खरंच आदित्यही जातील उद्धव ठाकरेंना सोडून?

२०२२ मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले. इतकेच नव्हे तर शिवसेना हा पक्ष व धनुष्यबाण हे चिन्हही ठाकरेंना गमवावे लागले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा पुरता सफाया झाला, त्यामुळे आता उरलेसुरले शिलेदारही त्यांना साेडून जाऊ लागले आहेत. जे उरले आहेत त्यांच्याकडेही संशयाने पाहिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे पराभूत आमदार शहाजी बापू पाटील यांनी ‘एक वेळ अशी येईल की आदित्य ठाकरेही उद्धव ठाकरेंना सोडून जातील’ असे भाकित वर्तवले. ते शक्य नसले तरी पूत्रासारखे किंवा भावासारखे ज्या नेत्यांना ‘मातोश्री’ने सांभाळले ते अडचणीच्या काळात उद्धव यांना सोडून का जात आहेत, आता खरंच पुन्हा उद्धव सेना खंबीरपणे उभी राहिल याची खात्री या नेत्यांना राहिली नाही काय?…. जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून..

अन् शिंदेसेनेत जाणाऱ्यांचा ओघ वाढत राहिला…

एकनाथ शिंदेंसोबत जे आमदार, नेते शिंदेसेनेत गेले ते सत्तेच्या आमिषानेच गेले यात शंका नाही. शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या पाठीशी भाजपचे भक्कम पाठबळ असल्याने पुढील काही वर्षे शिंदेसेना केंद्रात व राज्यात निश्चित सत्तेत राहिल, अशी खात्री निर्माण झाल्यामुळे शिंदेसेनेत जाणाऱ्यांचा ओघ वाढत गेला. त्यातच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी केलेली हातमिळवणी, राष्ट्रवादीशी केलेली आघाडी ही हिंदुत्ववादी विचारांशी फारकत असल्याची टीकाही चोहोबाजूने सुरु झाली. त्यामुळे उद्धव सेनेच्या नेत्यांना आपल्या मतदारसंघातही तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. एकतर सत्तेपासून वंचित राहण्याचा धोका व दुसरीकडे राजकीय भविष्यही अंधारात असल्याचे दिसू लागल्यानेच एक एक करत अनेक निष्ठावंत उद्धव ठाकरे यांना सोडून जात आहेत. काही जणांना ईडी, सीबीआय चौकशीचा धाक दाखवूनही फोडले जात असल्याचा आरोप होत आहे.

केवळ मातोश्रीवर निष्ठा ठेवून चालेल का?

कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी नुकतेच शिंदेसेनेत प्रवेश केला. गेल्या अडीच वर्षात हे साळवी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. शिंदेंसोबत गेलेल्या नेत्यांना हेच साळवी गद्दार म्हणायचे. कोकणचा बालेकिल्ला गद्दारांच्या हाती जाऊ देणार नसल्याच्या शपथा त्यांनी घेतल्या हेात्या. पण विधानसभा निवडणुकीत पक्षाची जी धुळधाण उडाली, ते पाहता आता आपले राजकीय भवितव्य टिकवायचे असेल तर शिंदेसेनेसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. फक्त ‘मातोश्री’ची निष्ठा ठेऊन चालणार नाही तर व्यवहारिक मार्ग पत्कारावा लागेल, हे कळून चुकल्याने नाईलाजाने का होईना साळवेंनी शिंदेंचा धनुष्यबाण हाती धरला, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. आता कोकणात भास्कर जाधव हे एकमेव आमदार उद्धव सेनेेकडे उरले आहेत. तेही शिंदेसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. उद्धव ठाकरेचे अजून एक कोकणातील खंदे शिलेदार, पराभूत आमदार वैभव नाईक हेही पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. नाईक दांपत्याच्या मागे इन्कम टॅक्स चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. यातून बचाव करुन घ्यायचा असेल तर महाशक्तीसोबत जाणे हाच राजमार्ग असल्याचे त्यांनाही समजावले जात आहे. पण अजून तरी जाधव व नाईक यांनी निर्णय घेतलेला नाही. पण सद्यपरिस्थिती पाहता तेही फार काळ सत्तेविना राहू शकतील, अशी शक्यता दिसत नाही.

उद्धव ठाकरेंविषयीचे नरेटिव्ह यशस्वी?

पुढची पाच वर्षे सत्तेविना काढायची, याची जाणीव उद्धव सेनेच्या नेत्यांना आहे. पक्षाची सद्यस्थिती पाहता पुढच्या पाच वर्षातही आपला पक्ष काही चमत्कार करु शकेल, फिनिक्स भरारी घेऊ शकेल अशी शक्यता उरलेल्या शिलेदारांना वाटत नाही. कारण उद्धव ठाकरेंचा पक्षच मुळ विचारांपासून भरकटलेला असल्याची जाणीव त्यांनाही झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांवर राजकारण केले, ज्या मराठी माणसासाठी ते लढले, ज्या मुस्लिमविरोधी भूमिकेवर त्यांनी हिंदुत्ववादी प्रतिमा जपली त्याच मुद्द्यांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिलीय, असे त्यांच्यावर टीका करणारे सांगतात. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेय…. हे नॅरेटिव्ह तयार करण्यात, हिंदुत्ववादी मतदारांच्या मनावर हे बिंबवण्यात भाजप व शिंदेसेना कमालीची यशस्वी झालीय. त्यामुळेच हिंदुत्ववादी मतदार उद्धव सेनेपासून दुरावत चालला अाहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे व संजय राऊत हे दोघे सोडले तर इतर सर्वांनाच पक्षाची भूमिका चुकीची आहे, पक्षाचे विचार भरकटले आहेत याची जाणीव झालीय. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? असा प्रश्न असल्याने सारेच जण मुग गिळून गप्प आहेत. ज्यांना शक्य आहे ते वेगवेगळे मार्ग स्वीकारुन ठाकरेंची साथ सोडत आहेत. ज्यांना शक्य नाही ते कधी राजकारणापासून अलिप्त राहून तर कधी नुसते नावापुरते ठाकरेंसोबत राहण्याचे नाटक करताना दिसत आहेत.

