December 27, 2024

मंदिराचे राजकारण : खरा हिंदुत्ववादी कोण? उद्धव सेना- भाजपात स्पर्धा

विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्दयावरून उद्धव सेना आणि भाजप यांच्या राजकीय कुरघेाडी पाहावयास मिळाल्या असतानाच, आता मुंबईच्या दादरमधील हनुमान मंदिराला पाडकामाच्या नोटीसीवरून उध्दव ठाकरे आक्रमक होत, थेट हिंदुत्वाच्या मुद्दयावरून भाजपला घेरलं. शनिवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे कार्यकर्ते हनुमान मंदिरात महाआरती करून आंदोलन करणार होते. मात्र त्या आधीच भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी मंदिराला भेट दिली, त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून या नोटीसीला स्थगिती देण्यात आली. ठाकरे गटाच्या आंदोलनाआधीच भाजपने ही खेळी केली. दरम्यान मंदिरात परिसरात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरेंवर टीका केल्याने उद्धव सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्दयावरून उद्धव सेना आणि भाजप पुन्हा आमने सामने आल्याचे दिसून आले.

म्हणून मविआचा झाला पराभव…

२०१९ मध्ये महाविकास आघाडीसोबत गेल्याने उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे संस्कार बाजूला ठेवले, असा आरोप वारंवार भाजपकडून केला जात आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत बंड करुन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे व त्यांचे ४० शिलेदारही सातत्याने हाच आरोप करायचे. त्यात काही प्रमाणात तथ्यही होते म्हणा. पण उद्धव ठाकरे मात्र आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून जराही दूर सरकलेलो नाही असे वारंवार स्पष्टीकरण द्यायचे. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही, असेही सांगायचे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मुस्लिम संघटना व समाजाने काँग्रेस- राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरेंच्या पक्षाला भरभरुन पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले व भाजपचा विजयी रथ रोखण्याचे मुस्लिम समाजाचे मनसुबे पूर्ण झाले. बरं हा पाठिंबा उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यामुळे दिला होता का? तर नाही.. भाजपच्या विरोधात दंड थोपटून कुणीतरी उभा अाहे, त्याला पाठिंबा म्हणून हे मतदान होते. जे काँग्रेस-राष्ट्रवादीला जमलेले नाही ते उद्धव ठाकरे करु पाहात आहात, यातून आपलेही मनसुबे पूर्ण होत आहेत हे मुस्लिम समाजाला कळून चुकले म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला होता. विधानसभेत मात्र हे चित्र दिसले नाही, त्यामुळे महाविकास आघाडी पराभूत झाली.

आदित्य ठाकरेंचा इशारा…

आता पुन्हा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी आपण हिंदुत्वाची कास सोडलेले नाही हे सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप व शिंदेसेनेकडून वारंवार होणारे आरोप खोडून काढण्यासाठीही त्यांना एका आंदोलनाची गरज वाटत होती. ही संधी दादरच्या एका मंदिराच्या माध्यमातून मुंबईत ठाकरेंकडे चालून आली. दादर पूर्वेकडील रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराला रेल्वे विभागाकडून पाडण्याची नोटीस देण्यात आली होती. यावरून उध्दव ठाकरे यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. हे कुठले हिंदुत्त्व आहे ? हिंदूना भयभीत करून त्यांची मते घ्यायची. इतकेच त्यांचे हिंदुत्त्व शिल्लक उरले आहे का ? असा सवाल ठाकरे यांनी भाजपला विचारला होता. त्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून उध्दव ठाकरेंवर प्रतिहल्ला करण्यात आला. हिंदुत्वावरून दोन्ही पक्ष भिडल्याचे दिसून आले. दरम्यान दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी मंदिरात महाआरती करण्याचा इशारा दिला हाेता. हा मुद्दा ठाकरे कॅश करत असल्याचे लक्षात येताच आदित्य पोहोचण्यापूर्वीच भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी हनुमान मंदिराला भेट दिली.

भाजपा-सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने…

लोढा यांनी मंदिर विश्वस्तांसोबत चर्चा करून थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी मंगलप्रभात लोढा म्हणाले की, रेल्वे प्रशासनाने जे आदेश काढले होते त्याला स्थगिती देण्यात आली आहे. मंदिरात पूर्वीप्रमाणे आरती आणि पूजा सुरूच राहिल. मंदिर हटवले जाणार नाही असे लोढा यांनी सांगितले. पाठोपाठ भाजपा नेते किरीट सोमय्या हे ही हनुमान मंदिरात दर्शनाकरिता पोहचले. सोमय्या म्हणाले की, हनुमान चालिसा बोलल्याने राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकणारे उद्धव ठाकरे आता विधानसभेत सुपडा साफ झाल्याने पुन्हा हनुमानाच्या चरणी आल्याचे पाहून आनंद होत आहे. आदित्य ठाकरे हे मंदिरात महाआरती करण्यासाठी येणार असल्याने आधी पासूनच ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. मात्र सोमय्यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केल्यानंतर ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यावेळी त्यांनी आक्रमक पावित्रा घेत, किरीट सोमय्या यांना मंदिरातून बाहेर काढण्याची मागणी पोलिसांकडे केली.

सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे भाजपा आणि सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप् करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही वेळाने आदित्य ठाकरेही तिथे आले. त्यांनी हनुमान मंदिरात महाआरती केली. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना आदित्य म्हणाले की, निवडणुकीआधी हिंदू मंदिरांवर काहिंनी दावा केला. मंदिराच्या जमिनी खरेदी केल्याच अशा अनेक अफवा भाजपने पसरवल्या होत्या. निवडणुकीत हिंदूंना पूर्णतः वापरून घेतले. मात्र, निवडणुका झाल्यानंतर विशेषतः भाजपचे सरकार सत्तेत येताच, हिंदू मंदिरांना नोटीस बजवली जात आहे. भाजपचे हे बेगडी आणि दुतोंडी हिंदूत्व समोर आले असून त्यांच्या सत्ता काळातच देशात हिंदू मंदिरे धोक्यात आल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर घाईघाईत स्थगिती देण्यात आली. शिवसेनेच्या भूमिकेमुळे मंदिराच्या नोटीसला स्थगिती देण्यात आली. यामुळे भाजपचे नकली हिंदुत्व उघड झाले आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

उद्धव सेना-भाजपमध्ये खरे हिंदुत्व सिद्ध करण्याची प्रयत्न…

देशात हिंदुत्ववादी सरकार आहे, असे सांगणाऱ्या भाजपच्या सरकारमध्ये मंदिराला नोटीस आली. त्याविरोधात हिंदूंमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर सारवासारव सुरू केली. तसेच तातडीने स्थगिती दिली. त्यानंतर भाजपची लोक नोटीस विरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, स्थगिती देण्याऐवजी नोटीस रद्द करावी, अशी मागणी आदित्य यांनी केली. एकूणच, दादरमधील एका छोट्याशा मंदिरावरुन उद्धव सेना- भाजप यांनी आपलेच हिंदुत्व कसे खरे आहे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा छोट्या मोठ्या चकमकी आता मनपा निवडणुकीपर्यंत मुंबईसह राज्यभरात सुरूच राहतील, यात शंका नाही. याचे कारण म्हणजे राजकीय पक्षांना हिंदुत्ववादी धोरण किंवा भक्तांच्या भावनांशी काही देणेघेणे नाही तर आपले राजकीय दुकान चालू राहिले पाहिजे याची त्यांना जास्त काळजी असल्याचे दिसून येते.