December 26, 2024

मुंबई महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार

मुंबई महापालिकेतील आगामी निवडणुकांबाबत आता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विधानसभेतील पराभवानंतर उद्धवसेनेने स्वबळाचा विचार सुरू केला आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र याबाबत सावध भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीबाबत काय शिजतंय? समजून घेऊ ‘मिशन पॉलिटिक्स’मधून…

हिंदुत्ववादी मतांच्या ध्रुवीकरणाचा उद्धवसेनेसला फटका?

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांना सामोरे जाताना उद्धवसेनेसमोर अस्तित्व टिकविण्याचा प्रश्न आहे. गेल्या निवडणुकीत उद्धव सेनेने ८४ जागा मिळवून पालिकेवर झेंडा फडकवला होता. आता सत्ता पुन्हा स्थापन करण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न सुरु झाले आहेत. ज्या गोष्टींमुळे नुकसान झाले आहे, त्याबाबत पुनर्विचार करावा, अशी भूमिका उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत स्वबळाबाबत विचार सुरू असल्याचे उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याने हिंदुत्ववादी विचारांच्या मतांवर परिणाम झाला आहे. हिंदुत्ववादी मतांचे विधानसभेत ध्रुवीकरण झाल्याने त्याचा फटका उद्धवसेनेला बसला असून पुन्हा हे घडू नये, यासाठी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्त्यांचा रेटा असून, काय निर्णय घेता येईल, याबाबत पक्षात विचार मंथन सुरू असल्याचे प्रवक्त्या संजना घाडी यांनी सांगितले. याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जरी तीव्र असल्या तरी अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींच्या स्तरावरच घेतला जातो.

अद्याप याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. पक्षश्रेष्ठी एकत्र बसूनच याबाबत निर्णय घेतील, असे आ. अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेने जर अशी भूमिका घ्यायची ठरवले असेल अथवा तशी चर्चा सुरू असेल, तर त्याबाबत माझ्यापर्यंत अद्याप काहीही माहिती आलेली नाही. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, अद्याप पालिका निवडणुकांची घोषणाही झालेली नाही. त्यामुळे अजून पालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा सुरू केलेली नाही. आत्ताच काहीही ठरवून निर्णय घ्यावा, अशी परिस्थितीही नाही. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर यथावकाश निर्णय घेतला जाईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या अनेक मतदारसंघात मोठ्या पक्षांचे वर्चस्व…

महापालिका निवडणुकीत काय होईल, याचा ट्रेलर विधानसभा निवडणुकीत दिसून आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईच्या ३६ मतदारसंघामध्ये मोठ्या पक्षांचेच वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. मुंबईकरांनी राज ठाकरे यांच्या मनसे, वंचित, बसपा या पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांना नापसंत केले आहे. २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला मुंबईतून एकही जागा जिंकता आलेली नाही. तर, समाजवादी पक्षाने सलग तीनही निवडणुकीमध्ये मानखुर्दची जागा मात्र कायम राखली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने २६ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी महायुतीचा उमेदवार नसल्यामुळे केवळ शिवडीमध्ये मनसे उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची मते मिळाली आहेत. पण, वंचितचे २२, बसपाचे २९, अन्य पक्षांचे १५४ आणि ११४ अपक्ष उमेदवारांपैकी कुणालाही मतदारांची पसंती मिळालेली नाही.

मुंबई महापालिकेची निवडणूक कोणच्या पक्षासाठी सोपी?

२०१९ च्या निवडणुकीत मुंबईमधून बसपाने २९, मनसेने २५, वंचितने २३ उमेदवार दिले होते. तर, एमआयएम १०, आपचे ६, समाजवादी पार्टीचे ३, अन्य पक्षांचे ६६ आणि ९० अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील मनसेच्या भांडुप, माहीम, मागाठाणे आणि शिवडी येथील उमेदवारांना दुसऱ्या पसंतीची मते मिळाली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे आणि बसपाने प्रत्येकी ३६ उमेदवार दिले होते. तर, अन्य पक्ष आणि अपक्ष मिळून ३०१ उमेदवार निवडणुकीला उभे राहिले होते. त्यापैकी भायखळा विधानसभेतून एमआयएमचे वारीस पठाण आणि मानखुर्दमधून समाजवादी पार्टीचे अबू आझमी विजयी झाले होते. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी कॉग्रेस आणि भाजपचा वाढलेला आत्मविश्वास, शिंदेंनी सुरू केलेली तयारी हे सर्व पाहता मुंबई महापालिकेची निवडणूक कुठल्याच पक्ष्याला सोपी राहणार नाही. साम, दाम आणि दंड याचा वापर करुन प्रत्येक पक्ष सोन्याची अंडी देणारी ही कोंबडी आपल्याच ताब्यात राहावी यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रत्यक्ष सत्ता कोणाची येईल हे तर मतदारच ठरवतील.