मंत्रिपद गमावलेल्या सत्तारसेठची नवी खेळी, राजकीय संन्यास घेणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड- सोयगाव मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार झालेले शिंदेसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी चक्क राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. आमदारकीच्या चार टर्मपैकी तीन वेळा त्यांना मंत्रिपदावर संधी मिळाली. एकदा काँग्रेसकडून, एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून तर एकदा शिंदेसेनेकडून त्यांना मंत्री करण्यात आले. मात्र आता फडणवीस सरकारमध्ये त्यांना संधी नाकारण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले सत्तारसेठ ‘मी अडीच वर्षांनी पुन्हा येईन’ असे कालपर्यंत सांगत होते. पण अाता अचानक त्यांनी पुढची विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केलीय.. काय आहे या मागचे कारण… मिशन पॉलिटिक्समधून…

म्हणूनच सत्तारांनी मिळवला चार वेळा आमदार होण्याचा मान…

पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते असलेल्या अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघात चांगलाच दबदबा अाहे. गेली चार टर्म ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत. केवळ अामदारकीच नव्हे तर सिल्लोड नगर परिषद, बाजार समिती, दूध संघ, जिल्हा बँक व जिल्हा परिषदेवरही त्यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. त्यामुळे सत्तार यांचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणातही मोठे महत्त्व आहे. अल्पसंख्यांक समाजातील असूनही सत्तार हे आपल्या मतदारसंघातील सर्व जाती-जमातीच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात. मुस्लिमांच्या जुलूसमध्ये जसा त्यांचा सहभाग असतो तसाच हिंदूंच्या हरिनाम सप्ताह- मंदिर जिर्णोद्धाराच्या कार्यक्रमातही ते केवळ सहभागी होत नाहीत तर सढळ हाताने मदतही करतात. त्यांच्या सिल्लोड शहरात सर्व जाती- धर्माच्या नावाने चौक सुशोभिकरणाचे काम सत्तार यांनी आपल्या आमदार फंडातून केलेले दिसते. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग सर्वच जाती धर्मात दिसून येतो. त्याचाच परिणाम म्हणून आतापर्यंत सत्तार चार वेळा आमदार झाले आहेत.

बेताल वक्तव्य सत्तारांना भोवले…

जिकडे सत्ता तिकडे सत्तार.. अशी त्यांची कार्यपद्धती आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शेवटच्या सहा महिन्यांसाठी सत्तार यांना मंत्रिपद मिळाले होते. नंतर काँग्रेसचा पडता काळ सुुरु झाल्याने २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन आमदारकी मिळवली. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सत्तार यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले. नंतर एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर सत्तार बदलत्या वाऱ्याची दिशा पाहून शिंदेंसोबत गेले. तिथेही त्यांनी मंत्रिपद पटकावले. मात्र दरम्यानच्या काळात मंत्रिपदाचा गैरवापर केल्याच्या अनेक तक्रारी त्यांच्याविरोधात दाखल झाल्या. विशेषत: संभाजीनगर जिल्ह्यातील भूखंडांच्या घोटाळ्यात त्यांच्यावर खंडपीठाने ताशेरे ओढून मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवला होता. तसेच त्यांची बेताल वक्तव्येही सत्तार यांना भोवली. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असो की एकनाथ शिंदेंना मीच मुख्यमंत्री केले अशी वल्गना करणे असो.. अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे सत्तार कायमच वादग्रस्त ठरले.

अन् सत्तार सर्वांना पुरुन उरले…

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष भाजपनेच त्यांच्याविरोधात दंड थोपटले होते. भाजपचे नेते सुरेश बनकर यांनी उद्धव सेनेत प्रवेश करुन सत्तार यांच्याविरोधात निवडणूक लढवली. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनीही बनकर यांना रसद पुरवून सत्तार यांना पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही त्याला हातभार होता. एवढे सर्वांनी प्रयत्न केले तरी सत्तारसेठ सर्वांना पुरुन उरले. काठावर का होईना ते विजयी झाले. मात्र या विजयानंतरही सत्तार यांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपलेले नव्हते. शिंदे सरकारमध्ये सत्तार यांना मंत्रिपद द्यावे लागल्याने शिंदे यांचे निकटवर्तीय संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळू शकले नव्हते. त्यामुळे यंदा सत्तार यांचे मंत्रिपदाच्या यादीतून नाव कापण्यासाठी जसे भाजपकडून प्रयत्न झाले तसेच त्यांच्या स्वत:च्या पक्षातूनही झाले. इथे मात्र या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले व देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून सत्तार यांचे नाव कापले गेले. एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सत्तार शिंदेंवर नाराज अाहेत.

