कधी सत्तेचे आमिष दाखवून तर कधी ईडी- सीबीआय कारवाईचा धाक दाखवून भाजपने काँग्रेसचे अनेक बडे नेते एक तर आपल्या पक्षात ओढले किंवा त्यांना पक्ष कार्यापासून अलिप्त राहण्यास भाग पाडले. नाना पटोले हा एकमेव आक्रमक चेहरा पक्षाला लाभला होता, त्यांचा लोकसभा निवडणुकीत फायदाही झाला. पण एकमेकांचे पाय ओढण्याच्या संस्कृतीमुळे नानांना पक्षातून मोठ्या प्रमाणावर विरोध होऊ लागला, नानांच्या डोक्यातही मुख्यमंत्रिपदाची हवा शिरली.. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जहाज पुरते बुडाले. आत पक्षाला महाराष्ट्रात नवी उभारी देण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने नवा डाव खेळला आहे. नूतन प्रदेशाध्यक्षपदी बुलडाण्याच्या हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करताना त्यांनी बिगर संस्थानिक चेहरा निवडण्यास प्राधान्य दिले आहे. या नेत्याकडे ना साखर कारखाना आहे ना कुठले उद्योगधंदे. मंत्रिपदावरही कधी काम केलेले नाही. त्यामुळे भाजपकडे सपकाळ यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचे कुठेही कारण नाही, म्हणूनच राहूल ब्रिगेडमधील हा चेहरा समोर आणून काँग्रेसने महाराष्ट्रात नवा राजकीय डाव खेळल्याचे मानले जाते.. काय आहे यामागचे राजकारण, आता नाना पटोलेंचे कुठे होणार पुनर्वसन? जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…
काँग्रेसमध्ये नाना पटोलेंचे पाय ओढणारा गट सक्रिय?

२०१४ व २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे पानिपत झाले. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात भूमिका घेतल्याने चौथ्या क्रमांकावर घसरुनही काँग्रेसला सत्तेत स्थान मिळाले. महाविकास आघाडीच्या उदयामुळे काँग्रेसचे पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले. पण एकदा का काँग्रेस नेत्यांच्या अंगात सत्ता शिरली की आपल्याच पक्षातील नेत्यांचे पाय ओढण्याची त्यांच्यात स्पर्धा लागते. ठाकरे सरकारच्या अडीच वर्षातही हाच अनुभव आला. नंतर सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही नाना पटोले या आक्रमक नेत्याच्या नेतृत्वात काँग्रेसने पुन्हा जोमाने काम सुरु केले होते. आपण पुन्हा सत्तेत येऊ शकतो, हा आत्मविश्वास त्यांना ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या सरकारने व नाना पटाेलेंच्या नेतृत्वाने दिला होता. म्हणून पक्षाने जाेमाने काम करुन महाराष्ट्रात लोकसभेला चांगले यश मिळवले. पण एकीकडे पक्षातील तरुणाई कामाला लागलेली असताना काँग्रेसमधील एक गट मात्र नाना पटोलेंचे पाय ओढण्याचे काम इमाने – इतबारे करत होता.
अन् काँग्रेसला सपाटून खावा लागला मार…

लोकसभेतील यशामुळे नानांच्याही डोक्यात यशाची हवा गेली होती. आपणच पुढचे मुख्यमंत्री होणार या अविर्भावात ते होते. याच गर्वामुळे ते जागावाटपापासून ते प्रचारसभांपर्यंत मित्रपक्षांशी भांडण्यातच व्यग्र राहिले. तिकिट वाटपातही निवडून येण्याचा निकष पाहण्यापेक्षा पुढे आपले नाव मुख्यमंत्रिपदासाठी कोण रेटू शकतो, अशा निकषावरच उमेदवारी दिल्या. परिणाम जो व्हायचा तोच झाला अन् काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. नानांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न तर दूरच राहिले त्यांच्या पक्षाला साधे २० आमदारही निवडून आणता आले नाहीत. या अपयशाची संधी साधून नानांना प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार करण्यासाठी पुन्हा काँग्रेसजन एकवटले. अखेर राहुल गांधींनी नानांची उचलबांगडी करुन प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ या नवख्या चेहऱ्याची निवड केली. बुलडाण्याचे माजी आमदार राहिलेले सपकाळ हे राहूल ब्रिगेडचे निष्ठावंत मानले जातात. बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. राजीव गांधी पंचायत राज संघटनचे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सध्या त्यांच्याकडे आहे. गांधी तथा विनोबा यांच्या विचारधारेवर आधारीत ग्राम-स्वराज निर्माण करणे, सर्वोदय विचारांवर आधारीत राष्ट्रनिर्माण युवक शिबिरे घेणे, ग्रामस्वच्छता अभियान तथा आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय अशा सामाजिक कामात ते अग्रेसर असतात. पण तरीही राज्यस्तरीय नेतृत्व म्हणून ते फारसे परिचित नाहीत. मग राहुल गांधी यांनी त्यांना संधी देण्यामागचे राजकारण काय? असा प्रश्न काँग्रेस जनांनाही पडला अाहे.
सपकाळांच्या प्रदेशाध्यक्षपदामागे काँग्रेसची कोणती राजकीय गणिते?

