शत – प्रतिशत भाजप : आता शिंदेसेना, अजित पवारांच्या मुळावर

राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर भाजपचे पहिले प्रदेश पातळीवर अधिवेशन नुकतेच शिर्डीत झाले. सध्याच्या यशाने फार हुरळून न जाता भविष्यात यापेक्षाही मोठे यश मिळवण्याचा, शत- प्रतिशत भाजपमय महाराष्ट्र करण्याचा कानमंत्र या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिला. सध्या पक्षाचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर ते विद्यमान प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पक्षाची सूत्रे हाती घेतील. या निमित्ताने बावनकुळे व चव्हाण या दोघांनाही सक्रिय करुन स्थानिक निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने गलितगात्र झालेल्या महाविकास आघाडीचे आता भाजपसमोरील अाव्हान नसेल तर सत्तेत असूनही वेळोवेळी अडवणूकीचे धोरण स्वीकारणारी शिंदेसेना व भविष्यात अडचणीची ठरू शकणारी अजित पवारांची राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याची रणनिती भाजप या निमित्ताने आखणार आहे. ‘भविष्यात भाजपला कुणी दगा देऊ शकणार नाही इतकी ताकद निर्माण करा,’ हा अमित शाह यांनी शिर्डीतील मेळाव्यातून दिलेला कानमंत्र गल्ली ते दिल्ली स्वबळावर सत्ताप्राप्तीची स्वप्नपूर्ती करण्यासाठीच असल्याचा मानला जातो. काय आहेत या मागचे भाजपचे डावपेच…. जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…

भाजपने फुंकले आगामी निवडणूकांचे रणशिंग…

श्रद्धा अन‌् सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीत प्रदेश भाजपचे दोन दिवसीय अधिवेशन नुकतेच झाले. या अधिवेशनात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशाचा आनंदोत्सव तर साजरा झालाच, पण मनपा, जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीचा बिगूलही यानिमित्ताने वाजवण्यात आला. भाजप हा पक्ष कायम निवडणुकीच्या मूडमध्ये असतो. आता तर विधानसभेला जे यश मिळाले आहे त्यामुळे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा उत्साह टिपेला पोहोचला आहे. २०१४ मध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले होते तेव्हा जी परिस्थिती होती, त्यापेक्षा दुपटीने जास्त उत्साह सध्याच्या भाजपात जाणवत आहे. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तर रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष होते. नंतरच्या पाच वर्षात भाजपने ग्रामपंचायतीपासून ते मनपा, जिल्हा परिषदांपर्यंत सर्वत्र आपला झेंडा फडकावला. जे जे लोक आपल्या पक्षात येण्यास इच्छूक होते त्या सर्वांना सोबत घेऊन शत-प्रतिशत भाजपमय वातावरण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. मात्र नंतरच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलाढाली झाल्या. कोरोना महामारीचे संकट आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पाच वर्षांपर्यंत लांबल्या. आता पुन्हा या स्थानिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. विधानसभेत मिळालेल्या भरघोस यशामुळे भाजपसाठी गाव पातळीपासून ते महानगरांपर्यंत अनुकूल वातावरण आहे. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिर्डीत झालेल्या अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत या निवडणुकांचे रणशिंगच फुंकण्यात आले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

भाजप राज्य सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात….

प्रत्येक निवडणुकीची बूथपातळीवरील तयारी करणे भाजपचे वैशिष्ट्य मानले जाते. लोकसभेत पराभव झाल्यानंतर भाजपने संघ स्वयंसेवकांच्या मदतीने पुन्हा एकदा सर्व बूथस्तरीय यंत्रणा भक्कम करुन प्रत्येक मतदारांशी संपर्क साधला. त्याचा फायदा विधानसभेला झाला. मात्र या यशाने हुरळून न जाता मनपा, जिल्हा परिषदा निवडणुकांसाठीही पुन्हा एकदा जनतेत जाऊन ही यंत्रणा सक्षम करा, असे आदेश शाह यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. या निवडणुकीची पहिली तयारी म्हणून भाजपने राज्यात सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुमारे दीड कोटी सदस्य बनवण्याचे लक्ष्य केंद्रीय भाजपने प्रदेश भाजपला दिले आहे. त्याची धडाक्यात सुरुवातही झाली. पण नंतर गती मंदावली. निम्मा जानेवारी संपत आला तरी फक्त ४० लाखांपर्यंतच सदस्य नोंदणी पोहोचली आहे. ही गती पाहून अमित शाह यांनी अधिवेशनातच प्रमुख नेत्यांची हजेरी घेतली. विशेष म्हणजे काही प्रमुख नेते व मंत्र्यांच्या मतदारसंघातच सदस्य नोंदणीचे अभियान संथ गतीने सुरू आहे, त्यांची कानउघाडणीही शाह यांनी केली. त्यामुळे शेवटच्या १५ दिवसांत हे अभियान जास्त गतीने राबवले जाईल, अशी आशा आहे. याचे कारण म्हणजे नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना सदस्य नोंदणीचे टार्गेटच देण्यात आले आहे. ते पूर्ण केले तरच उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे प्रदेशाध्यक्षांनी ठणकावले होते. आता अमित शाह यांनीच नेत्यांचे कान धरल्याने हे अभियान जोराने राबवले जाईल, अशी शक्यता आहे.

