धनंजय मुंडेंच्या कारनाम्याचे एक एक किस्से दररोज बाहेर येऊ लागले आहेत. मुंडेंच्या परळीत मिसुरडं न फुटलेले तरुणही कसे बंदुका कमरेला लावून फिरत आहेत, कायदा- सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे इथे निघत आहेत याचे पुरावेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर जाहीर केले, पोलिस अधीकांकडेही दिले आहेत. आता नवे पोलिस अधीक्षक या गुंडांवर व त्यांच्या म्होरक्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का? हा प्रश्न आहे. मुळात, राज्याचे गृहमंत्रिपद ज्यांच्याकडे आहे त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलिस अधीक्षकांना गुंडांवर कारवाई करण्याची तेवढी मोकळीक दिली जाते का? हा त्यापेक्षाही मोठा प्रश्न आहे. कारण, गुंडगिरीचे समूळ उच्चाटन न होण्यामागे पोलिसांची हतबलता हे जेवढे प्रमुख कारण आहे, त्यापेक्षाही राज्यकर्त्यांचा तसे न करण्यासाठी जो दबाव असतो ते प्रमुख कारण असते. बीडमध्ये गेल्या दहा- पाच वर्षात जी गुंडगिरी वाढली त्यामागेही सत्ताधाऱ्यांचे गुंडांना असलेले पाठबळ व पोलिसांवर असलेला दबाव हेच कारणीभूत असल्याचे आता लपून राहिलेले नाही.
धनंजय मुंडेंना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मानाचे स्थान कधीपर्यंत?
राज्याचे गृहमंत्रिपद आपल्याकडेच ठेवण्यासाठी मित्रपक्षाशी शेवटपर्यंत निकराने लढणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता त्या गृहमंत्रिपदाचा सुयोग्य वापर हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे. ज्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे या सहकाऱ्यावर गुंडांना अभय देण्याचे अारोप केले जातात, त्यांच्या परळी मतदारसंघात खुले आम कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत आणि खंडणीचे गुन्हे दाखल झालेला वाल्मिक कराड आपला निकटवर्तीय आहे असे छातीठोकपणे जे मंत्री सांगतात, त्या धनंजय मुंडे यांना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मानाचे स्थान कधीपर्यंत मिळत राहील? हा सामान्य बीडकरांचा प्रश्न आहे.
एकटे फडणवीस मुंडेंची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करु शकतात का?
२०१५ मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी भूखंड घोटाळ्याचे आरोप झाले होते तेव्हा फडणवीस यांनी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ मंत्र्याला पायउतार होण्याचे आदेश दिले होते. तेच फडणवीस आता पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. म्हणूनच कायदा सुव्यवस्थेला नख लावणारे किंवा नख लावणाऱ्यांना अभय देणारे मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या मंत्रिमंडळात कसे काय राहू शकतात? अशा नेत्याची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची धमक फडणवीस दाखवणार आहेत का? हाही जनतेचा प्रश्न आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन काढण्याचा निर्णय एकटे फडणवीस घेऊ शकत नाहीत, हे खरे आहे. पण अजित पवार यांनाही कायदा- सुव्यवस्थेपेक्षा व जनसामान्यांच्या आक्रोशापेक्षा धनंजय मुंडे इतके जवळचे वाटतात का? हाही अजितदादांना प्रश्न आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे सांगणार नाहीत तोपर्यंत वाल्मिक कराड पोलिसांना शरण येणार नाही, असे विरोधक सांगतात. जोपर्यंत कराड शरण येत नाही तोपर्यंत विरोधकांचे आंदोलनही थांबणार नाही. मग अशा अस्थिर वातावरणात बीड जिल्ह्याला किती दिवस लटकवत ठेवणार आहे फडणवीस यांचे सरकार?
बीडचे पालकत्व फडणवीसांकडे सोपवण्याची मागणी…
ज्या बीड जिल्ह्याचे पालक असण्याचे दावे करणाऱ्या धनंजय मुंडे यांना आतापर्यंत खून झालेल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जाण्यासही वेळ मिळालेला नाही? हे किती असंवेदनशीलचे लक्षण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. कालपर्यंत धनंजय मुंडेंनी पालकमंत्रीपद भाड्याने दिले आहे असे आरोप करणाऱ्या त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे याही कॅबिनेट मंत्री झाल्या आहेत. धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाला तर आपल्याला बीडचे पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा त्यांनाही आहे. मग जर बीडचे पालकमंत्रिपद मिरवण्याची त्यांची मनीषा आहे तर मग आपल्याच जिल्ह्यातील एका बहिणीचे कुंकू पुसले गेले, तिचे सांत्वन करण्याची माणुसकी पंकजा मुंडे यांनीही का दाखवली नाही? हाही प्रश्न आहेच. म्हणूनच, बीडचे पालकमंत्रिपद आता मुंडे बंधू- भगिनींच्या हाती न सोपवता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवावे, ही रास्त मागणी विरोधकांकडून होत आहे. फडणवीस यांच्यावर राज्यातील जनतेेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आता त्यांनी तो सिद्ध करण्याची वेळ आली आहे.
बीडमधील गुंडगिरी संपवायची असेल तर खंडणीखोर वाल्मिक कराडला बेड्या घालण्याचे व त्याला अभय देणाऱ्या धनंजय मुंडेंची मंत्रिपदावरुन तत्काळ हकालपट्टी करण्याचे धाडस फडणवीसांना दाखवावे लागेल? तरच देशमुख कुटुंबीयांसह बीड जिल्ह्यातील आक्रोश शांत होऊ शकतो. मित्रपक्षाच्या दबावाला बळी न पडता फडणवीस यांनी हे धाडस दाखवावेत, हीच अपेक्षा तमाम महाराष्ट्र त्यांच्याकडून करत आहे.