अमित देशमुख, विश्वजित कदम, सतेज पाटील यांच्यासारखे तरुण, दिग्गज, घरंदाज नेत्यांकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याची मागणी होत असताना राहुल गांधी यांनी सपकाळ यांनाच का निवडले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने अातापर्यंत ईडी, सीबीआय कारवाईचा धाक दाखवून काँग्रेसचे अनेक नेते आपल्या गळाला लावले. एकतर त्यांना भाजपात आणले किंवा काँग्रेसपासून दूर तरी केले. या नेत्यांच्या मोठमोठ्या शिक्षण संस्था, साखर कारखाने व इतर उद्योग व्यवसाय आहेत. यात कुठेना कुठे तरी आर्थिक अनियमितता आहे. त्याचा धाक दाखवून भाजपने या नेत्यांची कोंडी केली होती. अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यासारख्या दिग्गज नेत्यांना भाजपने असेच आपल्याकडे ओढले. या कारवाईच्या धास्तीमुळे अमित देशमुख, विश्वजित कदम हे साखर कारखानदारही प्रदेशाध्यक्षपद घेण्यास इच्छूक नव्हते. त्यामुळे राहुल गांधी यांना शिक्षण संस्था, कारखाने नसणारा, भ्रष्टाचाराचे कुठलेही आरोप नसलेला बिगर संस्थानिक चेहरा हवा होता. वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसमध्ये बिगर भ्रष्टाचारी नेता शोधणे तसे राहुल गांधींनाही अवघड होते. पण बुलडाण्याच्या हर्षवर्धन सपकाळ या नावापाशी त्यांच्या शोध संपला. आणि याच कारणामुळे सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षाची धुरा देण्यात आली.
महाराष्ट्राच्या कोणत्या भागात काँग्रेसचा उद्धार होण्याची शक्यता?

एक फ्रेश चेहरा म्हणून आता सपकाळ यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जातील. त्यांना अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम यांच्यासारखे तरुण नेते सहकार्य करतील, अशी अपेक्षा अाहे. विशेष म्हणजे सपकाळ हे काँग्रेसमधील कुठल्याही गटातटात मोडत नाहीत. त्यांची निष्ठा थेट राहुल गांधी यांच्याशीच अाहे. त्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळात तरी पक्षांतर्गत विरोध होण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसने विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी शिंदे सरकारमध्ये वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते होते. तेही भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या अनेकदा उठल्या. पण त्यांनी वारंवार त्याचे खंडन केले. आता वडेट्टीवार यांना गटनेतेपद देऊन राहुल गांधी यांनी त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. एक मात्र खरे की ही दोन्ही महत्त्वाची पदे काँग्रेसने विदर्भालाच दिल्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचा कार्यकर्ता मात्र नाराज झाला आहे. आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष एका विभागाला दिले तरी विधिमंडळातील महत्त्वाचे पद दुसऱ्या विभागाला देण्याचा न्याय काँग्रेस करत आली होती. पण आता लोकसभेत विदर्भाने ज्या भरघोस रितीने मतांचे दान काँग्रेसच्या पदरात टाकले, त्यामुळे याच भागातून महाराष्ट्रात काँग्रेसचा उद्धार होऊ शकतो, अशी आशा हायकमांडला वाटत असावी म्हणूनच त्यांनी दोन्ही महत्त्वाची पदे पुन्हा विदर्भालाच दिली असल्याचे समजते. आता नाना पटाेलेंकडे पक्ष कोणती जबाबदारी सोपवतो, हे पाहणे महत्त्वाचे अाहे.