शिंदेसेनेतच दुफळी निर्माण…

आता संभाजीनगर जिल्ह्यात संजय शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार अशी शिंदेसेनेतच दुफळी निर्माण झाली आहे. नव्याने कॅबिनेट मंत्रिपद मिळताच शिरसाट यांनी शेवटच्या सहा महिन्यात सत्तार यांनी पालकमंत्री असताना जे निर्णय घेतले त्यांची फेरतपासणी करण्याची घोषणा करुन सत्तार यांना डिवचले होते. या सर्व गोष्टींचा राग आल्याने सत्तार यांनी वेगळी वाट धुंडाळण्याचा प्रयत्न केला. १ जानेवारी रोजी सत्तार यांचा वाढदिवस असतो. दरवर्षी तो सिल्लोडमध्ये दणक्यात साजरा केला जातो. पण यावर्षी सत्तार यांनी संभाजीनगरमध्ये हा कार्यक्रम ठेवला. मंत्रिपद नसतानाही त्यांनी सुमारे १ लाख समर्थकांचा मेळावा मराठवाड्याच्या या राजधानीत घेऊन आपली मागे अजूनही किती ताकद आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आपल्या राजकीय विरोधकांना दाखवून दिले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिंदेसेनेेचा एकही नेता नव्हता, याउलट सत्तार यांच्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसचे नेते मात्र आवर्जुन उपस्थित होते. यातून सत्तार आता काँग्रेसकडे जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. सत्तार मात्र काही स्पष्ट बोलत नव्हते. अडीच वर्षांनी मी पुन्हा मंत्री होईल, असे सांगून ते समर्थक आपल्यापासून दूर जाऊ नयेत याची काळजी घेत होते. असे असताना सत्तार यांनी अचानक राजकीय संन्यास घेणार असल्याचे संकेत देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.

नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र…

सिल्लोड तालुक्यातील एका जाहीर कार्यक्रमात सत्तार यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले, ‘मी आमदार मंत्री असतांना १८-१८ तास सालदार सारखे काम केले. अनेकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला. मतदार संघाचा विकास केला, पण शेवटी जातीपातीवर निवडणूक झाली. अवघ्या २४२० मतांनी माझा विजय झाला. लोकांना विकास नकोय. जर अशाच जातीपातीवर निवडणुका होत असतील तर सिल्लोडची नगर परिषदेची आगामी आगामी ही माझी शेवटची निवडणूक राहील. मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही,’ असे सत्तार यांनी जाहीर करताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ‘मी माझा मुलगा माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर याला सांगितले आहे मी निवडणूक लढणार नाही. तुला लढायची असेल तर बघ नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र…’

सत्तार राजकीय संन्यास घेणार का?

सत्तार यांच्या या घोषणेमुळे ते आता राजकीय संन्यास घेणार आहेत की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. आपला मुलगा अब्दुल समीर याला पुढे करुन आमदारकीचा वारसा त्याच्याकडे सोपवण्यासाठी सत्तार यांनी ही घोषणा केली असल्याचे मानले जाते. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी व जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी सत्तार यांनी ही खेळी खेळली असेल. कारण विधानसभेला सत्तार विजयी झाले असले तरी त्यांचे मताधिक्य मोठ्या संख्येने घटले आहे. विशेषत: सिल्लोड शहरात त्यांची मते खूप कमी झाली अाहेत. भाजपसह सर्वपक्षीय नेते सत्तार यांच्याविरोधात गेले आहेत. आता शिंदेसेनेतील एक गटही त्यांच्या विरोधात काम करत आहे. त्यामुळे आगामी सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत यश मिळण्याबाबत त्यांना शंका आहे. सत्तार यांचे पूत्र समीर हे सिल्लोडचे नगराध्यक्ष होते. आता त्यांना हे पद मिळेल का? याविषयी शंका आहे. म्हणूनच आपली शेवटची निवडणूक असे लेाकांना सांगून सहानुभूती मिळवायची व सिल्लोड नगर परिषदेची सत्ता प्राप्त करुन घेण्यासाठी सत्तारसेठ यांनी ही खेळी खेळल्याचे सांगितले जाते.

राजकीय संन्यासची केवळ खेळीच?

पुढच्या विधानसभा निवडणुकीला अजून ५ वर्षे आहेत. तोपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. राजकारणी आज जे बोलतात तो शब्द उद्या पाळतातच असे नाही. यापूर्वी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती.पण एेनवेळी पुन्हा तिकिट घेऊन ते विजयीही झाले. अशीच गत सत्तार यांचीही होऊ शकते. त्यामुळे सध्या तरी केवळ चर्चेत राहण्यासाठी व जनतेनेची सहानुभूती मिळवण्यासाठी सत्तार यांनी ही राजकीय संन्यासाची खेळी खेळली असल्याचे मानले जाते.