रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्यापासून विदर्भात स्त्री संवाद यात्रा निघणार

नागपूर : लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या नेतृत्वात शिवसेनेची महिला आघाडी १७ ते १९ जानेवारीदरम्यान विदर्भात स्त्री संवाद यात्रा काढणार आहेत.

अमरावती (Amrawati), यवतमाळ- वाशीम (Yavatmal- Washim) व रामटेक (Ramtek) या विदर्भातील तीन लोकसभा मतदारसंघात ही संवाद यात्रा जाणार आहे. २०१९ मध्ये या तीनही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार लढले होते. त्यापैकी यवतमाळमध्ये भावना गवळी (Bhawana Gavli) तर रामटेकमध्ये कृपाल तुमाने (Krupal tumane) हे दोन खासदार निवडून आले होते तर अमरावतीत आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांचा अपक्ष उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र हे दोन्ही विद्यमान खासदार भावना गवळी व कृपाल तुमाने तर पराभूत उमेदवार आनंदराव अडसूळ हे आता शिंदे गटात गेलेले आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही या तीनही मतदारसंघांवर उद्धव सेनेने दावा केला आहे. त्यामुळे हे तिन्ही मतदारसंघांची नव्याने बांधणी करण्याचे ठाकरेंसमोर आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी स्त्री संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे. आणि स्वत: रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) त्याचे नेतृत्व करणार आहेत.

या दौऱ्यात त्या महिला अत्याचारासह महिलांच्या इतर प्रश्नांवर संवाद साधतील.