शिंदेसेनेत नवा उदय; भाजपचा बी प्लॅन?

अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचे धाडस दाखवले. पुन्हा सत्ता मिळणार असल्यामुळे त्यांच्यासोबत शिवसेनेचे पाच- दहा नव्हे तर तब्बल ४० आमदार गेले. या सर्वांना सत्तेचे लाभही मिळाले. आता नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे नाराज आहेत. ते आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढवत आहेत. कधी बैठकांमध्ये रोखठोक बोलून तर कधी रुसून आपल्या गावी जाऊन बसत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. इतके बहुमत मिळूनही शिंदेंच्या या अडवणूकीच्या धोरणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्रस्त आहेत. त्यामुळे शिंदेना बाजूला करुन त्यांच्याच पक्षातील एका नव्या नेताचा ‘उदय’ करण्याची रणनीती भाजपकडून आखली जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण अाहे हा नेता अन‌ खरंच ठाकरेंप्रमाणे सत्तेच्या मोहापायी शिंदेंनाही शिवसेनेचे आमदार सोडून जातील का? याबाबत जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…

उदय सामंतांकडे शिवसेनेचे २० आमदार?

पालकमंत्रिपदावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडल्याची संधी साधून उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत व काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक नवाच गौप्यस्फोट करुन महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार का? अशी चर्चा सुरू झाली. महायुतीतील वादाचा संदर्भ पकडून खासदार संजय राऊत म्हणाले, ‘भाजपने ज्या रितीने उद्धव ठाकरेंना दगा दिला व एकनाथ शिंदे यांना फोडले, त्याच रितीने आता ते पुन्हा एकदा शिवसेनेच फूट पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. आता त्यांना एकनाथ शिंदेंची गरज संपली आहे. त्यामुळे एक नवा ‘उदय’ निर्माण करण्याच्या तयारीत अाहेत. माझ्या माहितीनुसार, उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेचे २० आमदार आहेत. त्यांना आपल्याकडे खेचण्याचा भाजप प्रयत्न करत आहे व एकनाथ शिंदेंना बाजूला फेकले जाऊ शकते.’

अन् महायुतीत उडाली एकच खळबळ…

आता संजय राऊत यांचे सगळेच बोलणे ना राजकारणी गांभीर्याने घेतात ना माध्यमांचे प्रतिनिधी. मात्र याच दिवशी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही असाच गौप्यस्फोट केला होता. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणले. आता शिंदेंना संपवून नवीन “उदय’ होईल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल… असे वडेट्टीवार म्हणाले होते. ‘शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. ते बाजूला व्हावेत अशी नीती आहे. उद्याचा नवा “उदय’ कोण हे तुम्हाला दिसेल. दोन्हीकडे चांगले करून ठेवलेले संबंध उद्याच्या उदयासाठीच आहेत. आज पालकमंत्री तर उद्या मंत्री, परवा उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर मुख्यमंत्री बदलायची वेळ येईल. सत्तेतून पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे.’? असा दावा वडेट्टीवार यांनी केला. या दोन्ही नेत्यांच्या गौप्यस्फोटामुळे महायुतीत एकच खळबळ उडाली. त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी भाजप, शिंदेसेनेच्या नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली.

उदय सामंतांचे दावोसहून स्पष्टीकरण…

मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला गेलेले उदय सामंत यांना तिथून व्हिडिओ रेकॉर्डंग पाठवून या सर्व अफवा असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. सामंत म्हणाले, ‘संजय राऊतांनी माझ्याबद्दल केलेलं वक्तव्य हा एक राजकीय बालिशपणा आहे. एकनाथ शिंदेंमुळेच मला दोनदा राज्याचे उद्योगमंत्रिपद मिळाले याची मला पूर्ण जाणीव आहे. माझे राजकीय जीवन घडवण्यासाठी शिंदेंनी केलेले प्रयत्न मी कधीही विसरू शकत नाही. मी शेवटपर्यंत त्यांच्याशी एकनिष्ठच राहणार आहे.’ राऊतांच्या टीकेला पलटवार करण्यासाठी शिंदेसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, ‘ उद्धवसेनेचे १० ते १५ आमदारच आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदेसेनेत येतील. काँग्रेसचे काही आमदारही शिंदेसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांची संख्या १० ते १५ अशी आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपल्या पक्षातील आमदारांना टिकवण्यासाठी अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत. दुसऱ्याच्या ‘उदया’पेक्षा स्वत:च्या अस्ताची काळजी त्यांनी घेतली पाहिजे,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

गौप्यस्फोटात कितपत तथ्य?

