मुंबई : मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुका (Loksabha election) जाहीर होण्याची शक्यता आहे. अयोध्यातील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, मोदी गॅरंटी, काश्मीरातील ३७० कलम आदी कारणांमुळे देशभरात भाजपला चांगला प्रतिसाद मिळत असताना महाराष्ट्रात मात्र भाजपच्या ५० % जागा घटण्याची शक्यता असल्याचा अंदाज इंडिया टुडे व सी व्होटर (India Today- C voter survey) यांनी केलेल्या सर्वेक्षणातून मांडण्यात आला आहे. हा अंदाज भाजपच्या नेतृत्वाला काळजीत टाकणारा आहे.
यंदा ४०० खासदार निवडून आणण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेतील भाषणात व्यक्त केला. त्यादृष्टीने गेल्या ४ वर्षांपासूनच भाजपच्या हालचाली सुरु आहेत. दूर केलेले मित्रपक्ष पुन्हा सोबत आणणे, ज्या राज्यातून सत्ता हातची गेली तेथे वेगवेगळे डावपेच आखत पुन्हा सत्ता मिळवणे, जे पक्ष सोबत येत नाहीत त्यांच्या मागे ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा ससेमिरा लावणे आदी सर्व साम, दाम, दंड, भेद असे प्रकार भाजपने गेल्या ४-५ वर्षात आजमावले असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
४०० जागांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर भाजपला उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र (Maharashtra) यासारख्या मोठ्या राज्यांमधून सर्वाधिक जागा मिळणे अपेक्षित आहे.
उत्तर प्रदेशात भाजपचीच सत्ता असल्याने व तिथे अयोध्या सोहळ्यामुळे पक्षाला अनुकूल वातावरण असल्यामुळे तिथे २०१९ प्रमाणे यंदाही निर्णायक जागा मिळवण्याचा भाजपला विश्वास आहे. बिहारमध्ये प्रतिकूल वातावरण असल्याने भाजपने पुन्हा नितीशकुमार (Nitish kumar) यांना आपल्याकडे वळवून हा अडथळाही दूर केला आहे.
महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे लक्ष्य आहे. हेच टार्गेट ठेऊन गेल्या दोन- अडीच वर्षात भाजपने डावपेच खेळले आहेत. आधी जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) शिवसेनेतून फोडून मविआचे सरकार उलथवले व आपले सरकार स्थापन केले. नंतर वर्षभरातच राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवारांना (Ajit pawar) सत्तेत आणले. या दोन्ही फुटी गटाला त्यांचे पक्ष अधिकृतपणे मिळवून देण्यातही ‘महाशक्ती’ने सर्वतेापरी सहकार्य केले. आता अधिकृत राष्ट्रवादी, शिवसेना (Ncp- Shiv sena) या दोन्ही पक्षांची ताकद सोबत असताना व मोदी (Narendra Modi)- देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) लोकप्रियतेवर स्वार झालेल्या भाजपला ४५ जागा जिंकणे सहज शक्य वाटत होते. मात्र इंडिया टुडे व सी व्होटरच्या सर्व्हेने (India Today- C voter survey) भाजप व महायुतीला जमिनीवर आणले आहे.
काय सांगतो सर्व्हे?
- भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला (Mahayuti) महाराष्ट्रात ४८ पैकी फक्त २२ जागा मिळू शकतील.
- २०१९ मध्ये शिवसेना- भाजप युतीने ४१ जागा जिंकल्या होत्या. यावेळी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) सोबत नसल्याने महायुतीला १९ जागांचा फटका बसण्याची भीती सर्व्हेक्षणात व्यक्त करण्यात आली.
- महायुतीच्या २२ पैकी १६ जागांवर भाजप तर उर्वरित ६ जागांवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व अजित पवार (Ajit Pawar) गटाचे उमेदवार विजयी होऊ शकतात.
- २०१९ मध्ये एकट्या भाजपचे २३ तर शिवसेनेचे १८ उमेदवार निवडून आले होते. यंदा भाजपला ७ जागांचा फटका बसू शकतो. तर गेल्या वेळी धनुष्यबाण चिन्हावर १८ खासदार निवडून आणणाऱ्या (आता शिंदेंकडे नेतृत्व असलेल्या) शिवसेनेला यावेळी अवघ्या ३ किंवा ४ जागा मिळू शकतात. म्हणजे १४ किंवा १५ जागांवर फटका बसण्याची शक्यता सर्व्हेक्षणात व्यक्त करण्यात आली.
- एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) २०१९ मध्ये ४ खासदार निवडून आले होते. आता अजित पवारांकडे नेतृत्व असलेल्या राष्ट्रवादीचे २ किंवा ३ खासदारच निवडून येऊ शकतात, असा अंदाज आहे.महाविकास आघाडीला सहानुभूतीचा फायदा
- महाविकास आघाडीला या लोकसभा निवडणुकीत २६ जागांवर यश मिळू शकते, असा सर्व्हेक्षणाचा अंदाज आहे.
- यात गेल्या वेळी महाराष्ट्रात फक्त एकच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या (Congress) वाट्याला १२ तर उद्धव सेना व शरद पवार (Sharad pawar) यांचा राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मिळून १४ जागांवर विजय मिळू शकतो.
- २०१९ मध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने ४८ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी राष्ट्रवादीला ४ व काँग्रेसला १ अशा पाचच जागांवर यश मिळाले होते. त्या तुलनेत यंदा दोन्ही पक्षांना भरीव यश मिळण्याची शक्यता आहे.
- उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ६ ते ७ जागी यश मिळू शकते. शिवसेना फुटीनंतर त्यांच्याकडे पाचच खासदार उरले आहेत तर १३ खासदार शिंदेंसोबत गेले आहेत. त्या तुलनेत जितके खासदार उरले आहेत तेवढे किंवा त्यापेक्षा एखादाच खासदार उद्धव सेनेकडून विजयी होऊ शकतो, असा अंदाज आहे.
- भाजपने शिवसेना फोडून ज्या असंविधानिक रितीने मविआचे सरकार पाडले त्याबद्दल महाराष्ट्रातील काही प्रमाणात जनतेच्या मनात भाजपविरोधी राग व मविआतील घटक पक्षांबद्दल सहानुभूती आहे. विशेषत: मुंबई परिसरातील जनतेत उद्धव ठाकरेंबद्दल प्रचंड सहानुभूती असल्याचे आतापर्यंतच्या विविध सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
- एकटी शिवसेना फोडून ४५ जागांचे लक्ष्य साध्य होत नसल्याची खात्री पटल्यामुळेच भाजपने वर्षभरानंतर राष्ट्रवादीलाही सुरुंग लावला. यावरुनच अजूनही भाजपला लोकसभेत महाराष्ट्रात तरी यश मिळण्याबाबत साशंकता असल्याचे दिसून येते. सी व्होटरचा पाहणी अहवालही तेच सांगतो.आता नंबर काँग्रेसचा (Congress can split)
- लोकसभेत काँग्रेसला १० ते १२ जागा मिळणार असल्याचा खासगी संस्थांचा अंदाज असला तरी भाजपचे नेतृत्व त्यावर विश्वास ठेवणार नाही. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेक्षणातही मात्र हाच निष्कर्ष निघाला तर मात्र महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष फोडून त्यांचे विजयी होण्याची क्षमता असलेले उमेदवार आपल्याकडे खेचण्याचा अखेरचा पर्याय भाजपने राखून ठेवला आहे. पुढच्या महिनाभरात असे काही डावपेच आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळू शकतात.