अमित शाहांकडून उद्धव ठाकरेंचा समाचार…

आणखी एक म्हणजे, अमित शाह यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा समाचार घेतला. २०१९ मध्ये ज्या उद्धव ठाकरेंनी भाजपला दगा दिला, त्यांचा हिशेब चुकता करण्याची २०२४ ची विधानसभा निवडणूक होती. तसेच महाराष्ट्रात दगाबाजीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली. त्यांचे दगाबाजीचे राजकारण गाडण्याचे काम जनतेने केले. विधानसभा निवडणूक ही केवळ महाविकास आघाडीला पराभूत करण्‍यासाठी किंवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी नव्हती, तर विचाराला सोडून राजकारण करणाऱ्या उध्‍दव ठाकरेंना त्‍यांची जागा दाखवण्‍यासाठी होती,’ याची आठवणही शाह यांनी करून दिली. हे सांगताना अमित शाह यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना काही गोष्टी ठणकावून सांगत भविष्याबाबतही सतर्क केले. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रमाणे भाजपशी दगाबाजी केली तशी वेळ भविष्यात कुणाकडूनही येऊ नये इतके आपल्या पक्षाचा सक्षम करा, असा सल्ला त्यांनी दिला. याचा अर्थ यापुढे केवळ स्पष्ट बहुमतानेच निवडणूका जिंकता येतील एवढी ताकद निर्माण करा, म्हणजे मित्रपक्षांच्या कुबड्या घेऊन चालण्याची आपल्याला गरज पडणार नाही, असा संदेश यातून दिल्याचे मानले जाते.

शिंदे तसेच अजित दादा गटापासून सावध राहण्याचा इशारा…

सध्याचे भाजपचे मित्रपक्ष शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपासूनही सावध राहण्याचा इशारा अप्रत्यक्षपणे अमित शाह यांनी आपल्या नेत्यांना यातून दिला आहे. राज्यात विधानसभेला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांची जी अडवणूक केली ते भाजप विसरलेला नाही. भविष्यातही इतर कुठल्याही कारणांवरुन एकनाथ शिंदे व अजित पवार हे सरकारला ब्लॅकमेल करु शकतात, हा धोकाही त्यांना अपेक्षित आहे. खातेवाटपातही असेच वादाचे प्रसंग आले. आता पालकमंत्रिपदाचा वादही याच रस्सीखेच प्रवृत्तीमुळे रखडलेला आहे. म्हणजे बहुमताने सत्ता मिळाली असली तरी अजूनही भाजपला एकतर्फी निर्णय घेता येत नाहीत. पुढील ५ वर्षे हेच चित्र राहिले तर फडणवीस यांना भाजपा अजेंडा रेटणे शक्य होणार नाही, हे अमित शाह ओळखून आहेत. म्हणूनच भविष्यात शत- प्रतिशत भाजपचे ध्येय ठेवा. कुणाशीही युती न करता सत्ता मिळाली पाहिजे हे टार्गेट ठेवा, अापल्या पक्षाची तेवढी ताकद निर्माण करा, असा कानमंत्र या अधिवेशनाच्या निमित्ताने अमित शाह यांनी दिला आहे. त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपने स्वबळावर लढल्या तर आश्चर्य वाटायला नको.

भाजपने शिर्डी अधिवेशनातून आखली रणनिती…

विधानसभेतील पराभवामुळे आता महाविकास आघाडीचे आव्हान भाजपसाठी संपुष्टात आले आहे. अंतर्गत लाथाळ्यांमध्येच आघाडीचे नेते गुंतले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ते भाजपसमोर चॅलेंज उभे करु शकतील, अशी शक्यता नाही. त्यातच गलितगात्र झालेल्या उद्धव सेनेनेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करुन आघाडीपासून दूर होण्याचा मार्ग निवडला आहे. परिणामी भाजपसाठी मोकळे मैदान आहे. मात्र मराठवाडा, मुंबई, ठाण्यात भाजपला शिंदेसेनेचे तर पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्याचे आव्हान असेल. जर महायुतीने स्थानिक निवडणूक लढवल्या तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे विधानसभेच्या यशाच्या तुलनेत जागावाटपाचा आग्रह करतील. तसे केले तर शत- प्रतिशत भाजपचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. तसेच विधानसभा, लोकसभेत जे कार्यकर्ते पक्षासाठी झिजले त्यांनाही न्याय मिळणार नाही. त्यामुळे भाजप दोन्ही मित्रपक्षांना जागावाटपात झुकते माप देणार नाही. अशा वेळी युतीतील तिन्ही पक्षांना स्वबळावर निवडणूक लढवणे हाच पर्याय राहू शकतो. हे गृहित धरुनच किंवा मित्रपक्षांवर तशी वेळ आणण्यासाठीच भाजपने शिर्डीतील अधिवेशनातून रणनिती आखली असल्याचे दिसत आहे. काहीही झाले तरी आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जास्तीत जास्त भाजपचे सदस्य निवडून आणायचे व त्या ताकदीवर २०२९ ची विधानसभा, लोकसभा निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढून जिंकायची, हेच संकेत भाजपने या मेळाव्यातून दिले आहेत. त्याची सुरुवात आतापासूनच सुरू झाली असल्याचे मानले जाते. त्यामुळे भाजपच्या शत- प्रतिशत भाजपच्या डावपेचांचा आता सर्वाधिक धोका असेल तो शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला. आता ते भाजपच्या या डावपेचांना कसे उत्तर देतात ते पाहणे महत्त्वाचे असेल.