एकूणच, महायुतीत वेगवेगळ्या कारणामुळे वाद वाढत असताना अशा परिस्थिीतची संधी घेऊन विरोधी पक्षांनी गौप्यस्फोट करण्याचे अापले काम चोखपणे निभावले आहे. यात कितपत तथ्य आहे, याबाबत राजकीय विश्लेषकांनाही शंकाच वाटते. पण अगदीच तशी वेळ आली, म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांना आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी अडवणूक करण्याचे धेारण कायम ठेवले, अगदी युती तुटेपर्यंत ताणण्याचा प्रयत्न केला तर मात्र भाजप हायकमांड शिंदेंनाही बाजूला सरकवण्यास मागेपुढे पाहणार नाही. अशा वेळी सत्तेच्या मोहापायी शिंदेसोबत जे आमदार भाजपकडे यायला तयार होती, किंवा वेगळा गट म्हणून सत्तेत बसण्यास तयार होतील त्याचे नेतृत्व उदय सामंत यांच्याकडे येऊ शकते, हे हेाणे अशक्य मात्र नसल्याचे विश्लेषकांचे मत आहे. मुळात, उदय सामंत हे काही सुरुवातीपासून शिंदेंशी एकनिष्ठ नाहीत. म्हणजे २० जून २०२२ रोजी सर्वप्रथम शिंदे जेव्हा मुंबईतून सूरतकडे बंड करुन निघाले तेव्हा त्यांच्यासोबत जे १०- १५ आमदार होते त्यात उदय सामंत नव्हतेच. उलट सुरुवातीचे तीन दिवस ते उद्धव ठाकरेंसोबतच होेते व गद्दारांवर टीका करत होते. मात्र आता सत्तापालट होणार याची खात्री पटल्यानंतर तिसऱ्या दिवशी ठाकरेंची परवानगी घेऊन सामंत सूरतकडे गेल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. त्यामुळे जिकडे सत्ता तिकडे सामंत जाऊ शकतात. यापूर्वी सत्तेच्या मोहापायी त्यांनी शरद पवारांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केलेला आहेच.

एकनाथ शिंदेनंतर उदय सामंत पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते?

आताही २०२४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपद मिळत नसल्याने एकनाथ शिंदे यांनी सत्तेबाहेर राहून पक्ष चालवण्याचा निर्णय घेतला हाेता तेव्हाही उपमुख्यमंत्रिपदासाठी शिंदेसेनेकडून उदय सामंत यांचेच नाव आघाडीवर होते. म्हणजे त्यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये पक्ष सहभागी असेल, हेही ठरत होते. याचाच अर्थ पक्षात एकनाथ शिंदे नंतर उदय सामंत हेच दुसऱ्या नंबरचे नेते झाले आहेत. आता फडणवीस यांनी त्यांनाही चांगलेच विश्वासात घेतले आहे. २०१४ ते २०१९ च्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे सत्तेत असूनही भाजपची पावलापावलावर अडवणूक करायचे त्या काळात फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंशी जवळीक वाढवून त्यांना आपलेसे केले होते. तसेच चित्र सध्या आहे. फरक फक्त एवढाच आहे की उद्धव ठाकरेंच्या जागेवर एकनाथ शिंदे आहेत, अन‌् एकनाथ शिंदेंची जागा उदय सामंत यांनी घेतली आहे. त्यामुळे सध्या तरी वरकरणी खासदार संजय राऊत व विजय वडेट्टीवार यांचे गौप्यस्फोट हे हास्यास्पद वाटत असले तरी ते अगदीच अशक्य नाहीत, असे भाजपच्या गोटातूनही सांगितले जाते. पण, आताशी कुठे सरकार स्थापन झाले आहे. लगेचच असे काही होईल, अशी शक्यता नाही. पण दोन- अडीच वर्षानंतरही एकनाथ शिंदेंकडून सरकारच्या अडवणूकीचे धोरण कायम राहिले तर मात्र शिवसेनेत नवा उदय करण्याचा चमत्कार भाजप हायकमांड करु शकते, याचे भान शिंदेंनीही ठेवायला हवे.