शहाजीबापू यांनी दाखवला आरसा…

शिंदेसेनेच सांगोल्याती पराभूत आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षातील गळतीवर अलिकडेच एक वास्तववादी भाष्य केले होते. शहाजीबापू एका कार्यक्रमात म्हणाले, ‘केवळ चौकशा लागल्या म्हणून कोणताही नेता पक्ष सोडत नसतो. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तव परिस्थिती जाणवल्याने तिथे थांबण्यात काही अर्थ नाही, अशी भावना त्यांच्या अनेक नेत्यांच्या मनात झाली आहे. त्यामुळे शिंदेसेनेत गेल्या काही दिवसांपासून मोठी इनकमिंग वाढले आहे. एक दिवस असा उगवेल की, उद्धव साहेबांना सोडायची भाषा आदित्य ठाकरेच करतील. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकटेच राहण्याची परिस्थिती येऊ शकते’, या वास्तवाची जाणीव शहाजीबापंूनी करुन दिलीय. बापू म्हणतात तसे आदित्य ठाकरे आपल्या वडिलांना अशा परिस्थितीत सोडून दुसऱ्या पक्षात जातीय, हे अशक्यच आहे. पण ठाकरेंनी आतापर्यंत ज्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मुलागत किंवा भावाप्रमाणे वागणूक दिली, सन्मान दिला ते मात्र आज ‘मातोश्री’ची साथ सोडून जात आहेत हे मात्र तितकेच खरे. त्यामुळे पक्षात अस्वस्थता अाहे. अलिकडेच शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरचा उल्लेख करुन ठाकरेंच सहा खासदार व काही आमदार आमच्याकडे येणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यात काही तथ्य नसल्याचे उद्धव सेनेकडून सांगितले जाते, पण अधूनमधून अशा वावड‌्या उठवून उद्धव ठाकरेंच्या पक्षात कायम अस्वस्था ठेवण्यात मात्र शिंदेसेना यशस्वी होते, हे मात्र खरे.

जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती शिल्लक?

आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई मनपा जिंकणे हा एकमेव मार्ग उद्धव ठाकरेंजवळ राहिला आहे. त्यामुळे ते जोमाने तयारीला लागले आहेत. आमदार, खासदार, विभागप्रमुख, जिल्हाप्रमुखांच्या बैठकांचा धडाकाही त्यांनी लावला आहे. पण राज्यातील जनतेच्या मनात लोकसभेच्या वेळी होती तेवढी उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती उरली अाहे का? हा खरा प्रश्न आहे. शहाजीबापू म्हणतात त्या रितीने फक्त चौकशा किंवा सत्तेचे आमिष हेच शिवसैनिक ठाकरेंना सोडून जाण्याचे कारण नाही. मुळात या सर्वांचा राग खासदार संजय राऊत यांच्यावर आहे. याच संजय राऊतांना उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याचा अभद्र विचार ठाकरेंच्या मनात घुसवला, तो तडीसही नेला. संजय राऊत सातत्याने जी वक्तव्ये करतात, जी भूमिका मांडतात त्यामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष अडचणीत येत आहे. हे ठाकरेही जाणून आहेत. मग ते राऊतांना कंट्रोल का करु शकत नाही? हा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना पडलेला आहे. जर राऊतांसमोर ठाकरे हतबल होत असतील तर मग उरलेली शिवसेना ठाकरे चालवतात की राऊत? हा प्रश्नही आहेच.

तर मात्र आदित्यही जातील सोडून…

केवळ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन व संघटन मजबूत करुन उद्धव सेना फिनिक्स भरारी घेऊ शकत नाही. तर सामान्य शिवसैनिकांच्या मनात नेमकं काय मळभ आहे, ते जाणून घेऊन दूर करणे व खासदार संजय राऊतांच्या एकतर्फी विचाराने पक्ष चालवण्याची जी परंपरा पक्षात सुरु आहे ती खंडित करुन पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारा, प्रसंगी सत्तेला लाथाडण्याची तयारी असणारा पण विचारांशी कट्टर राहणारा पक्ष उभा करण्यात उद्धव ठाकरेंना यश आले तरच त्यांच्या पक्षाला भविष्य आहे अशी आशा निर्माण होऊ शकते. अन्यथा शहाजीबापू म्हणतात तसे… आदित्यही उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याचा विचार करु शकतात…