Rajyasabha Election : काँग्रेसमधून आलेले मिलिंद देवरा यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

मिलिंद देवरांचे स्वप्न एकनाथ शिंदेंनी केले पूर्ण.

मुंबई : राज्यसभेच्या सहापैकी एक जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार आहे. त्या जागेवर नुकतेच काँग्रेसमधून शिंदेसेनेत आलेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांना उमेदवारी दिली आहे.

Rajyasabha-election-Milind Deora from Congress is a Shiv Sena candidate

उद्धव ठाकरेंशी (Udhav Thackeray) बंड करुन २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी वेगळा मार्ग पत्कारला. त्यावेळी मुळ शिवसेनेतील अनेक नेते टप्प्याटप्प्याने त्यांच्यासोबत आले. या घडामोडीनंतर प्रथमच राज्यसभेची निवडणूक होत असून त्यात पक्षाला एक जागा मिळण्याची संधीही प्राप्त झाली आहे. अशावेळी बंडात साथ देणाऱ्यांना डावलून शिंदेंनी नुकतेच पक्षात आलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांना संधी दिल्यामुळे शिंदे समर्थकांमध्ये नाराजी आहे.

मिलिंद देवरांना संधी कशासाठी?

मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतील बडे प्रस्थ मानले जाते. त्यांचे वडील मुरली देवरा हेही काँग्रेसचे मोठे नेते होते. उद्धव ठाकरेंशी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदेंना मुंबईत अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीए. मुंबईतील कार्यकर्ते, पदाधिकारी अजूनही ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचे दिसते. त्यामुळे मुंबईतील एखादा बडा नेता हाताशी असावा या उद्देशाने शिंदे यांनी देवरा यांना नुकतेच पक्षात घेतले. आता देवरा यांच्या मदतीने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याचे शिंदेंचे प्रयत्न आहेत. त्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे.

देवरांची स्वप्नपूर्ती

२०१४ व २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले मिलिंद देवरा यांचा शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी सलग दोनदा पराभव केला. त्यामुळे देवरांकडे कुठलेही पद नव्हते. गांधी घराण्याशी असलेली जवळीक, पक्षाला आर्थिक रसद पुरवण्याची ताकद व मुरली देवरा यांचे पक्षासाठी योगदान याचा विचार करुन काँग्रेसने आपल्याला राज्यसभेवर संधी द्यावी, अशी मिलिंद देवरा यांची आग्रही मागणी होती. मात्र राहुल गांधींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्याएेवजी उत्तर प्रदेशात लोकसभेत पराभूत झालेले इम्रान प्रताप गढी यांना गेल्यावेळी काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवले. हा अपमान देवरा यांच्या जिव्हारी लागला. तेव्हापासून ते पक्ष सोडण्याच्या विचारात होते. गेल्या महिन्यात त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत राज्यसभा देण्याच्या अटीवरच प्रवेश केला होता. आता देवरा यांचे खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेलाही देवरा यांच्या रुपाने एक उच्चशिक्षित प्रतिनिधी संसदेत लाभणार आहे.